Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात पाच मध्यम व १२ लघुसिंचन प्रकल्प आहेत. त्यात पावसाअभावी अत्यल्प साठा आहे. काही प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये आजअखेर शिवण (वीरचक) प्रकल्पात केवळ ३९ टक्के साठा आहे. शहादा तालुक्यातील दरा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. नवापूर तालुक्यातील भरडू प्रकल्पात ६६ टक्के, पळशी २६ टक्के, तर अक्कलकुवा तालुक्यांतील देहली प्रकल्पात शंभर टक्के साठा आहे.
लघू प्रकल्पांमध्ये मेंदीपाडा ३५, वागदी २४, नटावद १६, खैरवे १२, चिरडा ६०, तर धनपूर व भुरीवेल या दोन्ही प्रकल्पांमध्ये शंभर टक्के साठा आहे. मात्र नंदुरबार तालुक्यातील बलदाणे, चौपाळे, घोटाणे, नवलपूर (ता. शहादा) या प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. फक्त दरा व देहली हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ते देखील जुलैत भरले.
या महिन्यात समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक गावांत टंचाईची स्थिती तयार होत आहे. तापी नदीवरील शहाद्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमध्येही जलसाठा आहे. कारण तापीला पूर आला होता. या बॅरेजमधून विसर्गही काहीसा सुरू आहे. परंतु त्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यातून पाण्याची गळती होते. परिणामी पाणी किती साठून राहील, हादेखील मुद्दा आहे.
पावसाअभावी शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. करावे तरी काय, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी, कूपनलिका आहेत ते विहिरीतून पाणी उपसणार मात्र ते पुरेसे नाही. त्यामुळे ते शेतकरी पाण्याची नांदडे भरून शेतात पिकाच्या प्रत्येक झाडाला विशेषतः कपाशी, पपईसारख्या पिकांना वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.
जेमतेम पावसावर कापूस वाढविला. आता पाण्याची गरज आहे. मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे कापूस करपू लागला आहे. तो वाचविण्यासाठी विहिरीतून पाणी काढून प्रत्येक झाडाला २०० ते २५० मिलिलीटर पाणी हाताने टाकून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती नकोशी वाटू लागली आहे.- कैलास पाटील, शेतकरी, भालेर, ता. जि. नंदुरबार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.