बांधावरची झाडे

आपल्या शरीराचे पोषण करणारे शेवगा, हदगा, मोह, फणस, कांचन, भोकर, म्हाळुंग अशी झाडे बांधावर असायलाच हवीत. शिवाय त्यासोबत हळद, करांदे, चाई, घेवडा-भोपळावर्गीय वेलभाज्या अशी विविधता निर्माण केली तर वर्षभर कुटुंबाला पुरेसे पोषणमुल्य देणारे अन्न आपण निर्माण करू शकतो.
बांधावरची झाडे
बांधावरची झाडेAgrowon

माझी आज्जी व तिची मैत्रीण दिंडी काढायच्या. वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत तिची आषाढीची वारी कधी चुकली नाही. दरवेळी जाताना ती एखाद-दुसऱ्या नातवंडाला सोबत नेई. तिच्या वारीच्या आठवणीत एक खास गोष्ट कायमची लक्षात राहिलीय. ती जायच्या आदल्या दिवशी सोबत खाण्यासाठी दशम्या बनवून न्यायची. या गोड दशम्या बरेच दिवस चांगल्या राहत. खायलाही चांगल्या लागत. आज्जी गेली आणि परत कधी दशम्या बनल्याच नाहीत.

सध्या मोहाची फुले पडण्याचा हंगाम सुरु झालाय. जागोजागी मोह फुले गोळा करणे, सुकवून ठेवणे केले जाते. आदिवासी भागातील वार्षिक उत्पन्नाचा हा एक मोठा भाग. उग्र वासामुळे दुरूनही आपल्याला मोह फुललाय हे समजते. मोहाची फुले सुकल्यावर नैसर्गिकरित्याच गोड लागतात, अगदी गुळासारखी. मोहाच्या या गुळमट चवीच्या मी मोहात पडले. मला एकदम आज्जीच्या दशम्या आठवल्या. मी मोहाच्या गोड दशम्या बनवायचे ठरवले. सुकवलेली मुठभर मोह फुले कुकरमध्ये शिजवून घेतली आणि त्यांचा लगदा केला. एकेक वाटी बाजरीचे आणि गव्हाचे पीठ घेतले. थोडेसे जिरे व वेलचीपूड आणि अगदीच थोडे म्हणजे पाव चमचा मीठ घेतले. पाव वाटी पाण्यात अर्धा वाटी गुळ टाकून त्याचा गॅसवर पाक करून घेतला. याच गोड पाकात पाणी टाकून घट्ट कणिक मळून घेतली. छोट्या आकाराचे गोळे करून पुरीच्या आकाराच्या जाडसर दशम्या लाटल्या. तव्यावर शेंगदाणा तेल टाकून खरपूस भाजल्या. किती चविष्ट व पौष्टिक पदार्थ तयार झाला होता! मग मोहाची भाकरी, लाडू, खीर असे बरेच पदार्थ बनवू लागले. त्यातूनच लक्षात आले की आपल्या शेताच्या बांधावर किंवा घराभोवतीच्या बागेत मोहाचे एक तरी झाड असायला हवे. मोहाच्या फुलात खनिजे व इतर सूक्ष्म पोषकतत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. मोह आपले शरीर सुदृढ तर बनवतेच पण चिरतारुण्य बहाल करते.

मोहाचा विषय आला की काही लोक गालातल्या गालात किंचित हसून विचारतात की, तुमचा मोहाचा लाडू खाल्ला तर आम्हाला नशा चढेल का? कारण मोहाचे झाड म्हटले कि फक्त ‘मोहाची दारू’ हेच आठवते. खरे तर मोहाच्या झाडापासून अल्कोहोल नसलेले ५०० खाद्यपदार्थ बनवता येतात.

ही माहिती अनेकांसाठी नवीनच असते. मोहाच्या झाडाला आदिवासींचा कल्पवृक्ष मानले जाते. याच्या कोवळ्या फळांची भाजी बनवली जाते, तर बियांपासून चांगल्या प्रतीचे तेल निघते. त्यापासून देखील उत्पन्न मिळते. गावांतले लोक या बिया जमा करून बाजारात विकतात. भाजीसाठी किंवा अन्न म्हणून आपण छोट्या-मोठ्या झुडपांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. जसे की पालेभाजीसाठी मेथी, पालक, शेपू, चुका अशा भाज्या लावतो. या भाज्यांचा कालावधी अल्प म्हणजे दीड ते दोन महिन्यांचा असतो. दोडका, दुधी, घोसाळी आणि घेवडा, वालवड या वेलवर्गीय भाज्यांचा कालावधी सात ते आठ महिन्यांचा असतो. या वेलभाज्या आणि पालेभाज्यांचा कालावधी संपला की त्यांची पुन्हा लागवड करावी लागते. परंतु, आपणास ठाऊक आहे का, की असे अनेक वृक्ष आहेत जे आपली ही भाज्यांची गरज तर पूर्ण करतातच पण ते पुन्हा पुन्हा लावावे लागत नाहीत. एकदा लावले की हंगामानुसार ते आपल्याला भाजी देत राहतात.

बहुगुणी हदगा

ज्यांचा अन्नासाठी विशेषतः भाजीसाठी उपयोग होतो, असे दोन महत्वाचे वृक्ष म्हणजे हदगा आणि शेवगा. हदग्याला अगस्ता म्हणूनही ओळखले जाते. प्राचीन वाङ्‌मयात हदगा-शेवगा यांचे महत्व सांगितलेले आहे. पूर्वी प्रत्येकाच्या परसदारी हदगा-शेवगा ही जोडी असायचीच. त्याला कारणही तसेच आहे. या दोन्हीही गुणी वृक्षांची पाने, फुले, फळे, खोड अशी प्रत्येक गोष्ट अत्यंत उपयुक्त आहे. शेवग्याच्या पाने-फुले-फळांची भाजी बनवून खाल्ली जाते. हदग्याच्या फुलांचीही भाजी खूपच रुचकर आणि सारक असते. हदग्याच्या फुलांची भजी पण छान होतात आणि कोवळ्या शेंगांची भाजी उत्तम होते.

हदग्याचे औषधी गुणधर्म पाहिले तर या झाडाचे महत्व लक्षात येईल. हदगा हे उष्णतारोधी आहे. भरपूर ‘अ’ जीवनसत्व व इतर पोषकद्रव्ये त्यात आहेत. त्यामुळे ॲनिमिया, उष्णता, ताप, अर्धशिशी, तोंड येणे, घशाला कोरड पडणे इ. अनेक आजारांवरील औषधांत त्याचा उपयोग होतो. तसेच टॉनिक बनविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. ट्युमर, कॅन्सरसारख्या आजारांतही त्याचा उपयोग होतो.

आरोग्यदायी शेवगा

शेवग्याच्या झाडाचे मूळ भारतात आणि आफ्रिका खंडात सापडते. परंतु आता ते उष्ण, दमट हवामान असणाऱ्या सर्वच प्रदेशांत सापडते. या झाडाची पाने, साली, बियापासून ते मुळापर्यंत सर्वच गोष्टी जबरदस्त उपयोगाच्या. आपल्याला त्याची माहितीच नसते. आयुर्वेदानुसार ३०० प्रकारच्या आजारांवर औषध म्हणून शेवग्याचा उपयोग होतो. मधुमेह, मुतखडा यापासून ते हृदयरोग, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांमध्येही त्याचा प्रभावी उपयोग होतो. शेवग्याची पाने, फुले, फळे, बिया इ. सर्वच गोष्टी खाद्य म्हणून उपयोगात येतात. साल आणि मूळ यांचा उपयोग औषधांत होतो. यांचे तंतू काढता येतात. बियांपासून निघणारे ‘बेन ऑइल’ हे ऑलिव्ह ऑइल इतकेच महत्वाचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शेवग्यापासून मिळणारे पोषकतत्त्वे. शेवग्यामध्ये

संत्र्यापेक्षा सात पट अधिक जीवनसत्व ‘क’ आहे. दुधापेक्षा चौपट कॅल्शियम आहे. गाजरापेक्षा चौपट जीवनसत्व ‘अ’ असते. दुधापेक्षा दुप्पट प्रथिने आणि केळीपेक्षा तिप्पट पोटॅशियम असते. याचे हे सर्व पौष्टिक गुण पाहता रोज एक ग्लास दूध नाही पिले तरी चालेल; पण रोज एक चमचाभर शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ली पाहिजे, असे मला वाटते. हल्ली बाजारात शेवग्याच्या सुकवलेल्या पानांची पावडर ‘हेल्दी मोरिंगा पावडर’ म्हणून मिळते. पण शेवग्याच्या झाडाची कोवळी पाने सावलीत सुकवूनसुध्दा ती आपल्याला आहारात वापरता येतात.

अशा या बहुगुणी हदगा आणि शेवग्याची वाढ अगदी हलक्या, मुरमाट जमिनीतही चांगल्या प्रकारे होते. वर्षभरात याला फुले, शेंगा लागायला सुरवात होते. परंतु एक गैरसमज आहे की, शेवग्याचे झाड दारापुढे लावू नये. हे झाड अतिशय ठिसूळ असते, म्हणून आपल्या येण्या-जाण्याच्या रस्त्यात दारापुढे ते लावू नये; परंतु इतरत्र लावला तर चालेल. परंतु हा समज अंधश्रद्धाच बनली आणि शेवगा परसबागेतून हद्दपारच झाला. त्याचे दर्शनही अशुभ मानले जाऊ लागले. या सद्गुणी झाडाच्या फायद्यापासून आपण वंचित राहिलो.

हल्ली शहरातले लोकांच्या आहारात त्याच त्यात ठरलेल्या भाज्या असतात. त्यामुळे शरीराचे नीट पोषण होत नाही. परिणामी काही आजार झाले की डॉक्टर्स त्यांना टॉनिक किंवा सप्लिमेंट देतात. पण जर आपण आहारालाच औषध मानले तर ही वेळ येणार नाही.

मोह, शेवगा, हदगा यांची रोपे नर्सरीत विकत मिळतात किंवा त्याच्या चागल्या प्रतीच्या बियांपासूनदेखील झाड चांगले येते. शेवगा-हदग्याची महिन्याभरात दहा फुट वाढ होऊ शकते. लागवडीपासून वर्षाच्या आत त्याला फुले-शेंगा लागतात. बाजारातली दोन हजार रूपये किलो भाव असणारी ‘मोरिंगा पावडर’ अर्थात शेवग्याच्या पानांची पावडर विकत आणून खाण्यापेक्षा घरीच शेतात चार-दोन झाड लावली तर घरी खाण्यासाठी पौष्टिक भाजी मिळेल. जास्त उत्पादन झाले तर बाजारात विकून उत्पन्न मिळेल.

हल्ली शेतकऱ्यांना बांध, त्यावर झाडे नको असतात. शेतातल्या पिकाचे उत्पन्न कमी होईल, असे त्यांना वाटते. पण शेतात मिळालेले जास्त उत्पन्न आजारी पडले की दवाखान्यात घालावे लागते, याची जाणीव झाल्यास शेतकरी नक्कीच आपल्या शेतात असा ‘पोषण समृद्ध बांध’ तयार करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com