
Solapur Siddheshwar Sugar Factory Update : सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर कारखान्याची काल चिमणी पाडण्यात आली. सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा होत असल्याचे कारण देऊन ही कारवाई केली. दरम्यान या कारखान्याच्या चिमणी पाडण्यावरून मोठं राजकारण रंगल्याने हा विषय राज्यभर गाजला होता.
चिमणी पाडण्यापूर्वीपासून 18 तारखेपर्यंत सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. काल (ता.१५) शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावत या कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. यापूर्वी जवळपास ५०० हून अधिक शेतकरी सभासद, कामगार आणि कारखाना समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेत कार्यवाही केली होती.
दरम्यान या कारखान्याच्या माध्यमातून कित्येक वर्ष अनेकांचा संसार चालू होता तो आता बंद पडल्याने काहींना टाहो फोडला. हा कारखाना बंद पडल्याने अनेकांच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला.
या कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर एका महिलेने आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आता उद्या मी कुठे जाऊ, असे स्वत:शीच पुटपुटत त्या महिलेने डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत नुसती चिमणी पडली नाही तर ''माझा संसार पडलाय ओ, माझा आधार गेलाय'' म्हणत कारखान्यातील अपंग कामगाराच्या पत्नीने टाहो फोडला अन् काही काळ वातावरण सुन्न झालं.
चीमणी पाडल्यानंतर जे काही मातीचे लोट उडाले त्या अनेक सभासद शेतकरी आणि कामगारांच्या ताटात कालव्याचे बोलले जात होते.
टाहो फोडणाऱ्या महिलेचे नाव सुलोचना श्रीशैल कोळी, असे होते. मूळचे कुंभारीचे असलेले श्रीशैल कोळी हे २२ वर्षांपूर्वी कारखान्यात काम करत होते. कोळी यांचे तिसरीपर्यंत शिक्षण, दोन भाऊ व एक बहीण असून घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे वयाच्या १८ व्या वर्षी ते कारखान्यात कामाला लागले. त्यांच्या या नोकरीच्या वेतनातून घराला आर्थिक हातभार मिळायचा.
या कारखान्यातील नोकरीच्या आधारावर १५ वर्षांपूर्वी त्यांना कॉटर्समध्ये जागा मिळाली. परंतु श्रीशेल यांचा अपघात झाल्याने त्यांना कारखान्यातील कष्टाच्या कामांना मुकावे लागले. याबाबत कारखाना सांभाळणारे धर्मराज काडादी यांना ही माहिती देऊन त्यांना शिपाई म्हणून नुसते बसून राहण्याचे काम दिले. तर त्यांच्या पत्नीलादेखील चिमणी परिसरातील साफसफाईचे काम दिले. काडादी यांच्यामुळे या पती-पत्नीच्या हाताला काम मिळाले. आणि एकमेकांना आर्थिक आधार भक्कम होत गेला.
परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चिमणी राहील आणि रोजगार असेल, असा विश्वास त्यांना वाटत होता. परंतु काल दुपारी चिमणी पाडण्याच्या अंतिम टप्प्यात मात्र श्रीशैल कोळी, त्यांची पत्नी सुलोचना आणि तिन्ही मुले घराच्या उंबरठ्यावर बसून चिमणीसोबत आपला संसारही उध्दवस्त होत असल्याचे डोळ्यांने पाहत होते.
एकीकडे ते स्वत:शीच पुटपुटत होते तर दुसरीकडे डोळ्यातून पाणी वाहत होते. ज्यावेळी चिमणी कोसळली तेव्हा सुलोचना यांनी एकच टाहो फोडला. चिमणी नाही ओ, माझा संसार पडलाय, माझा आधार गेलाय. चिमणी आमच्यासाठी माय-बाप होती, आता आम्ही कसे जगायचे असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल त्यांनी केला.
चिमणीवरून राजकीय वाद
दरम्यान, सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यावरून राजकीय वाद रंगला आहे. चिमणी पाडल्यामुळे कारखाना बंद पडणार, लोकांचा रोजगार जाणार असे सांगत विरोधक भाजपला लक्ष्य करत आहेत. तर चिमणी पाडण्यामुळे केवळ सहवीजनिर्मिती प्रकल्पावर (कोजनरेशन) परिणाम होईल, कारखाना बंद पडणार नाही, असे प्रत्युत्तर दिले जात आहे.
सिध्देश्वर कारखान्याचे सुमारे २८ हजार सभासद आहेत. कारखान्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे सात हजार लोकांना रोजगार मिळतो. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, शहर मध्य, मोहोळ व पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघातील भाग येतो.
तसेच शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्येही कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे चिमणी पाडण्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आहेत.
यासंदर्भात सकाळच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक अभय दिवाणी म्हणाले की, चिमणी पाडण्याच्या कृतीमुळे आर्थिक, सामाजिकबरोबरच राजकीय परिणामांनाही सामोरे जावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षाचे एक खासदार आणि चार आमदारांवर थेट तर एका आमदारावर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. व्होट बँकेलाच सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, कॉंग्रसेचे नेते व माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी चिमणी पाडण्याच्या कृतीला विरोध केला. चिमणीमुळे विमानांच्या उड्डाणात अडथळे येत असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी चिमणी पाडण्याला विरोध करणारे पत्र केंद्रीय विमानवाहतुक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना ८ डिसेंबर २०२१ रोजी लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, चिमणी पाडण्याच्या कारवाई नियमानुसार केल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी व्यक्त केली. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी नियमबाह्य होती, कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे ४७८ कलमांतर्गत कारखान्याला ४५ दिवसांची नोटीस बजाविली होती. नोटिशीनुसार कारखान्यावर कारवाई करण्यात आली. नियमांचे व आदेशाचे पालन केले, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.