अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : रब्बी हंगाम सुरू झाला असून कांदा लागवड, गहू पेरणीची शेतकरी घाई करत आहेत. मात्र, कांदे लागवडीची लगबग सुरू असताना मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे.
तरीही बळीराजा आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार रोख मजुरी देऊन कामे करून घेत आहे. त्यामुळे कांदा लागवडीला वेग येत नसल्याचे चित्र आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसाने पाठ फिरवली होती.
परंतु नंतर झालेल्या पावसामुळे बंधारे, विहिरी, कूपनलिका यांची पाण्याची पातळी वाढल्याने बागायतदार शेतकरी बऱ्यापैकी कांदे लागवड करीत आहेत. त्यातील काही अल्पभूधारक शेतकरी कांद्याचे रोप विकत घेऊन कांद्याची लागवड करीत आहेत. त्यातच महावितरणच्या भारनियमनामुळे शेतकरी कांदे लागवडसुद्धा दिवसातून दोन पाळ्यांमध्ये करत आहेत.
सध्या कांदे लागवड सकाळी सहा ते अकरापर्यंत व दुपारी एक ते सहापर्यंत दोन सत्रांमध्ये होत आहे. प्रत्येक सत्राची मजुरी दोनशे रुपयांप्रमाणे असून साधारणपणे मजुराला दिवसाला चारशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. एकच मजूर दोन्ही वेळेत, दोन वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे मजुरीसाठी जात असल्याने मजुरांना ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत. त्यातही महिलांचे प्रमाण मोठे आहे. तरीही मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.
खासगी वाहनधारकांनाही रोजगार
काही शेतकऱ्यांची शेती पाच ते दहा किलोमीटर अंतरावर असल्याने मजुरांची वाहतूक करण्यासाठी छोट्या-मोठ्या वाहनधारकांना शेतकरी एक ठराविक रक्कम देतात. ते दिलेल्या वेळेत मजुरांना शेतात सोडून पुन्हा घ्यायलाही जातात.
त्यामुळे मजुरांची ‘ने-आण’ करण्यासाठी त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. हिवाळ्यात भर थंडीतही पहाटे पाच-साडेपाचपासून शेतकरी, शेतमजूर व वाहनधारकांची लगबग सुरू होते.
कांदे लागवडीच्या अनोख्या पद्धती
साधारणतपणे कांदे लागवड दोन प्रकारे केली जाते. गादी वाफे व सरी वाफे. तीही पाण्यात अथवा कोरड्यात. सरी वाफ्यात व पाण्यातच जास्त प्रमाणात कांदे लागवड केली जाते. दौंड येथील शेतकरी धनंजय आटोळे म्हणाले, की गादी वाफ्यात उत्पादन जास्त येत असले तरीपण कांदा हा सरी वाफ्यातच जास्त पोसला जातो. कोरड्यात कांदे लागवड केली तरी त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो.
साधारणपणे दोन मजुरांची एक जोडी समजली जाते. एका वाफ्यात एकावेळी दोन मजूर याप्रमाणे लागवड होते. एक जण त्याच वेळेस रोप उपटण्याचे काम करतो तर दुसरा वाफ्यांना पाणी देण्याचे काम करतो, अशी तिहेरी जबाबदारी शेतकऱ्यांना पार पाडावी लागते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.