Solapur News : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना उपनिबंधक कार्यालयाला दिल्या आहेत. त्यानुसार तयारी सुरू झाली आहे. असे असले तरी सत्ताधारी संचालक मंडळ आणखी मुदतवाढ मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिलेली मुदतवाढ जानेवारीत संपणार आहे. १५ जुलै रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपणार होती. तत्पूर्वी संचालक मंडळाने सहा महिन्याची मुदतवाढ मिळवली.
ही मुदतवाढ १४ जानेवारी रोजी संपणार आहे. यामुळे प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उपनिबंधक कार्यालयाला निवडणुकीची पूर्वतयारी करण्याचा आदेश बजावला आहे. प्राधिकरणाच्या आदेशानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती उपनिबंधक कार्यालयाने दिली आहे.
बाजार समितीवर सर्वपक्षीय संचालक मंडळ कार्यरत आहे. सद्यपरिस्थितीतही आणखी सहा महिने मुदत वाढ मिळवण्यासाठी संचालक मंडळ सर्व पातळ्यांवर ‘वजन’ वापरत असल्याची चर्चा बाजार समितीच्या आवारात आहे.
शेतकरी मतदानापासून वंचित
शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतकऱ्यांचाच मताचा अधिकार सरकारने काढून टाकला आहे. तत्कालीन भाजप सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीत थेट शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला होता.
मात्र त्यानंतर आलेल्या आघाडी सरकारने बाजार समितीच्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच म्हणजे विकास सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघातून निवडण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीच्या निवडणुकीत दहा गुंठेपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला उमेदवार म्हणून उभे राहता येणार आहे, मात्र त्याला मताचा अधिकार असणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.