
ॲग्रोवन वृत्तसेवा
Vaijapur News : वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर : तालुक्यात स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत पहिल्या वर्षी २० गावांतील २२७६ एकरवर तितक्याच शेतकऱ्यांच्या सहभागातून प्रकल्प राबविला जातो आहे. प्रतिगाव ५५० क्विंटल कापसानुसार किमान ११ हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया करून त्यापासून सुमारे दोन हजार रुई गाठी तयार होणे अपेक्षित आहे. पहिल्या दोन वेचणीचा कापूस प्रक्रियेसाठी घेतला जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
स्मार्ट कॉटन या प्रकल्पामध्ये वैजापूर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी पाच ते सहा गावे आताच कापसापासून रुई गाठ निर्मितीसाठी पुढे आली आहेत. सहभागी गावांमधे लासुरगाव, धोंदलगाव, नालेगाव, परसोडा, भोकरगाव, बोरसर, सावखेड खंडाळा, खरज, बाबूळतेल, भिवगाव, वैजापूर, लोणी बुद्रुक, मकरमतपूर, तिडी, भग्गाव, भगूर, जातेगाव, कउटगाव, पालखेड, अव्लवगाव आदींचा सामावेश आहे.
प्रत्येक गावामध्ये १०० एकर क्षेत्रावर ‘एक गाव एक वाण’ या संकल्पनेवर आधारित कापसाची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कापूस लागवडीपासून काढणीपर्यंत व काढणीनंतर स्वच्छ कापूस वेचणी करून कापसापासून गाठी तयार करून विक्री व्यवस्थेचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी मल्टी टास्किंग ग्रेडर म्हणून रूपाली देशमुख काम पाहत आहेत.
प्रकल्पाचा मुख्य उद्देश एक गाव एक वाण व स्वच्छ कापूस वेचणी करून कापसापासून गाठी तयार करून विकणे व कापूस मूल्य साखळीतील एका प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याचा सहभाग वाढवून आर्थिक उत्पन्न वाढवणे हा आहे. या प्रकल्पामध्ये कापूस गाठी बनविणे ते विक्रीपर्यंत कृषी विभाग, महाकॉट व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ या तीनही यंत्रणा शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहेत. नुकतेच लोणी बुद्रुकमध्ये या प्रकल्पाअंतर्गत स्वच्छ कापूस वेचणी प्रशिक्षण घेण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, मल्टी टास्किंग ग्रेडर रूपाली देशमुख, मंडल कृषी अधिकारी विशाल साळवे, कृषी अधिकारी रवी उराडे व कृषी सहायक ऊर्मिला जेजुरकर यांनी मार्गदर्शन केले. वैजापूर तालुक्यात मंडल कृषी अधिकारी अशोक बिनगे, शाम पाटील, मंगेश घोडके व कृषी सहायक प्रशांत राजवाळ, वनिता खडके, दीपक कुचेकर, सुवर्णा राजपूत, संकेत गायकवाड हे प्रकल्प राबविण्यासाठी परीश्रम घेत आहेत.
कापूस ते कापड या मूल्य साखळीमध्ये एका पायरीमध्ये शेतकऱ्यांना कापसापासून गाठी तयार करणे हे तंत्रज्ञान त्यांच्यामध्ये रुजवण्यात आले ते शेतकऱ्यांना पसंतीस पडले आहे. सहा गावांतील शेतकरी गाठी तयार करण्यास पुढे आले आहेत.
- रूपाली देशमुख, मल्टी टास्किंग ग्रेटर, स्मार्ट कॉटन प्रकल्प वैजापूर
भाववाढीच्या आशेने शेतकरी घरांमध्ये कापूस वेचणीनंतर साठवून ठेवतो. या कापसापासून गाठी तयार केल्या तर त्याला लगेचच सरकीचे पैसे मोकळे होतील. रुईची गाठ सुरक्षित पद्धतीने साठविल्याने त्याच्या कापसाची प्रत खराब होणार नाही. भाव वाढल्यानंतर तो ती गाठ महाकॉटच्या मदतीने विकू शकतो.
- रवी उराडे, कृषी अधिकारी, ता. वैजापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.