
के. एन. गावंडे, डॉ. एस. के. नायक
रासायनिक खतांचा अतिवापर, सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धत, कीटकनाशकांचा अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता खालावण्यास सुरुवात झाली. याचा पिकांचे उत्पादन, उत्पादकता तसेच पिकांच्या गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत.
रासायनिक सुपीकता
जमिनीचा सामू, क्षाराचे प्रमाण, पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता (जसे मुख्य, दुय्यम, व सूक्ष्म अन्नद्रव्ये) यांचा समावेश होतो.
भौतिक सुपीकता
जमिनीची भौतिक सुपीकता रचना, पोत, जलधारण शक्ती, सच्छिद्रता, घनता, पाण्याचे वहन आणि निचरा इत्यादी घटकांवर अवलंबून असते.
जैविक सुपीकता
मातीमध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या किती आहे, यावर जैविक सुपीकता अवलंबून आहे. कारण हे सूक्ष्म जिवाणू मातीतील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देतात.
सुपीकतेचे महत्त्व
आवश्यक सर्व पोषक घटक (जसे मुख्य, दुय्यम, व सूक्ष्म अन्नद्रव्ये) पिकांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात मिळतात.
पिकांची वाढ जलद, निरोगी आणि सशक्त होते, तसेच उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होते.
पिकांची गुणवत्ता सुधारते. नैसर्गिक सुपीकता टिकल्यास रासायनिक खतांचा वापर कमी होतो.
सुपीक माती मऊसर आणि भुसभुशीत असल्याने मुळांना वाढण्यासाठी योग्य आधार मिळतो.
सुपीक जमिनीतील असलेले सूक्ष्मजीव, जे सेंद्रिय पदार्थांना विघटन करून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली पोषण तत्त्वे उपलब्ध करून देतात. शाश्वत शेतीला चालना मिळते.
जमीन सुपीकता कमी होण्याची कारणे
असमतोल अन्नद्रव्यांचा वापर करणे.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण असणे.
जमिनीचा सामू सहा पेक्षा कमी किंवा आठ पेक्षा जास्त असणे.
चुनखडीच्या प्रमाणात वाढ होणे (१० टक्क्यांपेक्षा जास्त).
जमिनीची जलधारण क्षमता कमी असणे. खाऱ्या पाण्याचा सतत वापर.
रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा.
भरखतांचा वापर न करणे.
सतत एकच पीक घेत राहणे. वर्षातून २ ते ३ पिके सलग घेणे.
पाण्याचा योग्य व्यवस्थापण न करणे.
पिकांची फेरपालट न करणे. द्विदल पिकांचा पीक पद्धतीत समावेश न करणे.
जमिनीची बिघडलेली भौतिक स्थिती, कमी होत चाललेली सूक्ष्म जिवाणूंची संख्या.
सुपीकता टिकविण्यासाठी उपाययोजना
मातीपरीक्षण आधारित शिफारशीनुसार खतांचा योग्य प्रमाणात वापर करून अन्नद्रव्याचे संतुलन साधावे.
सेंद्रिय खतांचा (कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत इ.) नियमित वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढते, जमीन भुसभुशीत होऊन मुळांच्या संख्येत वाढ होते. जमिनीतील जिवाणू सक्रिय होऊन पिकांना आवश्यक सूक्ष्म पोषक घटक उपलब्ध होतात. सुपीकता सुधारते, टिकून राहण्यास मदत होते.
रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळावा. रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने तसेच योग्य वेळेवर वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकवता येते. तृणधान्य पिकांसाठी खतांचा ४:२:२:१ (नत्र: स्फुरद: पालाश: गंधक) या प्रमाणात तर कडधान्य पिकास १:२:१:१ या प्रमाणात खताचा वापर करावा. योग्य ओलावा असतानाच खते द्यावीत.
जिवाणू खते जमिनीच्या सुपीकतेसाठी नैसर्गिक आणि प्रभावी उपाय असून ती मातीतील पोषण चक्र टिकवतात. रायझोबियम द्विदल पिकांच्या मुळाशी सहजीवन करून हवेतील नत्र स्थिर करून जमिनीत नत्राची उपलब्धता वाढवतात. मातीतील नत्र पिकांना सहज उपलब्ध करून देतात. ॲझोटोबॅक्टर, पीएसबी आदी जिवाणू संवर्धकाच्या वापराने जमिनीची सुपीकता सुधारते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते.
हिरवळीच्या पिकांची नियमित लागवड केल्यास जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीच्या भौतिक, जैविक गुणधर्मात बदल होऊन सुपीकता वाढते, जलधारण क्षमता, निचरा शक्ती सुधारते.
जमीन सुपीकतेसाठी पिकांची फेरपालट महत्त्वाची आहे.
पीक पद्धती योग्य प्रकारे वापरल्यास जमिनीची सुपीकता सुधारते, टिकून राहते. जमिनीतील पोषणतत्त्वांचा योग्य वापर होऊन उत्पादनात वाढ होते. मुख्य पिकासोबत आंतरपीक घेतल्यास जमिनीची धूप कमी होते.
पिकांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी दिल्यास जमिनीतील पोषणतत्त्वे, ओलावा टिकून राहतो.
पिकांची कापणी झाल्यानंतर नांगरटीमध्ये पीक अवशेष जमिनीत गाडावीत. यामुळे जमिनीची पोत सुधारतो. जमिनीतील सूक्ष्म जिवांची संख्या वाढते.
- के. एन. गावंडे ९५२७३७२५०९
(श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा, जि. अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.