Pune News : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान बुधवारी (ता.२१) मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहा कलमी धोरण आखल्याचे सांगितले. तसेच काँग्रेसह जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. यावरून शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवराज सिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधत टीका केली. अंबादास दानवे यांनी यावरून खोचक ट्विट करताना, शिवराज सिंह चौहान जी काल ज्या बीड जिल्ह्यात होतात तिथे मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यावर का बोलला नाहीत? किंवा जे उपस्थित मंत्री होते त्यांच्यातील कोणी चकार शब्द ही का काढला नाही? असा सवाल केला आहे. यावरून आता पुन्हा राजकीय वार पलटवार सुरू झाले आहेत.
शिवराज सिंग चौहान जी, आपण आणि आपल्या बरोबर राज्यातील जे मंत्री तेथे उपस्थित होते तो बीड जिल्हा होता. याच बीड जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. मात्र त्याबद्दल आपल्यासह कोणीही चकार शब्द देखील काढला नाही. आपले यावर भाष्य न करणे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत फक्त संवेदनशील असल्याचा आव आणत असल्याचेच उघड होत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
तसेच आपल्या भाषणात तुम्ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहा कलमी धोरण आखल्याचे सांगितले. ज्यात उत्पादन वाढवणे, शेतीचा खर्च कमी करणे, उत्पादनाला रास्त भाव देणे, नैसर्गिक आपत्तींमध्ये योग्य प्रमाणात दिलासा देणे, शेतीचे विविधीकरण आणि नैसर्गिक शेतीला चालना असल्याचे म्हटले होते. पण मोदींनी जर ६५ पिकांच्या १०९ प्रजातींच्या बियाणांचे लॉन्चिंग केलं असेल तर ते दाखवा. आपण म्हणत असाल तसे या बिया कमी पाण्यात, कमी दिवसांत उत्पादन देणाऱ्या असतील तर त्या काळी काळी की गोरी आहेत ते तरी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना बाजारात दिसू द्या, असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
अंबादास दानवे यांनी, परळीत कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने सगळ्या वक्त्यांची भाषणे फक्त कांदा, सोयाबीन, कापूस, युरिया, डीएपी, हमीभाव, ड्रोन, नॅनो युरिया, याबाबतच्या अडचणींच्या कथनावर झाली. त्यामुळे राज्यातील नेत्यांसह आपल्याला देखीव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न माहित आहेत. किमान यानिमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला जाणवायला तरी लागलेत असं म्हटलं आहे. मात्र केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आल्यासरशी यातील एकही प्रश्न सोडवला नाही अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते शिवराज चौहान?
बीडच्या परळी येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्धाटना वेळी शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेससह शरह पवार यांच्यावर टीका केली होती. शिवराज सिंह चौहान यांनी, काँग्रेसवाले म्हणत होते पैसे खटाखट देऊ. मात्र बटण दाबून पैसे दिले ते महायुती सरकारने. देशाच्या समोर एक उदाहरण ठेवल्याचे शिवराज सिंह चौहान म्हणाले. तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात कुठलीही कसर ठेवली जाणार नाही. पीकविम्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर योग्य न्याय केला जाईल असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.