
Pune News : आज अनेक महिला त्यांच्या क्षेत्रात काही ना काही कर्तृत्व दाखवत आहेत. देशात, राज्यात अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला कायम प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. ‘यशस्विनी’ हे गेल्या अनेक वर्षांपासून हा दृष्टिकोन ठेवून काम करत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने ‘यशस्विनी सन्मान सोहळा’ पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी (ता. २२) झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी लेखक प्राजक्त देशमुख, धैर्यकन्या आसावरी जगदाळे, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.
या वेळी मनीषा सजनपवार - कृषी सन्मान (गडचिरोली), डॉ. शामल गरूड - साहित्यसन्मान (छत्रपती संभाजीनगर), कमल कुंभार - उद्योजिका सन्मान (धाराशिव), उल्का महाजन - सामाजिक सन्मान (रायगड), डॉ. शबनम शेख - क्रीडा प्रशिक्षक सन्मान (अहिल्यानगर), अलका धुपकर - पत्रकारिता सन्मान (मुंबई) यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी ‘हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब’ या पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
श्री. पवार म्हणाले, ‘‘महिला धोरण आणताना अनेकांनी विरोध केला अनेक समित्या स्थापन करावा लागल्या. त्या वेळी अनेक विरोधकांना समजावून सांगावे लागले. वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींना हिस्सा मिळावा यासाठी कायदा करत असताना देखील लोकांनी विरोध केला. राज्याच्या विधानसभेतदेखील मोठा विरोध होता पण सगळ्यांना समजावून सांगून हा कायदादेखील मंजूर केला गेला. पुरुषांचा काही वेळेस विरोध होतो. मात्र, समजावून सांगितल्यानंतर विरोध मावळतो. त्यामुळे पुरुषांनी ही मानसिकता बदलली पाहिजे.’’
श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यात हा कायदा आपण केला, महिलांना योग्य अधिकार दिले, सत्तेतदेखील महिलांना समान हक्क देण्याचा कायदादेखील आपल्याच राज्यात आपण केला. नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी महिलांना समान हक्क आपल्या राज्याने दिले. समाजाचे हित असेल तर अनेकांचा विरोध सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक कायदे झाले आहे. परंतु आजही या कायद्यामध्ये दुरुस्ती आणि बदल करावे लागणार आहेत. देशातही महिलांच्या कायद्याचा प्रस्ताव मांडत असताना त्या कायद्याची प्रत फाडून टाकून नंतर त्याला विरोध करण्यात आला होता.
आता बदल होत आहे. आपण जागृत राहून काम केले पाहिजे. स्त्री आणि पुरुष यांची कर्तृत्वाच्या बाबतीत कुठेही तुलना करू नये. कर्तृत्व हे फक्त पुरुषाकडे नसून महिलांकडेही असते. त्यांना संधी मिळाली तर त्याही चांगले कर्तृत्व दाखवतात. १९४७ नंतर कर्तृत्ववान देशाच्या पंतप्रधान कोण होत्या, तर सगळे इंदिरा गांधी यांचे नाव सांगतील, इंदिरा गांधींकडे निर्णय घेण्याची क्षमता होती अनेक बदल इंदिरा गांधी यांनी देशात घडवले. देश चालवण्याची दृष्टी दाखवली आणि निर्णय घेऊ शकतो, हा इतिहास त्यांनी तयार केला. त्यामुळे कर्तृत्व हे दोघाचंच असते. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी प्रास्तविक केले. तर अंकुश काकडे यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.