Solapur News : सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला पहिल्यांदा दिलेली मुदतवाढ जानेवारीमध्ये संपत आहे. पण त्या आधीच राज्याच्या पणन विभागाने दोन्हीही बाजार समित्यांना आता दुसऱ्यांदा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. जुलै २०२४ पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. या निर्णयामुळे या बाजार समित्यांवर निवडणूक की प्रशासक या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे स्वतः सोलापूर बाजार समितीचे सभापती आहेत. तर बार्शीचे भाजपपुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत हे बार्शी बाजार समितीचे सभापती आहेत. या दोन्ही बाजार समित्यांना या आधीच अनुक्रमे १४ जानेवारी २४ आणि २३ जानेवारी २४ पर्यंत सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार की निवडणूक लागणार, याची चर्चा सुरू होती. पण देशमुख आणि राऊत यांनी आपले प्रयत्न फळास लावून राज्य सरकारकडून मुदतवाढीचा बोनस मिळवून घेतला आहे.
बार्शी, करमाळा, सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. त्यात करमाळ्याची निवडणूक नुकतीच झाली. त्यामुळे ही निवडणूक होत असेल तर सोलापूर आणि बार्शीची का होत नाही, असा प्रश्न विचारला जात होता. पण या दोन्हीही नेत्यांनी अनेक विकासकामे रखडली आहेत, ती पूर्ण करण्याचे कारण देत बाजार समितीला मुदतवाढ मिळवून घेतली आहे.
धोरणात्मक निर्णयासाठी परवानगीची अट
सोलापूर बाजार समितीच्या संचालकांना १४ जुलैपर्यंत, तर बार्शी बाजार समितीच्या संचालकांना २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र ही मुदतवाढ देताना संचालकांनी कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल, तर सरकारची मान्यता घेण्यात यावी, अशी अट घालण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.