शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रगतशील शेतकरी आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी उसामध्ये ‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राचा प्रयोग केला आहे. यंदा उन्हाळ्यातही त्यांनी याच तंत्राने पाच एकरांत टोमॅटोदेखील घेतला आहे. त्याचे उत्पादन लवकरच सुरू होईल. दुष्काळासारख्या गंभीर परिस्थितीत पाणी बचत आणि उत्पादनावाढीचा दुहेरी मेळ यातून साधण्याचा प्रयत्न आहे. दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी गावात आनंदकुमार अंत्रोळीकर यांची वडिलोपार्जित सुमारे ३५ एकर शेती आहे. त्यांचे वडील (कै.) नानासाहेब अंत्रोळीकर हे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून जिल्ह्यात परिचित होते. शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व कळावे, त्याच्या वापराबाबत समज यावी यासाठी नानासाहेबांनी महत्त्वाचे काम केले. शेतकऱ्यांची सहकारी तत्त्वावरील पहिली जलसिंचन उपसा योजना त्यांनी चालवली. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत आनंदकुमार कार्यरत आहेत. ‘बीएस्सी’ची पदवी घेतल्यानंतर काही दिवस त्यांनी शेताचा अनुभव घेतला. त्या वेळी त्यांची २५ एकर द्राक्षबाग होती. पाण्याअभावी ती काढून टाकावी लागली. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सल्लागार म्हणूनही आनंदकुमार यांनी अनुभव घेतला. सन २०११ नंतर मात्र ते पूर्णवेळ शेतीकडे वळले. ऊस, केळी, पपई असे विविध प्रयोग त्यांनी केले. मात्र, सततच्या दुष्काळामुळे पर्यायाने पाण्याच्या कमतरतेमुळे ठरावीक पिकांवरच त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ठिबक सिंचनातील ‘सबसरफेस’ या तंत्राकडे ते वळले आहेत. शेततळ्याचा झाला फायदा पाण्यासाठी दोन विहिरी आणि चार-पाच बोअर्स आहेत. पण विहिरी कोरड्या आणि बोअरला जेमतेम पाणी अशी स्थिती आहे. पुन्हा बोअर घेऊन जमिनीची चाळणी करण्यापेक्षा आनंदकुमार यांनी शेततळ्याचा पर्याय निवडला. सन २०१५ मध्ये पावणेदोन एकरांत सुमारे १५ लाख रुपये खर्चून शेततळे उभारले. त्याची साठवण क्षमता सुमारे दोन कोटी लिटर आहे. त्याच्या उभारणीनंतर एकच चांगला पाऊस झाला. शेततळे पूर्णपणे भरले. त्यानंतर गेल्या दोन-अडीच वर्षांत पाऊस झालाच नाही. मात्र, पाण्याच्या काटेकोर वापरामुळे आज शेततळ्यात ५० लाख लिटर पाणी शिल्लक आहे. ‘सबसरफेस’ तंत्राचा प्रयोग सन २०१७ मध्ये सुमारे दहा एकरांत ऊस लावला. या संपूर्ण क्षेत्राला सबसरफेस तंत्राचा वापर केला. पण पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे हा ऊस अवघ्या दहाच महिन्यांत काढावा लागला. एकरी ५५ टनांपर्यंत त्याचे उत्पादन मिळाले. आणखी दोन महिने ऊस शेतात राहिला असता तर हेच उत्पादन १० टनांनी निश्चित वाढले असते. उसातील प्रयोगामुळे उत्साह वाढला. पण पुढे उन्हाळा सुरू होणार होता. पाण्याची जेमतेम उपलब्धता आणि दुष्काळाची वाढती भीषणता यामुळे सबसरफेस पध्दतीने एकाच पिकावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. त्यासाठी टोमॅटो घेण्याचा निर्णय घेतला. त्याचे पाणी व्यवस्थापनही काटेकोर केले. सबसरफेस तंत्रामुळे टोमॅटोच्या थेट मुळाशी पाणी जात असल्याने आणि आवश्यक तेवढेच ते मिळत असल्याने भर ४५ अंश सेल्सियस तापमानातही टोमॅटोची आशादायक वाढ सुरू होती. महिनाभरात प्रत्यक्ष काढणीस सुरवात होईल. पिकाच्या मधल्या ओळीतील अंतरात पाचट अंथरले. तसेच सरीवर प्लॅस्टिक मल्चिंग केले. या सर्व बाबींचा फायदा होत आहे. चढ-उताराच्या क्षेत्रात पाणी कमी-अधिक पध्दतीने उपलब्ध होण्याची शक्यता असते. सबसरफेस पध्दतीत ‘पीसीएनडी’ या तंत्राद्वारे ते सर्वत्र समान पध्दतीने पुरवण्यात आले ‘सबसरफेस’ तंत्राचे उन्हाळ्यात झाले फायदे
सहकारी तत्त्वावर जलसिंचन योजना (कै.) नानासाहेब अंत्रोळीकर यांनी गावातील शेतकऱ्यांची पाण्याची अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांना एकत्र केले. त्या दृष्टीने १९८८ मध्ये जय हनुमान सहकारी तत्त्वावरील उपसा जलसिंचन योजना तयार केली. त्या माध्यमातून भीमा नदीवरून सात किलोमीटरवरून पाइपलाइनद्वारे गावात पाणी आणले. सुमारे दीडशे शेतकऱ्यांच्या साडेपाचशे एकर क्षेत्राला थेट शेतात पाणी पोचवले. सन २०१५ पर्यंत ही योजना सुरू होती. मात्र अलीकडील काही वर्षांत सततच्या दुष्काळामुळे नदीलाच पाणी नसल्याने आणि पाइपही जुने झाल्याने ही योजना चार वर्षांपासून बंद आहे. मात्र जिल्ह्यातील एकमेव सहकारी तत्त्वावरील पाणी पुरवठा संस्था म्हणून तिचा नावलौकिक राहिला आहे. सध्या आनंदकुमार हेच संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. संपर्क-आनंदकुमार अंत्रोळीकर- ९८२२२८५८२५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.