Agriculture And Rural Develpoment : महिलांमध्ये शेती, ग्रामविकासाचा चेहरा बदलण्याची ताकद...

शेती व्यवस्थापक ते भूमिहीन शेतमजूर असे परिस्थितीनुसार महिलांची जबाबदारी बदलताना दिसते. पीक व्यवस्थापन, पशुधन विकास, फलोत्पादन, काढणीपश्‍चात प्रक्रिया, शेती व जंगल संवर्धन, शेतीपूरक उद्योग तसेच ग्रामविकासामध्ये महिला अतिशय जबाबदारीने काम करतात.
Agriculture And Rural Develpoment
Agriculture And Rural DevelpomentAgrowon
Published on
Updated on

डॉ. माधुरी रेवणवार- कवटिकवार

शेती व्यवस्थापक ते भूमिहीन शेतमजूर असे परिस्थितीनुसार महिलांची जबाबदारी बदलताना दिसते. पीक व्यवस्थापन, पशुधन विकास, फलोत्पादन, काढणीपश्‍चात प्रक्रिया, शेती व जंगल संवर्धन, शेतीपूरक उद्योग तसेच ग्रामविकासामध्ये महिला अतिशय जबाबदारीने काम करतात.

\प्रशिक्षण, नवीन तंत्राची माहिती आणि त्यांच्या श्रमाचे मूल्य दिल्यास शेती, तसेच ग्राम विकासाचा चेहरा मोहरा महिला बदलू शकतात.

वातावरण बदल, नैसर्गिक साधन संपत्तीचा दुरुपयोग आणि ऱ्हास ही सद्यःस्थितीतील भारतीय शेती पुढील आव्हाने आहेत. या आव्हानात्मक शेती व्यवस्थेचा कणा म्हणजे शेतकरी महिला.

तरीदेखील शेती व्यवस्थापनामध्ये व्यस्त असलेल्या महिलांना आजही या व्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान नाही.

देशाच्या विविध हवामानाच्या पट्ट्यांपैकी बेट प्रदेशापासून ते पश्‍चिमी हिमालय प्रदेशापर्यंत १४.०८ ते ७०.७१ टक्के महिला या शेतकरी, शेतमजूर आणि कृषी कामगार म्हणून कार्यरत आहेत. पश्‍चिमी कोरड्या विभागात सर्वांत जास्त महिला (८२.४३ टक्के) शेतीकामामध्ये व्यस्त आहेत.

Agriculture And Rural Develpoment
Dr. Sharad Gadakh : गाईत संपूर्ण अर्थशास्त्र बदलण्याची ताकद

महिलांनीच प्रथम घरगुती स्तरावर पीक लागवडीस सुरुवात केली आणि तेथूनच पुढे शेती विज्ञानाचा शोध लागला.

जेव्हा पुरुष शिकारीसाठी बाहेर जात असत, तेव्हा महिला बाहेर पडून अन्न, चारा, धागे आणि इंधनासाठी विविध प्रकारच्या बिया लागवडीसाठी जमा करत.

जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा जतन करण्याचे अति महत्त्वाचे कार्य महिला अविरत करत आहेत.
शेतीपूरक विकासामध्ये पीक उत्पादन आणि व्यवस्थापन, पशुधन विकास, फलोत्पादन, काढणीपश्‍चात प्रक्रिया, शेती आणि जंगल संवर्धन, मस्त्यपालन अशी अगणित महत्त्वाची कार्य महिला अतिशय जबाबदारीने करतात. अनेक शोध प्रबंधामध्ये दिलेल्या आकड्यांपेक्षाही शेती विकासामध्ये महिलांचे जास्त कार्य आहे.

महिलांचे काम हे व्यवस्थापक ते भूमिहीन शेतमजूर असे परिस्थितीनुसार बदलताना दिसून येते. एकूणच शेतीच्या उत्पादनामध्ये महिलांचा सरासरी सहभाग हा ५५ ते ६६ टक्के मजूर असा आहे. काही भागामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. एका अभ्यासानुसार हिमालयीन विभागामध्ये एक बैलजोडी एका हेक्टरमध्ये प्रति वर्ष १,०६४ तास, पुरुष १,२१२ तास आणि महिला ३,४८५ तास काम करताना दिसून आले आहे.

Agriculture And Rural Develpoment
Rural Development : शेती, ग्रामविकासात ‘लोकप्रबोधन’चा ठसा

शेतीकामातील महिलांचा सहभाग
काम---सहभाग (टक्के)
जमीन मशागत ---३२
पेरणी आणि परिसर स्वच्छता----८०
आंतरमशागत---८६
कापणी, वाळवणे, स्वच्छता आणि साठवण---८४
(संदर्भ ः आयआयपीएस- खंड १३, अंक २, जुलै-२०१८)

महिलांची गरज लक्षात घेऊन संशोधन ः
पारंपरिक शेती पद्धतीमध्ये महिलांना होणारा शारीरिक त्रास, लागणारा अवास्तव वेळ लक्षात घेऊन कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांनी महिलांचे श्रम कमी होण्यासाठी कापूस वेचताना वापरावयाचा कोट, सोयाबीन कापणी मोजे, दूध काढताना वापरावयाचे स्टूल, उभ्याने वापरावयाचे कोळपे, सायकल कोळपे, धान्याच्या चाळण्या, शेंगा फोडणी यंत्र, रोप लागवड यंत्र अशी अनेक छोटी यंत्रे, अवजारे विकसित केली.

यामुळे त्यांचे शेतीमधील काम करताना होणारे शारीरिक कष्ट कमी झाले, वेळेची बचत झाली. प्रयोगशील महिला शेतकरी आता ट्रॅक्टरदेखील चालवू लागल्या आहेत.

शेती, पूरक उद्योगामध्ये महिलांचा सहभाग ः
पशुधन विकास ः

१) वातावरण बदलामुळे शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. कुटुंबाच्या शाश्‍वत उपजीविकेसाठी पशुधनाचा सांभाळ फायदेशीर असल्याने महिला शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, क्वचितच मत्स्य व्यवसायाकडे (२४ टक्के) वळल्या आहेत.


२) एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुधन महत्त्वाचे आहे. जनावरे सांभाळणे, गोठा साफ करणे, दूध काढणे, अंडी विकणे ही अधिकची कामे महिला घरकामासोबतच करतात. ज्यामुळे कुटुंबासाठी अधिकचे आर्थिक उत्पन्न मिळते. विविध संशोधनामधून असे दिसून आले आहे, की महिला पशुपालनामध्ये पुरुषांपेक्षा प्रभावी कामे करतात. परंतु या महिला अकुशल, कमी शिक्षित व पारंपरिकतेमध्ये बांधल्या गेल्या आहेत, त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे.

काढणीपश्‍चात अन्नप्रक्रिया ः
१) काढणीपश्‍चात धान्य स्वच्छता किंवा फळे व भाज्या निवडणे, भरून ठेवणे, प्रतवारी करणे ही कामे प्रामुख्याने महिला करतात. कुटुंबाच्या अन्नाच्या गरजा भागविण्यासाठी सुमारे ६० ते ८० टक्के महिला पीक उत्पादनाकडे लक्ष देतात. ८० टक्के महिला धान्य साठवणुकीचे काम करतात.

साधारण ९० टक्के महिला कुटुंबासाठी इंधन आणि पाणी जमवतात. आजही कौटुंबिक स्तरावर १०० टक्के महिला अन्न प्रक्रिया करतात.

२) विकसित देशांमध्ये ६० ते ८० टक्के महिला पूर्ण जगाला लागणाऱ्या एकूण शेतीमालापैकी ५० टक्के उत्पादन घेत आहेत.


३) घरच्या स्तरावर अन्न पदार्थ निर्मिती प्रत्येक महिला करतेच. अलीकडे महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक गावांत १ ते ३ टक्के महिला अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पीठ गिरणी, मसाला व्यवसाय, पापड, लोणची, शेवई, दुग्ध प्रक्रिया, असे पारंपरिक खाद्य पदार्थ आहेत.

महिला गटांनी प्रक्रिया उद्योगामध्ये वेगळे स्थान तयार केले आहे. अन्न प्रक्रियेसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. यातून आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ मिळत आहे.

विक्री व्यवस्था ः
१) दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवस्था महिलांनी चांगल्या प्रकारे उभी केली आहे. परंतु प्रक्रियायुक्त किंवा इतर शेतीमाल विक्री करताना त्यांना अडचणी येतात. केवळ प्रदर्शन, जत्रा इत्यादी पुरते विक्रीचे मार्ग मर्यादित आहेत. फार कमी महिला स्वत:च्या शेतीमालाचे चांगले पॅकिंग, ब्रॅंडिंग व विक्री व्यवस्था करतात.


२) तयार पदार्थ, शेतीमालाचे योग्य पॅकिंग, ब्रॅंडिंग तसेच विक्रीयोग्य शेतीमाल तयार करण्यासाठी त्यांना आवश्यक यंत्रसामग्रीची गरज आहे. या सर्व गोष्टी मुबलक भांडवलाशिवाय होत नाहीत. यातूनही मार्ग काढत ग्रामीण भागामध्ये काही यशस्वी उद्योजिका तयार झाल्या आहेत.

सामाजिक सहभाग ः
१) पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, परंपरा, शेतकरी महिलांवरील निर्बंध कमी करण्यासाठी तसेच महिलांना मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी ग्रामीण भागात बचत गटांची चळवळ सुरू झाली. या चळवळीने मागील बारा वर्षांमध्ये वेग पकडला.

यासाठी उमेद अभियान, जिल्हा ग्रामीण विकास योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग, नाबार्ड तसेच अनेक संस्था पुढे आल्या. महिला एकत्र आल्यामुळे त्यांना समाजात चालू असलेल्या घडामोडींची जाणीव होऊ लागली.


२) एकूण गटांच्या साधारण ५ ते १० टक्के गटातील महिला उद्योग व्यवसायाकडे वळल्या आहेत. नवनवीन विषयांचे ज्ञान आत्मसात केल्याने त्यांच्यातील विचारांना चालना मिळाली, आत्मविश्‍वास वाढला आहे.

शेतकरी महिला विकासासाठी योजना
ग्रामीण शेतकरी महिला, बचत गटांतील महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन तसेच शेतकरी महिला विकासाचा उद्देश समोर ठेवून शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. ज्यामुळे महिलांना आर्थिक, तांत्रिक पाठबळ मिळत आहे.

राष्ट्रीय प्रशिक्षण सेंटर, राज्य स्तरीय कृषी व्यवस्थापन व विस्तार प्रशिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग तसेच खासगी संस्था महिला विकासाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन करत आहेत. महिलांची सध्याची वाटचाल ही निश्‍चितच प्रगतीकडे जाणारी आहे.


१) प्रधान मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्षम योजना
२) राष्ट्रीय उपजीविका मिशन
३) ग्रामीण कौशल्य योजना


४) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
५) बेटी बचाव, बेटी पढाव


६) प्रधानमंत्री मातृवंदन योजना
७) सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना

महिला शेतकरी विकासामधील अडचणी ः
नवनवीन योजना शेतकरी महिलांच्या विकासासाठी उपलब्ध आहेत. परंतु या योजना मोजक्याच महिलांपर्यंत पोहोचतात. याबाबत समोर आलेली काही महत्त्वाची कारणे ...


१) शेतीमधील बहुतांश काम महिला करत असूनही त्यांना शेती विकासामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही. अजूनही बहुतांश महिलांच्या नावे शेती नाही. महिलांना शेतीमाल विक्रीचा अधिकार नाही.


२) महिलांचे कष्ट कमी करणारे तंत्रज्ञान विकसित असूनही त्यांना ते खरेदी करण्याचा किंवा वापरण्याची मोकळीक नाही.

३) घर किंवा शेतीसंबंधी कोणताही निर्णय घेण्याची मुभा नाही.
४) खूपच कमी महिलांच्या नावे घर, शेती आणि पशुधन आहे.


५) आजही बऱ्याच महिला शेतकरी अशिक्षित आहेत. उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.
६) महिलांसाठी असलेल्या कायद्याची माहिती नाही.


७) महिलांना पुरुषांपेक्षा ३० टक्के कमी मजुरी मिळते.
८) उद्योगांसाठी लागणारे कौशल्य कमी आहे.


९) चांगल्या योजना पोहोचत नाहीत. नवीन काही करण्यासाठी योग्य माहिती मिळत नाही.
१०) ग्रामीण भागात अनेक वेळा पुरुषी अहंकार महिलांच्या प्रगतीच्या आड येताना दिसतो.

संपर्क ः डॉ. माधुरी रेवणवार-कवटिकवार, ९४०३९६२०१४
(प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र,
सगरोळी, जि. नांदेड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com