Shelgaon : पाण्याबरोबरच ग्रामविकासात घडवली शेलगावने किमया

पीक पद्धतीत बदल होत ऊस, केळी, लिंबू, सीताफळ, आंबा आदी फळबागा गावच्या शिवारात डोलू लागल्या. शेलगावने घडवलेली ही किमया अन्य गावांसाठी आदर्शवतच आहे.
Shelgaon
ShelgaonAgrowon


चार-पाच वर्षांपूर्वी ‘पाणी फाउंडेशन’च्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत भाग घेऊन शेलगाव (क) (Shelgaon) (जि. सोलापूर) गावाने विकासाची कातच टाकली. लोकसहभागाच्या बळावर गावाने ३१ कोटी २० लाख लिटरपर्यंत पाणी साठवण क्षमता तयार केली. स्वच्छता, वृक्षलागवडीसह व्यसनमुक्तीची गुढी उभारली. पीक पद्धतीत बदल होत ऊस, केळी, लिंबू, सीताफळ, आंबा आदी फळबागा गावच्या शिवारात डोलू लागल्या. शेलगावने घडवलेली ही किमया अन्य गावांसाठी आदर्शवतच आहे.

Shelgaon
Cotton Production: देशातील कापूस उत्पादकता कमी का ? | ॲग्रोवन

सोलापूर जिल्ह्यात करमाळ्यापासून ८-१० किलोमीटरवर शेलगाव (क) हे डोंगराच्या कुशीत वसलेले दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. पहिल्यापासूनच हा कमी पर्जन्यमानाचा पट्टा ओळखला जातो.
ज्वारी, गहू, हरभरा अशी पारंपारिक पिके आहेत. गावाची ओळखच मक्याच्या शेतीसाठी होती.
‘पाणी फाउंडेशन’ ने २०१८ मध्ये गावोगावी ‘वॅाटर कप’ स्पर्धेला सुरुवात केली. शेलगावच्या तत्कालीन सरपंच सौ. आशा जाधव, उपसरपंच सचिन पाटील, तत्कालीन ग्रामसेवक महेश काळे यांनी या स्पर्धेत गावाचा सहभाग नोंदवला. सचिन पाटील, बाळनाथ वीर, डॉ. विकास वीर, सपना वीर, सौ. उज्ज्वला बनसोडे या पाच जणांनी त्यासाठी प्रशिक्षण घेतले. पुढे येऊन गावकऱ्यांच्या मनात ही चळवळ रुजवली. माजी सरपंच पांडुरंग वीर यांच्यासह विद्यमान सरपंच अशोक काटुळे, सौ. सुनीता माने, विद्यमान उपसरपंच सौ. कविता वीर, माजी सरपंच रामचंद्र काटुळे, आत्माराम वीर यांनीही मोलाचे काम केले.
केवळ पाण्यासाठीच नव्हे तर ग्रामविकासाच्यादृष्टीने ही स्पर्धा ‘टर्निंग पॅाइंट’ ठरली.

...असे झाले जलसंधारण

-गावच्या चोहोबाजूंना डोंगर लाभल्याने माथा ते पायथा पद्धतीने जलसंधारण केले.
-लोकांच्या श्रमदानातून २९५३ मीटर सीसीटी चर, ७४ दगडी बांध एलबीएस, २३८० मीटर लांबीचे कंटूर ग्रेडेड बंडिंग, १७०० मीटर लांबीचे कंपार्टमेंट बंडिंग, २३ लहान मातीनाला बांध, एक मोठा मातीनाला बांधला.
-यंत्राच्या माध्यमातून तब्बल २३ हजार १७८ मीटर लांबीच्या सीसीटी खोदल्या.
-ओढ्याचे ११५४ मीटर लांब खोली-रुंदीकरण. नऊ नालाबंडिंगमधील गाळ काढला.
-अवघ्या दोन महिन्यांच्या काळात गावकऱ्यांनी सुमारे ३१ कोटी २० लाख लिटर पाणी साठवण क्षमता
तयार करण्याचे आव्हान यशस्वी पेलले.

Shelgaon
Soybean Market: सोयाबीन विक्रीसाठी बाजारात रांगा

बदलले गावचे अर्थकारण

एकेकाळी कोरडवाहू आणि काहीसा दुष्काळी पट्टा असलेल्या शेलगावची ओळख आज पाण्याच्या शाश्‍वत उपलब्धतेमुळे बदलली आहे. गावाच्या ८४० हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी १५० हेक्टरवर सर्वाधिक ऊस, १०० हेक्टरवर केळी, सीताफळ, पेरू, आंबा, लिंबू, झेंडू, ५० हेक्टर मका व
अन्य क्षेत्रावर हंगामी आणि भाजीपाला पिके आहेत. जोड व्यवसाय
म्हणून पोल्ट्री, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय आणि खव्यासारख्या प्रक्रिया उद्योगाकडेही काही तरुण शेतकरी वळले आहेत.
गावचे अर्थकारण बदलले आहे.

दहा हजार झाडांचे संवर्धन (इन्फो १)
वृक्षलागवड चळवळीतही ग्रामस्थांनी योगदान दिले आहे. ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे झाडांचे शतक ही संकल्पना राबवून झाडांचे संवर्धन केले जात आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने ७० बोअर्सचे पुनर्भरण केले आहे. पाणी फाउंडेशनच्या बक्षीस रकमेतून गावकऱ्यांना प्रत्येकी पाच याप्रमाणे १७५० रोपांचे वाटप करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागातर्फे करमाळा ते पांड रस्त्यावर सात हेक्टर गायरान क्षेत्रावर नऊ हजार झाडांचे संवर्धन केले आहे. एक पद- एक झाड, वाढदिवसाचे, स्मरणार्थ, आनंदाचे, लेकीचे, आईचे झाड असे संवर्धन उपक्रमही राबवले जातात. एकूण सुमारे दहा हजार झाडांचे संवर्धन गावात होत आहे.

Shelgaon
Cotton Rate : कापूस कधीपर्यंत दबावात असेल?

गावातील वैशिष्ट्यपूर्ण कामे (इन्फो २)

-प्रत्येक कुटुंबाकडे शोषखड्डे व कंपोस्ट खड्ड्यांचे काम.
-स्वच्छताविषयक अभियानातून शाश्‍वत स्वच्छता व ग्रामस्थांचे आरोग्यमान उंचावले.
-व्यसनमुक्ती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी. आतापर्यंत ४३ जणांकडून तंबाखूचे व्यसन सुटले.
-शाळेत ‘आरओ’द्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी. लोकसहभागातून गावातील शाळेची दुरुस्ती, रंगरंगोटी यासह ‘सायन्स वॉल’ची निर्मिती. डिजिटल शाळेकडे वाटचाल.
-अंगणवाडीचा परिसर निसर्गरम्य. त्या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी शंभर वृक्षांची लागवड. मुलांसाठी खेळणी.
-गावात ठिकठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या बोलक्या भिंती.
-बहुतांश भागात सिमेंट रस्ते. गटार आणि दिवाबत्ती आदी सुविधा उपलब्ध.
-जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोन नवीन वर्गखोल्या बांधकाम. तालीम उभारणीसह उर्वरित सिमेंट रस्त्यांना मंजुरी.
- ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटणार. आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून दोन वर्षांत सहा कोटींपेक्षा अधिक निधीची कामे प्रस्तावित.
-प्लॅस्टिक मुक्ती, रक्तदान शिबिरे, माती-पाणी परीक्षण, महिला आरोग्य शिबिरे.

मिळालेले सन्मान (इन्फो ३)

-२०११- १२- महात्मा गांधी तंटामुक्त गाव स्पर्धा.
-पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना (२०१०-११, ११-१२ व१२-१३) यशस्वी राबविल्याबद्दल.
-सन २०१६-१७ ओडिएफ प्लस, हागणदारी मुक्त गाव.
-पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत (२०१८) तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक.
-शोषखड्डे युक्त गाव, गटार मुक्तगाव मोहीम तसेच विठ्ठल कार्पोरेशन लिमिटेड, म्हैसगाव यांच्याकडून विशेष सन्मान.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सुसज्ज व्यायामशाळा सुरू करण्याबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अभ्यास सहली व तज्ज्ञ अभ्यासकांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेणार आहोत.
-अशोक काटुळे, सरपंच

महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षमपणे उभे करण्यासाठी उमेद अभियानाच्या आधारे
कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. स्त्री सक्षम झाली की कुटुंब आपोआपच सक्षम बनेल.

-सौ. कविता वीर, उपसरपंच

तालुकास्तरावरील गावांतही गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळवून देणे,
देश-परदेशात निर्यात करणे यासाठी प्रयत्नशील आहोत.

-डॉ. विकास वीर,
अध्यक्ष, राजेरावरंभा शेतकरी उत्पादक कंपनी, शेलगाव (क)


संपर्क ः
-अशोक काटुळे, सरपंच, शेलगाव (क)
९७६३२३४७४६
-डॅा. विकास वीर
९९२२८१६६५५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com