Soil Testing : अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी माती परिक्षण आवश्यक

Soil Fertility : माती तपासणी अहवालावरून आपणास जमिनीचा प्रकार, कस व जमिनीतील पोषक द्रव्यांचा साठा समजतो. माती तपासणीत तिची जडणघडण, चुनखडीचे प्रमाण, निच­ऱ्याची क्षमता, आम्ल -विम्ल निर्देशांक, सेंद्रिय कर्ब व उपलब्ध अन्नांश इत्यादींची माहिती मिळते.
Soil Testing
Soil TestingAgrowon

डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. मदन पेंडके, डॉ. वासुदेव नारखेडे

Soil Health : येत्या काळात पावसाचा पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जमिनीत पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात मुरवणे, त्याचबरोबर मुरवून ठेवलेली ओल काटकसरीने वापरणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सध्याच्या काळात माती तपासणी आणि जलसंधारण उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

माती तपासणी अहवालावरून आपणास जमिनीचा प्रकार, कस व जमिनीतील पोषक द्रव्यांचा साठा समजतो. माती तपासणीत तिची जडणघडण, चुनखडीचे प्रमाण, निच­ऱ्याची क्षमता, आम्ल -विम्ल निर्देशांक, सेंद्रिय कर्ब व उपलब्ध अन्नांश इत्यादींची माहिती मिळते. माती तपासणीवरून कोणत्या जमिनी कोणत्या पिकासाठी योग्य आहेत हे ठरवले जाते. तसेच या माहिती आधारे मृद्संधारणाच्या कामाची दिशा ठरवता येते. पीक लागवडीस अयोग्य जमिनी सुधारता येतात.

अन्नद्रव्यांची गरज ः
१) पिकाच्या वाढीस एकूण १६ ते १८ पोषक अन्नद्रव्यांची गरज असते. तसेच त्यांची कमी अधिक प्रमाणात झाडास गरज असते. वनस्पतींना अधिक प्रमाणात कर्ब, ऑक्सिजन (प्राणवायू), हायड्रोजन, नत्र, स्फुरद, पालाश यांची गरज असते. मध्यम प्रमाणात चुना, मॅग्नेशिअम, गंधक लागते. कमी प्रमाणात लागणारी जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, लोह, बोरॉन, मँगेनीज व क्लोरिन असून यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात.
२) पिकांना अन्नद्रव्यांचा जर पुरवठा चांगला झाला तर त्यांची जोमदार वाढ होते. अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना कमी झाल्यास पिकांची वाढ थांबते. पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे दिसून येतात. या कमतरतेमुळे पानावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. पाने पिवळी पडतात, पानाची गळ होते. रोपाचा वरचा शेंडा मरतो, पानाचा आकार लहान होऊन गुच्छ तयार होतो. पर्यायाने उत्पादनात मोठी घट येते.

Soil Testing
Soil Testing : माती परिक्षण कसे करावे?

३) अन्नद्रव्यांची पुरेशी उपलब्धता जमिनीत असणे आवश्यक आहे. परंतु हा साठा जमिनीचे नुसते बाह्य निरीक्षण करून समजत नाही, त्यासाठी माती परिक्षण आवश्यक आहे. पिकांना द्यावयाची खतांची मात्रा, घेण्यात येणा­ऱ्या पिकांच्या प्रकारावर व जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांच्या साठ्यावर अवलंबून असते. त्यासाठी मातीत किती प्रमाणात अन्नद्रव्ये आहेत ते केवळ तपासणी केल्यावर माहीत होते.
४) माती तपासणी अहवालात दर्शविलेल्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार खतांच्या मात्रा दिल्यास पिकांची चांगली वाढ होऊन अपेक्षीत उत्पन्न मिळते. पिकांचे उत्पन्न रासायनिक खतांचा समतोल वापर करून पीक उत्पादन वाढवायचे असल्यास मातीचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

प्रातिनिधिक नमुन्याची गरज ः
१) माती तपासणीसाठी योग्य आणि प्रातिनिधिक नमुना महत्त्वाचा आहे. सर्वेक्षणांती असे निदर्शनास आले आहे की, मातीचा प्रातिनिधीक नमुना योग्य पद्धतीने गोळा न केल्यामुळे ५० ते ६० टक्के निष्कर्ष जशास तसे पिकास लागू पडत नाही. यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पादनात वाढ होत नाही.
२) मातीचा प्रातिनिधीक आणि योग्य नमुना जर मृद परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठविला तरच खतांच्या मात्रेच्या योग्य शिफारशी करता येतील आणि अपेक्षीत उत्पादन मिळेल.
साहित्य: माती घेण्याचे अगर, कुदळ, खोरे, प्लॅस्टिक बकेट, टोपले, कापडी पिशव्या, पेन, माहितीपत्रक व स्वच्छ कपडा.

Soil Testing
Soil Testing : पोशीर धरण प्रकल्‍पाचे होणार माती परीक्षण

नमुना घेण्याची पध्दत ः
१) प्रथम जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. हे विभाग पाडताना जमिनीचा रंग, जमिनीची खोली, जमिनीचा पोत, जमिनीवरील पाण्याच्या निच­ऱ्याची परिस्थिती, जमिनीचा उंच-सखलपणा, पाणथळ किंवा चोपण जागा इत्यादी बाबींचा विचार करावा. अशा प्रकारे प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात काल्पनिक नागमोडी रेषा काढून त्यातून
जमिनीच्या विशिष्ट खोलीतून मातीचे नमुने घ्यावेत.
२) मातीचा नमुना साधारणपणे ३० सेंमी खोलीपर्यंत घ्यावा. फळ पिकांसाठी ० ते ३० सेंमी, ३० ते ६० सेंमी आणि ६० ते ९० सेंमी खोली पर्यंतचे नमुने घ्यावेत. नमुना घेण्यापूर्वी त्या जागेवरील काडीकचरा, दगड बाजूला करावे. त्यानंतर कुदळ व खो­ऱ्याच्या साह्याने इंग्रजी ‘व्ही‘ आकाराचा खड्डा घ्यावा. या खड्याच्या एक बाजूने वरपासून खालीपर्यंत जवळपास २ सेंमी जाडीचा एकसारखा मातीचा काप घेऊन स्वच्छ घमेल्यात किंवा बादलीत खुरपीने किंवा थापीने काढून घ्यावा.
३) सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करावयाची असल्यास नमुना घेताना टोकदार लाकडी खुंटीच्या साहाय्याने नमुना घ्यावा. मातीचा नमुना घेण्यासाठी प्लॅस्टिकचे घमेले वापरावे. साधारण एक हेक्टर क्षेत्रावर वरील प्रमाणे ७ ते ८ ठिकाणच्या मातीचे नमुने घ्यावेत.
४) वेगवगळ्या ठिकाणाहून गोळा केलेली माती एकत्र करून चांगली मिसळावी. पांढऱ्या स्वच्छ कापडावर गोळा केलेल्या मातीचे सारखे चार भाग करावेत. त्यापैकी समोरासमोरील दोन भागतील माती पुन्हा एकत्र मिसळावी. दोन भाग सोडून द्यावेत. अशा प्रकारे साधारणपणे अर्धा किलो मातीचा नमुना घ्यावा. सदर मातीचा नमुना स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरून आवश्यक त्या माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावा.

नमुन्यासोबत द्यावयाची माहिती ः
१.शेतकऱ्याचे नाव व पूर्ण पत्ता
२.भ्रमणध्वनी क्रमांक
३.सर्व्हे नंबर, गट क्रमांक
४.नमुना घेतल्याची तारीख
५. शेतीचा प्रकार : बागायत / कोरडवाहू
६.ओलिताचे साधन (विहीर/कूपनलिका/नदी/कालवा)
७.जमिनीचा निचरा ( चांगला /मध्यम / कमी)
८.जमिनीचा प्रकार (वाळू / पोयटा / चिकण माती/ क्षारयुक्त/ चोपन/चनुखडीयुक्त)
९.जमिनीचा उतार (जास्त / मध्यम/ सपाट )
१०.जमिनीची खोली (उथळ-२५ सेंमी, मध्यम -२५ ते ५० सेंमी, खोल- ५० ते १०० सेंमी, अती खोल - १०० सेंमी पेक्षा जास्त)
११.मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचे उत्पादन
१२.मागील हंगामातील पिकास वापरलेली खते व त्यांचे प्रमाण
१३.पुढील हंगामात घ्यावयाची पिके

फळबागेसाठी मातीचा नमुना घेण्याची पद्धत
जमिनीच्या प्रत्येक प्रकारातून १ मी. बाय १ मी. बाय १ मी. आकाराचा खड्डा घ्यावा. खड्ड्याच्या एका बाजूने जमिनीतील ३० सेंमी खोलीच्या अंतराने निरनिराळ्या थरांचे वेगवेगळे नमुने घ्यावेत. वेगवेगळ्या थरांतील नमुने घेतल्यानंतर पाठविल्या जाणाऱ्या माहिती सोबत ० ते ३० सेंमी, ३० ते ६० सेंमी आणि ६० ते ९० सेंमी अशा थरांचा स्पष्टपणे उल्लेख करावा.


माती नमुना घेताना घ्यावयाची दक्षता
१) सर्व साधारणपणे मातीचा नमुना शेत नांगरणीपूर्वी घ्यावा.
२) एकाच शेतातील जमीन वेगवेगळ्या प्रकारची असल्यास तिचे वर्गीकरण करून प्रत्येक वर्गातील मातीचा नमुना वेगवेगळा घ्यावा.
३) निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
४) नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत पाठविताना रासायनिक खतांच्या पिशव्यांचा वापर करू नये.
५) शेताचे बांध, जनावरांचे गोठे, खतांचे ढीग, कंपोस्ट खड्डे, जनावरांची बसण्याची जागा, सांडपाण्याचे चर इत्यादी ठिकाणचे माती नमुने घेऊ नयेत.
६) शेतात रासायनिक खते दिली असल्यास दोन ते अडीच महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.
७) मातीचा नमुना घेण्याकरिता वापरण्यात येणारी अवजारे उदा. फावडे, कुदळ, खुरपी, बादली स्वच्छ असावीत.
८) सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करावयाची असल्यास नमुना घेताना लोखंड, तांबे इत्यादी धातूच्या साहित्याचा वापर करू नये. त्यासाठी लाकडी खुंटीच्या साह्याने नमुना घ्यावा. प्लॅस्टिकचे घमेले वापरावे.


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com