Cotton Market : कापूस बाजारात सुधारणेचे संकेत

Cotton Production : देशातील कापूस उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. तर वापर मात्र वाढणार आहे. असे असले तरी सध्या कापसाला हमीभावापेक्षा ५०० ते १००० रुपयांपर्यंत कमी भाव मिळत आहे. उत्पादन कमी असूनही भाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यासाठी देशातील आणि जागतिक पातळीवरील कापूस उत्पादन आणि पुरवठा, तसेच देशाच्या आयात-निर्यातीचा आणि भविष्यातील बाजारभावाचा घेतलेला आढावा...
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Cotton Market Update : जागतिक कापूस उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागातर्फे (युएसडीए) वर्तविला जात आहे. पण भारतासह इतर देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज बदलू शकतात, याची दाट शक्यता आहे. मागील हंगामात म्हणजेच २०२३-२४ मध्ये जगात कापसाचे एकूण उत्पादन १ हजार ४६० लाख गाठींवर झाले होते.

मात्र यंदा उत्पादन ३५ लाख गाठींनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाचे म्हणजेच २०२४-२५ च्या हंगामात कापूस उत्पादन १ हजार ४८९ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. जागतिक कापूस उत्पादन यंदा पाच वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचण्याचा अंदाज आहे. यापूर्वी २०२०-२१ मध्ये १ हजार ५५२ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते.

यंदा जागतिक कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. मात्र जागतिक कापूस वापरही गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचेल, असेही ‘यूएसडीए‘ने म्हटले आहे. मागील हंगामात जगात १ हजार ४५६लाख गाठी कापसाचा वापर झाला होता. मात्र यंदा कापूस वापर १ हजार ४८० लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जागतिक कापूस वापर (लाख गाठी)

वर्ष…उत्पादन…वापर

२०२४-२५…१४८९…१४८०*

२०२३-२४…१४५४…१४५६

२०२२-२३…१४७८…१४१८

२०२१-२२…१४६०…१४९०

२०२०-२१…१४१४…१५६३

२०२०-२१…१५५२…१३१७

२०१८-१९…१५१७…१५४१

(*चालू वर्षाचे अंदाजित आकडे आहेत)

कोणता देश सर्वाधिक उत्पादन घेतो?

लागवड क्षेत्र कमी असूनही चीन भारतापेक्षा जास्त कापूस उत्पादन घेतो. गेल्या हंगामात एकूण जागतिक कापूस उत्पादनात चीनचा वाटा २४ टक्क्यांवर होता. २०२२-२३ च्या तुलनेत चीनचा टक्का घसरला. भारताचीही तीच परिस्थिती असून भारताचा वाटा २२.६६ टक्के होता. अमरिकेमध्ये एकूण जागतिक उत्पादनापैकी १०.२२ टक्के उत्पादन घेतले जाते.

Cotton Market
Cotton Market : परभणी बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकरी नोंदणी सुरु

विविध देशांचा जागतिक उत्पादनातील वाटा (टक्के)

देश…२०२२-२३…२०२३-२४

चीन…२५…२४

भारत…२४.६१…२२.६६

अमेरिका…१२.६९…१०.२२

ब्राझील…११.६३…१२.७२

ऑस्ट्रेलिया…४.४४…४.४०

टर्की…४.३७…२.८१

इतर…१७.२६…२३.१९

देशनिहाय कापूस उत्पादन

‘यूएसडीए‘ने यंदा महत्त्वाच्या कापूस उत्पादक काही देशांमधील कापूस उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला. त्यामध्ये चीन, अमेरिका आणि ब्राझील आणि टर्की या देशांचा समावेश आहे. चीनमध्ये यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत ५४ लाख गाठींनी उत्पादन वाढीचा अंदाज आहे. चीनमध्ये मागील दोन हंगामात कापूस उत्पादकांना चांगला परतावा मिळाला. त्यामुळे चीनमधील शेतकऱ्यांनी कापसाची लागवड वाढवली.

भारतात मात्र यंदा लागवड १० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. यंदाही गुलाबी बोंड अळी आणि पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याचा फटका पिकाला बदला आहे. त्यामुळे यंदा ‘यूएसडीए‘ने भारतातील कापूस उत्पादन कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला. मात्र यंदाही भारतातील उत्पादन ‘यूएसडीए‘च्या अंदाजापेक्षा कमीच राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशनिहाय कापूस उत्पादनाचा अंदाज (लाख गाठी)

देश…२०२३-२४…२०२४-२५*

चीन…३४९..३६१

भारत…३२५…३०७

अमेरिका…१५३…१८१

ब्राझील…१८५…२१५

पाकिस्तान…८९…७३

ऑस्ट्रेलिया…६४…६४

टर्की…४१…५१

(*चालू वर्षाचे अंदाजित आकडे आहेत)

देशनिहाय कापूस वापराची स्थिती

अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा चीन आणि पाकिस्तान वगळता महत्त्वाच्या कापूस वापरकर्त्या देशांचा वापर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. चीनचा कापूस वापर यंदाही वाढून मागील वर्षीच्या ४९२ लाख गाठींवरून ४८६ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर भारतातील कापूस वापर ३२० लाख गाठींवरून ३२६ लाख गाठींवर पोचण्याचा अंदाज आहे. यासोबतच यंदा बांगलादेश, व्हिएतनाम आणि टर्की या देशांमधील कापूस वापरही वाढेल, असा अंदाज ‘युएसडीए‘ने दिला.

Cotton Market
Cotton Rate: कापसाच्या भावात नरमाई

महत्त्वाच्या देशांचा कापूस वापर (लाख गाठी)

देश…२०२३-२४…२०२४-२५

चीन…४९२…४८६

भारत…३२०…३२६

पाकिस्तान…१२४…१२३

बांगलादेश…९८…१००

व्हिएतनाम…८४…८८

टर्की…८४…९६

भारतातील कापूस पिकाची स्थिती

देशात यंदा कापसाची लागवड कमी झाली. मागील हंगामात शेतकऱ्यांना खूप दिवस थांबूनही अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यातच कापूस पिकाचा उतारा कमी झाला. उत्पादन खर्च वाढला. बोंड अळीचा प्रादुर्भाव दरवर्षी सुरुच आहे. वेचणीसाठी कापूस विकून जे पैसे त्याच्या तब्बल २५ टक्क्यांपर्यंत द्यावे लागतात. कापूस पिकाला मिळालेला भाव आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसला नाही.

त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये लागवड क्षेत्रात झालेली घट मोठी आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही लागवड घटली. त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कापूस पिकाला पावसाचा मोठा तडाखा बसला. परिणामी पिकाचे नुकसान वाढले. हेक्टरी उत्पादकतेवर याचा परिणाम झाला. त्यामुळे यंदा देशातील उत्पादन कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Cotton Market
Cotton Rate : ओल्या कापसाला बाजारात ६४०० ते ६८०० रुपये दर

देशातील उत्पादनाचे अंदाज

देशातील घटलेली लागवड आणि पिकाचे झालेले नुकसान यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट येईल, असा अंदाज केंद्र सरकारसह सर्वच संस्थांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने नुकतेच आपला खरिपातील पीक उत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केला. या अंदाज देशातील कापूस उत्पादन २९९ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज दिला.

विशेष म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) आणि अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (युएसडीए) अंदाजाच्या तुलनेत सरकारचा उत्पादनाचा अंदाज कमी आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदा देशात ३०२ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला. तर अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा भारतात ३०२ लाख गाठी उत्पादन होईल, असे आपल्या ऑक्टोबरच्या अहवालात म्हटले आहे. नोव्हेंबरचा अहवाल पुढील दोन दिवसांमध्ये येईल. ‘युएसडीए‘ने आपल्या नोव्हेंबरच्या अहवालात देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी होईल, अशी शक्यता आहे.

देशातील उत्पादनाचे अंदाज

२९९ लाख गाठी

केंद्र सरकार

३०२ लाख गाठी

सीएआय

३०७ लाख गाठी

युएसडीए

‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया‘ने आपला अंदाज जाहीर करताना मागील ५ वर्षांतील जास्तीत जास्त उत्पादकता गृहीत धरली आहे. त्यामुळे उत्पादनाचा अंदाज ३०२ लाख गाठींवर आला, असे या असोसिएशनने जाहीर केले आहे. दिवाळीच्या आधी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात झालेल्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सीएआयच्या अंदाजात चालू महिन्यात कपात होऊ शकते. तसे संकेतही मिळत आहेत. ‘सीएआय'ने पीक नुकसानीचा आढावा घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत याची चर्चा करून सुधारित अंदाज दिला जाईल, असे ‘सीएआय'चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले.

Cotton Market
Cotton Crop Disease : कापूस पिकावरील दहिया रोगाचे नियंत्रण

भारत कापसाचा आयातदार बनला?

१) भारतात मागील पाच वर्षांपासून कापूस उत्पादनात सातत्याने घट येत आहे. तर दुसरीकडे देशाचा कापूस वापर वाढत आहे. देशात जिनींग आणि सूतगिरण्या वाढल्याने कापसावरील प्रक्रिया वाढली. त्यामुळे भारताची निर्यात कमी झाली. २०२१ मध्ये देशातून ४३ लाख गाठींच्या दरम्यान निर्यात झाली होती. पण ती मागील हंगामात म्हणजेच २०२३-२४ च्या हंगामात केवळ २८ लाख गाठींपर्यंत कमी झाली. चालू हंगामात देशातील उत्पादन आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तशी परिस्थिती सध्या दिसत आहे. त्यामुळे चालू हंगामात देशातून होणारी निर्यात कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२) भारताने २०२३-२४ च्या हंगामात १७ लाख गाठी कापूस आयात केला होता. तर २८ लाख गाठींची निर्यात केली होती. मात्र यंदा हे चित्र उलटे दिसण्याची शक्यता आहे. भारत यंदा निर्यातीपेक्षा आयात जास्त करण्याची शक्यता आहे. भारत यंदा १८ लाख गाठी निर्यात करेल आणि २५ लाख गाठी आयात करेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिला. म्हणजेच प्रथमच भारत निर्यातीपेक्षा आयात जास्त करेल. यामुळे भारत आता कापसासाठीही आयातीवर अवलंबून राहील, असे चित्र दिसत आहे.

हंगामातील परिस्थिती काय?

- देशातील कापूस लागवड गेल्यावर्षीपेक्षा १० टक्क्यांनी कमी.

- पाऊस, बोंडअळीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

- देशातील कापूस उत्पादन ३०० लाख गाठींपेक्षा कमी होण्याचा अंदाज.

- देशातील कापूस वापर ३२६ लाख गाठींवर होण्याची शक्यता.

- भारतातील उद्योगांना कापसाची टंचाई निर्माण होणार.

- भारत प्रथमच निर्यातीपेक्षा आयात जास्त करणार.

- भारताची निर्यात मागील वर्षीच्या २८ लाख गाठींवरून कमी होऊन यंदा १८ लाख गाठींवर स्थिरावणार.

- भारताची आयात चालू हंगामात २५ लाख गाठींवर पोचण्याचा अंदाज.

- कापसाची निर्यात चालू हंगामात १८ लाख गाठींवर स्थिरावणार.

- कापसाची आयात गेल्यावर्षीच्या तुलनेत ७.५० लाख गाठींनी वाढणार.

- कापसाची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा १०.५० लाख गाठींनी कमी होणार.

कापूस बाजारातील स्थिती

बाजारात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजारांचा भाव मिळत आहे. तर लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव ७ हजार ५२१ रुपये आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कापसामध्ये बहुतांशी ठिकाणी ओलावा जास्त आहे. तसेच दिवाळीआधी झालेल्या पावसाचा फटका कापसाला बसल्याने गुणवत्ताही कमी झाली आहे.

त्यामुळे बाजारात या कापसाला सध्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. पण पुढच्या आठवडाभरात बाजारात गुणवत्तापूर्ण कापसाचे प्रमाण वाढेल. या कापूस खरेदीसाठी सीसीआय बाजारात असेल. हमीभावाने कापूस खरेदीसाठी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कापूस बाजाराला हमीभावाचा आधार असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक चणचण नसेल तर हमीभावापेक्षा कमी भावात कापूस विक्री टाळावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

बाजाराची दिशा काय राहील?

देशातील कापूस उत्पादन आणि वापर याचा विचार केल्यास देशातील कापूस बाजार जास्त दिवस सध्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता कमीच आहे. सीसीआयची बाजारात खरेदी वाढल्यानंतर हमीभावाचा आधार निर्माण होईल. यंदा उत्पादन कमी असल्याने उद्योगही खरेदीत उतरत आहेत. त्यातच कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क कायम आहे.

सध्या भारताच्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असले तरी अमेरिका, ब्राझील किंवा इतर देशांमधून कापूस आयात करायची म्हटल्यास तेथील बाजारभाव, वाहतूक भाडे आणि ११ टक्के शुल्कासह त्या कापसाचा भावही देशातील भावाबरोबर येतो. चीन, अमेरिका आणि भारताचा कापूस हंगाम सुरु झाला. ब्राझीलचा कापूस मे महिन्यानंतर काढणीला येतो. ऑस्ट्रेलियाचा कापूस मार्चपासून बाजारात येतो. मात्र ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश मिळून १७ टक्के उत्पादन घेतात

जागतिक बाजाराची खरी भिस्त ही आघाडीच्या तीन देशांवरच असते. भारताचे उत्पादन यंदा घटणार असले तरी वापर मात्र वाढणार आहे. त्यामुळे आयात वाढीचा अंदाज आहे. भारताची निर्यात कमी होऊन आयात वाढली तर जागतिक बाजारात कापसाला आधार मिळेल. कारण भारत ज्या देशांना कापूस निर्यात करतो ते देशही भारताची निर्यात कमी झाल्याने इतर देशांकडून कापूस घेतील.

ही परिस्थिती जागतिक बाजारात कापूस सुधारणेला पोषक ठरेल. देशातही उद्योगांना कापसाची गरज आहेच. दुसरीकडे कच्च्या तेलाचे भावही स्थिर आहेत. त्यामुळे पॉलिस्टरचे भाव टिकून आहेत. सरकीचे भावही चांगले आहेत. हे सर्व घटक कापूस बाजाराला आधार देणारे आहेत. त्यामुळे कापसाची मुख्य हंगाम डिसेंबरपर्यंत भावपातळी एका मर्यादेत राहण्याचा अंदाज आहे.

मात्र डिसेंबरनंतर कापसाच्या दरात वरील सर्व घडामोडींचा आधार मिळेल आणि दर सुधारतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचण नाही त्यांनी किमान हमीभावाने कापूस विक्री करावी. तसेच जे शेतकरी थांबू शकतात त्यांनी तेजीमंदीचा फायदा घेण्यासाठी आपल्या कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करावी. यातून सरासरी भाव चांगला मिळू शकतो. तसेच बाजारातील घटक बदलले की दरावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, हेही लक्षात ठेवावे.

अनिल जाधव, ८३८००८६१६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com