वाशीम -हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील फाळेगाव (ता. जि. हिंगोली) येथील प्रगतिशील शेतकऱ्यांनी ‘आत्मा’अंतर्गत शेतकरी गट स्थापन केले. कृषी विभागाच्या(Department of Agriculture) महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना (Farmer Producer Company ) चालना मिळाली. प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक धनाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १६ शेतकरी गट एकत्र आले.
त्यातून वसंतराव नाईक शेतकरी उत्पादक संघ स्थापन झाला. फाळेगावचे शेतकरी मारोती वैद्य यांच्या पुढाकारातून त्यातून १५ मे २०१५ रोजी श्री फाळेश्वर महराज शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली. संघाच्या सभासदांनी प्रत्येकी एक हजार रुपये ‘शेअर्स’ जमा करून अडीच लाख रुपये भांडवल उभे केले.
कंपनीचे कार्यक्षेत्र हिंगोली व वाशीम जिल्ह्यातील प्रत्येकी सुमारे आठ अशा सोळा गावांमध्ये विस्तारले आहे. कंपनीच्या शेतकरी सभासदांची संख्या ३५५ झाली आहे. भागभांडवलात १९ लाख १६ हजार रुपयांपर्यंत वृद्धी झाली आहे. आज सतराशेहून अधिक शेतकरी कंपनीशी जोडले आहेत.
संचालक मंडळ पाच सदस्यांचे आहे. त्यात अध्यक्ष मारोती वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष शोभा संतोष टोंचर, सचिव नंदाबाई संभाजी कष्टे, संचालक सुचित्रा कैलास खंदारे, मोतीराम सखाराम वैद्य यांचा समावेश आहे.
स्वच्छता व प्रतवारी व्यवसाय
राष्ट्रीय महामार्गालगत कंपनीने ११ गुंठे जागा भाडेतत्त्वावर घेतली. त्या ठिकाणी ४० बाय २५ फूट जागेत लोखंडी पत्र्याचा निवारा उभारून स्वच्छता व प्रतवारी यंत्र बसविले. शेजारी ५४ बाय ५४ फूट आणि ३८ बाय ३२ फूट क्षेत्रफळ अशी दोन गोदामे उभारली. यंत्रसामग्री तसेच एका गोदामासाठी साडेतेरा लाख रुपयांचे अनुदान मिळाले.
सन २०१६ पासून सभासदांकडील सोयाबीन, हरभरा, गहू या धान्यांची प्रतवारी करून विक्री केली जाते. अकोला येथील बाजारपेठेत प्रतवारी केलेल्या शेतीमालास बाजारभावाच्या तुलनेत क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये अधिक दर त्यातून मिळाले आहेत. आजपर्यंत एकूण २० हजार क्विंटलवर शेतीमालाची प्रतवारी करण्यात आली आहे. प्रति क्विटंल ६० रुपये दर प्रक्रियेसाठी आकारला जातो.
बीजोत्पादन
कंपनीच्या कार्यक्षेत्रातील गावे जिरायती बहुल आहेत. येथील बहुतांश शेतकऱ्यांची उत्पन्नाची मदार सोयाबीन, हरभरा या पिकांवर असते. त्यामुळे सभासद व बिगरसभासद शेतकऱ्यांना सोयाबीन आणि हरभरा यांच्या दर्जेदार बियाण्याचा पुरवठा व त्याचबरोबर बियाणे विक्रीतून उत्पन्न असे उद्दिष्ट कंपनीने बाळगले.
त्यातून कंपनीतर्फे २०१६ पासून ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. प्रमाणित बियाण्याचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी परभणी येथील बीजप्रमाणीकरण अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी केली जाते. सुरुवातीची तीन वर्षे सोयाबीन आणि हरभऱ्याचे प्रत्येकी २० हेक्टरवर बीजोत्पादन घेतले. आता क्षेत्र कमी- अधिक होते.
या वाणांचे केले बीजोत्पादन
सोयाबीन- जेएस ३३५
यंदा- महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) विकसित केडीएस ७२६ (फुले संगम), केडीएस ७५३ (फुले किमया) हे सोयाबीन तर फुले विक्रम, फुले विक्रांत हे हरभरा वाण.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (परभणी)- एमएयूएस ६१२ (सोयाबीन)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला)- एआयएमएस १००१, अंबिका १०३९ (सोयाबीन) तर पीडीकेव्ही कनक- हरभरा.
राजमाता विजयाराजे शिंदे कृषी विद्यापीठ (मध्य प्रदेश- ग्वाल्हेर)- आरव्हीजी २०२(हरभरा)
यंदा जबलपूर येथील संशोधन केंद्राचे जॉकी ९२१८
स्मार्ट प्रकल्पांतर्गत निवड
‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत कंपनीला सहाशे टन क्षमतेचे गोदाम बांधकाम, प्रक्रिया यंत्रसामग्री आदी घटकांसाठी एक कोटी १८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. डाळमिलद्वारे शेतीमालावर प्रक्रिया व विक्री असे उद्दिष्ट आहे, कंपनीच्या सभासदांकडील शेतीमाल साठवणुकीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मारोती वैद्य ९९७५०५५७३१
माणिक रासवे
हिंगोली जिल्ह्यातील फाळेगाव येथील श्री फाळेश्वर महाराज शेतकरी उत्पादक कंपनीने सुमारे सात वर्षांच्या कालावधीत वार्षिक दोन ते तीन कोटी उलाढालीपर्यंत यशस्वी मजल मारली आहे. सोयाबीन, हरभरा यांचे बीजोत्पादन, ब्रॅण्डने विक्री तसेच स्वच्छता, प्रतवारी असे कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप आहे. कंपनीच्या दर्जेदार बियाण्यास हिंगोलीसह शेजारील जिल्ह्यातून मागणी आहे. हमीभाव खरेदी केंद्र चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना नजीकची सुविधा निर्माण झाली आहे.
बियाणे विक्री
तीस किलो प्लॅस्टिक पिशव्यांचे पॅकिंग व श्री पाळेश्वर सीड्स अशा ब्रॅण्डने विक्री. परभणी, नांदेड, वाशीम जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून बियाण्यास मागणी. बाजारपेठेतील दरांपेक्षा किलोला दहा रुपये कमी दराने सोयाबीन बियाणे विक्री. यंदा हरभरा बियाण्याचे प्रति किलो दर- फुले विक्रम ५५ रु., राजविजय ५५, जॉकी ९२१८- ६० रुपये.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.