Kesar Mango : लाडका केसर आंबा आला

Mango Season : ग्राहकांचा लाडका केसर आंबा यंदा लवकर येण्याचे संकेत खरे ठरले आहेत. तुळजापूर, पंढरपूर व सांगोला भागातील काही बागांमधील आंबा मार्चअखेर काढायला आला.
Kesar Mango
Kesar MangoAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : ग्राहकांचा लाडका केसर आंबा यंदा लवकर येण्याचे संकेत खरे ठरले आहेत. तुळजापूर, पंढरपूर व सांगोला भागातील काही बागांमधील आंबा मार्चअखेर काढायला आला. केसर आंब्याचे उत्पादन सरासरी राहील, असे दिसत असले तरी सद्यःस्थितीत होत असलेली गळ व नैसर्गिक आपत्तीची भीती यामुळे, ‘पदरात पडेल तेच खरं’ अशी भावना केसर आंबा उत्पादक व्यक्त करीत आहेत.

कोकणा व्यतिरिक्त इतर राज्याच्या इतर भागात ४५ हजार हेक्‍टरवर आंबा लागवड आहे. त्यापैकी साधारणतः १० ते १५ हजार हेक्टर बागा उत्पादनक्षम तर त्यातील काही बागा २० ते २५ वर्षे जुन्या आहेत. नवीन ८ ते १० वर्षातील बहुतेक बागा अतिघन लागवड पद्धतीच्या आहेत. मराठवाड्यासह राज्यातील केसर आंबा बागा साधारणतः: डिसेंबर, जानेवारीमध्ये मोहरतात. यंदा मोहर लागणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान चार टप्प्यांत सुरू राहिले.

Kesar Mango
Kesar Mango : ...तर नोव्हेंबरशेवटी केसर आंब्याला चांगला मोहर शक्य

फेब्रुवारीअखेर बहुतेक सर्वच बागा मोहरल्या. उत्पादकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात व्यवस्थित व्यवस्थापन केल्याने अनेक केसर आंबा बागा पाऊस लांबला तरी नेहमीच्या वेळेपूर्वी महिनाभर आधी म्हणजे नोव्हेंबरमध्येच मोहरणे सुरू झाल्या. सुरवातीला मोहरलेल्या काही बागेतील आंबा २० मार्चनंतर काढणीला आला. वेळीच कल्टारचा वापर, त्यामुळे मोहर लवकर तर आंबा लवकर असे गणित जुळून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

...असे आहेत दर

हापूस, गुजरात केसरला चुकवून आलेला केसर आंबा दरही चांगले घेत आहे. वाशी मार्केटमध्ये चांगल्या केसर आंब्याला २०० ते २१० रुपये प्रतिकिलोचा तर दुय्यम दर्जाच्या आंब्याला १३० ते १८० रुपये प्रतिकिलोचा दर आहे.

तर थेट शेतावरून १७५ ते २०० रुपये प्रतिकिलो, मॉलमध्ये ४४५ रुपये प्रतिकिलोपर्यंत तर हातावरच्या विक्रीतून ३०० ते ३५० रुपये प्रति किलोपर्यंतचा केसर आंब्याला दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही बागांना गारपीट, अवेळी पाऊस तसेच कमी पाण्याचा फटकाही बसला आहे.

Kesar Mango
Kesar Mango Management : केसर आंबा बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

अच्छादन व फळसंरक्षक बॅगचा वापर

उन्हापासून तसेच किडींपासून संरक्षणासाठी यंदा मोठ्या प्रमाणात केसर आंबा उत्पादकांनी फळांना संरक्षक बॅग वापरण्यावरही भर दिला. याशिवाय अनेक उत्पादकांनी पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी नैसर्गिक व कृत्रिम साधनांचा वापर करून अच्छादन करण्यावरही भर दिला आहे.

पावसाने गणित बिघडवले

यंदा मराठवाड्यातील केसर आंबा मोहरण्याचे गणित बिघडवण्याचे काम अपेक्षेच्या वेळी न आलेल्या व अपेक्षा नसताना आलेल्या पावसाने बिघडवले. त्यामुळे एक किंवा दोन टप्प्यात येणे अपेक्षित असलेला मोहर चार ते पाच टप्प्यांत आला. एप्रिलमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मोहराचे, मे मध्ये तिसऱ्या, जून मध्यापर्यंत चौथ्या टप्प्यातील मोहराचे उत्पादन येणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

केसर आंब्याचे यंदा सरासरी उत्पादन होईल. वाढत्या तापमानाने गळ होत आहे. नियोजनामुळे हापूस व गुजरातच्या केसरला चुकवून आलेला मराठवाड्यातील केसर आंबा भाव खातो आहे. लवकरच निर्यातही सुरू होईल, त्यामुळे चांगल्या दराची आशा आहे.
- भगवानराव कापसे, आंबा तज्ज्ञ.
आंब्याला दोन टप्प्यात मोहर लागला. पहिल्या टप्प्यातील मोहराचा आंबा काढणीला आला. दुसऱ्या टप्प्यातील आंबा मात्र वाढत्या तापमानामुळे गळतो आहे.
- मिठूभाई चव्हाण, केसर आंबा उत्पादक, छत्रपती संभाजीनगर.
पावसाची अनियमितता, अल्प प्रमाण, ढगाळ वातावरण यामुळे नैसर्गिक संकटे आली. पहिल्या टप्प्यातील आंबा २०० ग्रॅमपर्यंत झाला. यंदा तालुक्यात काही ठिकाणी मोठी आंबा गळ होत आहे.
- भरत पाटील सूळ, केसर आंबा उत्पादक, डोलखेडा बु. जाफराबाद, जि. जालना.
यंदा केसर आंबा चांगला आहे. हा आंबा निर्यातीसाठी जाईल. लोकल बाजारात १४० ते १५० रुपये प्रति किलो दर आहे.
- तानाजी वाडीकर, केसर आंबा उत्पादक, नागलगाव, ता. उदगीर, जि. लातूर
यंदा पहिल्याच वर्षी आंबा चांगला आलाय. १२ एकर १२ बाय ६ फुटावर लागवड केलेली आहे. प्रत्येक झाडाला किमान ३० ते ४० फळे आहेत. फळे आता २०० ते ३०० ग्रॅमच्या दरम्यान आहेत.
- व्ही. जी. चौधरी, केसर आंबा उत्पादक, पार्डी, ता. वाशी, जि. धाराशिव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com