Water Conservation
Water ConservationAgrowon

Charlotte Lake : ब्रिटिशकालीन ‘शारलोट’ गाळात

Water Conservation : शहरातील नागरिकांची तहान भागवणाऱ्या ब्रिटिशकालीन शारलोट तलावाची पातळी खालावली आहे.

Matheran News : शहरातील नागरिकांची तहान भागवणाऱ्या ब्रिटिशकालीन शारलोट तलावाची पातळी खालावली आहे. तलाव गाळाने भरल्‍याने साठवण क्षमता कमी झाली आहे. त्‍यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्‍यता असल्‍याने किमान यंदा तरी पावसाळ्यापूर्वी तलावातील गाळ काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

माथेरानमध्ये दरवर्षी अतिवृष्‍टी होते, मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तलावात पाणी कमी आणि गाळ जास्‍त अशी स्‍थिती आहे. सध्या शहरात नेरळ-कुंभे येथून पाणीपुरवठा होत आहे.

शारलोट तलावाची देखभाल-दुरुस्‍ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येत असून शुद्धीकरण करून पाणी शहरात वितरित केले जाते. शहरात येणाऱ्या पर्यटकांसह स्‍थानिकही हेच पाणी वापरतात. मात्र नऊ वर्षांपासून तलावाची साफसफाई करण्यात आलेली नाही.

पावसाळ्यात तीन दिशांचे पाणी तलावात वाहत येत असून जमिनीची धूप होत असल्‍याने मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. २०१५ मध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीसदस्यांमार्फत तलावाची साफसफाई करून गाळ काढण्यात आला होता. त्‍यानंतर नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्‍यामुळे शारलोट तलावाच्या देखभाल-दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष झाल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे.

Water Conservation
Water Conservation : वास्तुविशारदाची दुर्गम भागात जलसंधारणासाठी धडपड

तलावाची खोली ६० फूट असून लांबी ५०० मीटर व रुंदी ८० मीटर आहे. शारलोट तलाव ऑक्टोबरपर्यंत तुडुंब भरलेला असतो. शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता, तलावातील पाणी फक्त चार महिने पुरते. यासाठी एमजेपी अधिकारी तलावातील पाणी उपसा कमी करीत आहे. सध्या तलावात साठवण क्षमता ४० फुटापर्यंत असून जवळपास २५ फूट गाळ साचल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.

गतवर्षाची पुनरावृत्ती नको

गतवर्षी शारलोट तलाव गाळमुक्त करण्यासाठी नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी एकत्र येत तयारी सुरू केली. पालिकेकडून निधीची तरतूदही करण्यात आली होती, पण तलावातील पाणी सोडण्याबाबत पाणी वाहून जाणाऱ्या मार्गातील गावातील लोकांना माहिती न दिल्‍याने काम थांबले. याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, यासाठी कामाचे नियोजन एप्रिलपासूनच करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

Water Conservation
Water Conservation : कोठलीत जलसंधारणातून टंचाईशी लढा

ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पत्‍नीचे नाव

माथेरान शारलोट तलावाची निर्मिती ब्रिटिशकाळात झाली. १८५६ मध्ये फुलर नावाच्या अधिकाऱ्याने तीन दिशांहून येणारे पाणी एकत्र करत शारलोट तलावाची उभारणीचे नियोजन केले. बांध टाकून एक छोटा तलाव पूर्ण केला आणि तलावाला आपल्या पत्नीचे नाव शारलोट दिले. त्‍यानंतर काही वर्षांनी तत्कालीन नगराध्यक्ष गोपाळराव शिंदे यांनी या तलावाची पातळी वाढवली, तेव्हापासून तलावाचे पाणी शहरवासीयांना उपलब्‍ध होत आहे.

निधी मिळत नसल्‍याने काम रखडले

पूर्वी माथेरानमध्ये एमजेपीच्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार देऊन आठ ते दहा दिवस शारलोट तलावातील गाळ काढला जायचा. त्यामुळे साठवण क्षमता वाढून स्वच्छ पाणी माथेरानकरांना मिळायचे. १० वर्षांपासून एमजेपीकडून निधी मिळत नाही असे सांगितले जाते. त्‍यामुळे नगरपालिका आणि एमजेपी यांनी मनुष्यबळ लावून संयुक्तरीत्‍या काम करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com