
डॉ. राहूल शेलार
Soil Management : जमिनीची धूप ही वारा, पाऊस, नद्या, समुद्राचे प्रवाह आणि मानवी हस्तक्षेपांमुळे होते. जमिनीची वरचा स्तर हा जैविक घटकांनी समृद्ध असतो आणि शेतीसाठी उपयुक्त असतो. या पातळ थरामुळे पीक उत्पादनक्षमता टिकून राहते, परंतु हा थर नष्ट झाल्यास जमिनीची सुपीकता लक्षणीयरीत्या कमी होते. धूपेची प्रक्रिया नैसर्गिक असली तरी अलीकडच्या काळात मानवी क्रियाकलापांमुळे या प्रक्रियेचा वेग आणि प्रमाण वाढले आहे.
अयोग्य शेती पद्धती, मोठ्या प्रमाणात जंगलतोड, बांधकामांची प्रचंड वाढ व जनावरांची जास्तीची चरण प्रक्रिया यामुळे धूप होते. धुपेमुळे फक्त सुपीकता कमी होत नाही, तर त्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडते. हळूहळू, मातीतील कार्बन वातावरणात मुक्त होतो आणि त्यामुळे हवामान बदलाला चालना मिळते. त्यामुळे धूप कमी करणे आणि जमिनीचे संरक्षण करणे हे हवामान बदलाशी लढण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
धूप आणि कार्बन उत्सर्जन
धुपेमुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याबरोबरच पर्यावरणीय दुष्परिणाम देखील घडतात, ज्यामध्ये कार्बन उत्सर्जन महत्त्वपूर्ण आहे. जमिनीच्या वरच्या थरात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ साठलेला असतो, जो मृदा कार्बन किंवा मातीतील सेंद्रिय कार्बन म्हणून ओळखला जातो. या सेंद्रिय पदार्थात कार्बन साठवला जातो, जो जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, मातीचा ऱ्हास झाल्यास हा सेंद्रिय कार्बन नष्ट होतो आणि हवेत उत्सर्जित होतो.
मातीचा ऱ्हास आणि सेंद्रिय कार्बनची गळती
माती वाहून गेल्यास तिच्यातील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतो किंवा नदी, तलाव आणि समुद्रात साचतो. या साचलेल्या सेंद्रिय पदार्थांवर अन्नद्रव्ये आणि जैविक क्रियांचे विघटन होताना कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांसारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते.
पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे सुपीक माती वाहून गेल्यास जमिनीतील कार्बन कमी होतो. नद्या आणि जलाशयांत साचलेल्या गाळामुळे उत्सर्जन अधिक होते, कारण तिथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गाळातील जैविक पदार्थ वेगाने विघटित होतात.
कार्बन साठवण क्षमतेत घट
माती ही कार्बन साठवण्यासाठी एक मोठा स्रोत आहे. मृदा आरोग्य टिकवल्यास ती कार्बन साठवून ठेवण्याचे काम करते, जे हवामान बदल नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.
मातीचा ऱ्हास झाल्यास कार्बन साठवण क्षमतेत घट होते, जमिनीची उत्पादकता कमी होते. परिणामी, मातीतील कार्बन हवामानात उत्सर्जित होऊन हरितगृह वायूंची पातळी वाढते.
हरितगृह वायू आणि जागतिक तापमान वाढ
मातीतील सेंद्रिय कार्बनचा नाश झाल्यानंतर तो कार्बन डायऑक्साईड स्वरूपात वातावरणात मिसळतो. या प्रक्रियेमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते, जे जागतिक तापमानवाढीस जबाबदार आहे.
उच्च तापमानामुळे हवामान बदलाच्या समस्या जसे की गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी आणि समुद्राची वाढती पातळी निर्माण होतात.
कृषी आणि जैवविविधतेवर होणारे परिणाम
मातीतील कार्बन गमावल्याने शेतीतील उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो, कारण अन्नद्रव्ये कमी होतात. यामुळे अधिक खतांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे अजून जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होते.
मातीतील जैविक साखळीत खंड पडल्याने जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे जैवविविधतेवरही परिणाम होतो.
धुपेची कारणे नैसर्गिक कारणे
पाऊस आणि वाहून जाणारे पाणी
पावसाचा जोरदार प्रवाह जमिनीच्या वरच्या थराला वाहून नेत असतो.विशेषतः डोंगराळ भागात पावसामुळे मातीची झीज होते. सततचा जोरदार पाऊस मातीच्या सुपीक थराला नष्ट करून बऱ्याचदा खडकाळ जमिनी उघड करतो.
वारे
वाऱ्यामुळे सुकलेल्या किंवा हलक्या मातीचा थर उडतो. शुष्क व वाळवंटी प्रदेशांमध्ये ही समस्या गंभीर आहे.वारंवार वारे वाहिल्याने मातीतील सेंद्रिय पदार्थ कमी होतात.
नदी, समुद्र आणि किनारपट्टी धूप
नद्यांमुळे त्यांच्या काठावरील माती वाहून जाते. समुद्रकिनारी लाटांच्या सतत धडकांमुळे किनारपट्टीची धूप होते.
मानवनिर्मित कारणे अयोग्य शेती पद्धती
सातत्याने एकाच प्रकारच्या पिकांची शेती केल्याने मातीचा पोत खराब होतो. नांगरणीची अयोग्य दिशा आणि अधिक खोलीने नांगरणी केल्यास माती सैल होऊन वाहून जाते.
वृक्षतोड
जंगलतोडीमुळे जमिनीवर झाडांचे आच्छादन नसते, त्यामुळे पाऊस आणि वाऱ्यामुळे मातीची झीज होते.
झाडांच्या मुळांच्या अभावामुळे माती सैल होते.
वाढते शहरीकरण
रस्ते, इमारती आणि औद्योगिक विकासासाठी जंगलांचा नाश होतो. परिणामी, मातीचे संरक्षण करणारे घटक नष्ट होतात.
अति चराई
जास्त प्रमाणात जनावरांना चरताना मातीवरील वनस्पतींचे आच्छादन नष्ट होते. चराईमुळे माती उघडी पडून धूप होते.
औद्योगिक आणि रासायनिक प्रदूषण
औद्योगिक प्रक्रिया आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात. मातीच्या पोतावर आणि सेंद्रिय कार्बनवर परिणाम होतो.
जमिनीची धूप नियंत्रित करण्यासाठी उपाय
वनीकरण व वृक्षारोपण
झाडांच्या मुळांमुळे मातीची पकड मजबूत होते आणि धूप कमी होते. उतारांवर वनीकरण करून जमिनीची धूप थांबवता येते.
शेतीत सुधारित पद्धती
कंटूरवर पेरणी : उताराच्या दिशेने नांगरणी टाळून समांतर रेषेत पेरणी करावी.
पट्टा पेर पद्धत : पर्यायी पट्यात विविध प्रकारची पिके लावावी.
पीक आच्छादन : गवत, पालापाचोळा किंवा पिकांचे अवशेष जमिनीवर पसरवून मातीचे थर उघडे पडण्यापासून वाचवावेत.
मृदा- जलसंधारण उपचार
नाल्यांवर गॅबियन बंधारे, लूज बोल्डर स्ट्रक्चर्स, आणि बंधारे बांधून पाणी वाहून जाणे नियंत्रित करता येते.
उतारांवर टेरेसिंग पद्धतीचा वापर करून पाणी साठवता येते.
गवत लागवड व चराई व्यवस्थापन
ज्या ठिकाणी मोकळी माती आहे, तिथे गवत लावावे. जनावरांची अति चराई टाळावी.
पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन
पाण्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी माती बंधारे बांधावेत. जलसंधारण प्रकल्प उभारून तळी तयार करावीत.
सेंद्रिय खते आणि पर्यावरणपूरक शेती
सेंद्रिय खते वापरून मातीची सुपीकता टिकवावी. कमी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करावा.
जमिनीचे सरंक्षण व जनजागृती
स्थानिक स्तरावर जमिनीच्या धुपेचे दुष्परिणाम व उपाय समजावून
सांगावेत. सामूहिक सहभागाने उपक्रम राबवावेत.
- डॉ. राहूल शेलार, ९८८१३८०२२७
(मृदा व जल संधारण अभियांत्रिकी विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.