
Solapur News : मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ७ प्रकल्पांमध्ये यंदा सरासरी ७५.०३ टक्के जलसाठा झाला आहे. तर गतवर्षी या वेळेस या प्रकल्पांत सरासरी ७.७३ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या प्रकल्पांमध्ये ४.८६ टीएमसी अधिक उपयुक्त जलसाठा आहे.
गतवर्षी केवळ ०.५६ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा तो ५.४२ टीएमसी आहे. दरवर्षी सप्टेंबरनंतर भरणारे प्रकल्प यंदा पूर्वमोसमी व त्यानंतर मॉन्सूनच्याही चांगल्या पावसामुळे जूनमध्येच भरल्याने व बऱ्यापैकी जलसाठा झाल्याने शेतीला चांगला लाभ होणार आहे. गतवर्षी जिल्ह्यातील सातही मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक होती.
हिंगणी व ढाळे पिंपळगाव या दोन्ही प्रकल्पांतील जलसाठे मायनसमध्ये होते. एकूण उपयुक्त पाणीसाठा केवळ १५.८३ द.ल.घ.मी. इतका होता. यंदा मे महिन्याच्या मध्यापासून पूर्वमोसमी पावसाला जोरदार सुरवात झाली. मॉन्सूनच्या आगमनानंतरही चांगला पाऊस पडला. त्यामुळे या प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली.
सध्या या प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठा एकूण १५३.५५ द.ल.घ.मी. (५.४२ टीएमसी) आहे. सध्याचा मध्यम प्रकल्पांतील जलसाठा पाहता शेतीला खरिपासह रब्बी हंगामातही लाभ होणार आहे. मात्र, योग्यरीत्या पीक नियोजन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दोन प्रकल्प भरले १०० टक्के
सात मध्यम प्रकल्पांपैकी हिंगणी पा. व ढाळे पिंपळगाव हे दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. मांगी प्रकल्प वगळता इतर सहा प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ही ५० टक्क्यांहून अधिक आहे.
दोनच तलाव भरले १०० टक्के
जिल्ह्यात एकूण ५६ लघु पाटबंधारे तलाव आहेत. त्यापैकी रामपूर (ता. द. सोलापूर) व वैराग (ता. बार्शी) हे दोनच तलाव १०० टक्के भरले आहेत. दक्षिण सोलापुरातील शिरवळच्या धुबधुबी तलावासह २४ तलावांतील जलसाठा कालवा पाणीपातळीच्या खाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत सध्याचा प्रकल्पनिहाय उपयुक्त जलसाठा (टीएमसी)
प्रकल्प गतवर्षी सध्या सध्याची
टक्केवारी
एकरुख ०.५७ १.८५ ८५
हिंगणी -०.४० १.१३ १००
जवळगाव ०.०९ ०.५८ ५६.२२
मांगी ०.०७ ०.४५ ४१.८९
आष्टी ०.२६ ०.४६ ५६.११
बोरी ०.०७ ०.६१ ८९.४३
ढाळे पिंपळगाव -०.०९९ ०.३५ १००
एकूण १५.८३ १५३.५५ ७५.०३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.