Monsoon 2024 : मनमौजी मॉन्सून

Monsoon Update : मॉन्सूनच्या देशात, महाराष्ट्रात आगमनाच्या तारखा ठरलेल्या असल्या, तरी दरवर्षी मॉन्सून या ठरावीक तारखेवरच येईल असे काही नाही. एवढेच नव्हे तर मॉन्सूनच्या पावसाचे स्वरूपही दरवर्षी वेगळे असते.
Monsoon
Monsoon Agrowon
Published on
Updated on

Indian Monsoon : मागील चार-पाच दिवसांपासून राज्यात मॉन्सूनच्या सुखद सरी बरसत आहेत. तीव्र दुष्काळानंतर पडत असलेल्या मॉन्सूनच्या पावसाने सर्वत्र चैतन्य पसरले आहे. पावसाच्या आगमनाने भयंकर अशा उकाड्यातून सुटका झाल्याचा अनुभव अनेक जण घेत आहेत. वाढत्या तापमानात तापलेली भुईही पावसाच्या सरींनी तृप्त झाली आहे.

देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आणि शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आणि त्यात दमदार पावसाने सुरुवात झाल्याने बाजारातही चैतन्याचे वातावरण आहे. केरळमध्ये सर्वसाधारणपणे एक जूनला मॉन्सून दाखल होतो. तिथून आठ-दहा दिवसांचा प्रवास करीत सर्वसाधारणपणे १० जूनपर्यंत राज्यात मॉन्सूनचे आगमन होते.

परंतु या वर्षी केरळमध्ये दोन दिवस अगोदर (३० मे) तर राज्यात निर्धारित वेळेच्या चार दिवस आधीच (६ जून) मॉन्सून पोहोचलाय. मॉन्सूनची वाटचाल चांगली सुरू असल्याने लवकरच तो राज्य, देश व्यापेल. हे ‘ला-निना’चे वर्ष असल्याने देशभर पाऊस चांगला पडेल, त्याची झलक सुरुवातीला दिसतही आहे.

मॉन्सूनच्या देशात, महाराष्ट्रात आगमनाच्या तारखा ठरलेल्या असल्या, तरी दरवर्षी मॉन्सून या ठरावीक तारखेवरच येईल असे काही नाही. एवढेच नव्हे तर मॉन्सूनच्या पावसाचे स्वरूपही दरवर्षी वेगळे असते. त्यामुळेच त्याला मनमौजी देखील म्हटले जाते.

Monsoon
Monsoon Update : मॉन्सून संभाजीनगरपर्यंत

मॉन्सून कधी लवकर येतो तर कधी उशिरा, कधी लवकरच देश व्यापतो, तर कधी त्याच्या या प्रवासात काही अडथळे आले तर तो भारतभर पसरण्यास उशीर लागतो. कधी पावसाची रिपरिप सतत (झड) सुरू असते, तर कधी पावसाची उघडझाप पाहावयास मिळते. कधी दोन पावसांत मोठे खंडही पडतात, तर कधी एक-दोन दिवसांत अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण होते.

कधी पाऊस लवकर काढता पाय घेतो, तर कधी परतीचा पाऊस राज्यात मुक्काम वाढवत बसतो. परंतु तो दरवर्षी हमखास येतो, आपल्या मनाचा मालक असल्याप्रमाणे बरसतो. मॉन्सून आलाच नाही, असे मात्र कदापिही घडले नाही. विशेष म्हणजे मॉन्सूनबाबत भारतीय हवामानशास्त्र विभाग अंदाज वर्तवीत असले तरी मॉन्सून आला हे कसे ओळखायचे?

Monsoon
Monsoon 2024 : माॅन्सून विदर्भात दाखल; राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज

या प्रश्‍नाला सरळ, सर्वसंमत, वैज्ञानिक असे उत्तर नाही. अनेकदा मॉन्सून लवकर येणार असे हवामानशास्त्र सांगते, परंतु पाऊस काही लवकर सुरू होत नाही. या उलट कधी चांगल्या पावसाला लवकरच सुरुवात होते, परंतु तो मॉन्सूनच आहे, असे मानायला हवामानशास्त्र विभाग तयार होत नाही.

मॉन्सून कसाही बरसला तरी तो सर्वांना समाधानकारक ठरेल असेही काही नाही. कारण मॉन्सूनबाबत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. शेतकऱ्यांना पेरणी योग्य ओल झाली की बियाण्याची पेरणी करण्यासाठी उघडीप हवी असते. उघडिपीत चांगल्या ओलाव्यावर पेरणी झाली, की पुन्हा हलका पाऊस हवा असतो. पीकवाढीच्या अवस्थेतही पाऊस तसेच अधूनमधून आंतरमशागतीसाठी उघडीप हवी असते.

शिवाय पीक कापणी-मळणीच्या वेळी देखील उघडीप हवी असते. धो-धो पाऊस शेतकऱ्यांना कधीच नको असतो. धरणांच्या पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्यांना धरणे भरण्यासाठी लवकर अन् धो-धो पाऊस हवा असतो. शहरातील लोकांना कामाला जायच्या-यायच्या वेळी पाऊस नको असतो. मधल्या काळात तो पडला तरी त्यांची काही हरकत नसते. या सर्वांच्या अपेक्षा मॉन्सून कधीच पूर्ण करू शकत नाही.

त्यामुळे आता मॉन्सून देशात दाखल झालाच आहे, तर आपल्या मनमौजी वृत्तीनुसारच तो मनसोक्त बरसेल. आपापल्या गरजेनुसार त्याचे विश्‍लेषण प्रत्येक जण करणार आहेत. एक मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे, पाणी मग ते पिण्यासाठी असो, शेतीसाठी असो की उद्योग-व्यवसायासाठी त्याचा एकमेव स्रोत मॉन्सून आहे. त्यामुळे पाण्याचे संवर्धन आणि वापर सर्वांनी जपून करायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com