Sugarcane Harvesting Wages : तोडणी दराचा तिढा शरद पवार सोडविणार

Sharad Pawar : ऊस तोडणी मजुरीदराची समस्या उद्भवताच कामगार व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी एकत्र येत वाटाघाटी करतात. यंदा कामगारांनी किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढ मागितली आहे.
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘राज्यातील ऊस तोडणीचे मजुरी दर वाढविण्याबाबत तयार झालेला तिढा सुटलेला नाही. वारंवार चर्चा करूनही तोडगा निघत नसल्यामुळे या प्रकरणात आता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून मध्यस्थी केली जाण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी दिली.

ऊस तोडणी मजुरीदराची समस्या उद्भवताच कामगार व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी एकत्र येत वाटाघाटी करतात. यंदा कामगारांनी किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढ मागितली आहे. वाटाघाटींबाबत अलीकडेच पाचवी बैठक झाली.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील तसेच कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, दत्तू भांगे, श्रीमंत जायभाय, सुशीला मुराळे, गहिनीनाथ थोरे तसेच इतर प्रतिनिधी चर्चेला हजर होते.

Sugarcane Harvesting
Sugarcane Management : ऊस शेतीचे काटेकोर व्यवस्थापन करणे गरजेचे

पी. आर. पाटील म्हणाले,‘‘कामगारांनी १०० टक्के दरवाढ मागितली होती. २५ टक्क्यांच्यावर वाढ देणे परवडत नसल्याचे कारखान्यांचे म्हणणे आहे. तरीही चर्चेत आम्ही २७ टक्क्यांपर्यंत वाढ देण्याचा प्रस्ताव ठेवला; परंतु हा प्रस्ताव अमान्य केला गेला.

त्यामुळे आता श्री. दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव ओहोळ, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्याकडून पुन्हा अभ्यासपूर्वक तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू आहोत. कामगारांसोबत लवकरच पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.’’

श्री. थोरे म्हणाले, ‘‘तोडणी कामगारांनी आंदोलन पुकारल्यास सर्व कारखान्यांचे गाळप वेळापत्रक विस्कळित होऊ शकते. तोडणी मजुरांना सध्या डोक्यावर ऊस वाहतुकीसाठी प्रतिटन २७३ रुपये, बैलगाडीला ३०४ रुपये तर टायर गाडीसाठी ४०० रुपयांच्या आसपास मजुरी मिळते. दरवाढीबाबत दोन्ही बाजूंनी ठाम भूमिका घेतल्यामुळे चर्चा पुढे गेलेली नाही. त्यामुळे हा तिढा केवळ श्री.पवार यांच्याकडून सोडविला जाऊ शकतो, असे वाटते.’’

Sugarcane Harvesting
Sugarcane Cutting Workers : यंदाच्या साखर हंगामाला ग्रहण, ऊस तोडणी मजुर जाणार संपावर

राज्यातील ऊस तोडणी मजुरी दराचे धोरण ठरविण्यात गेल्या चार दशकांपासून श्री. पवार यांची मध्यस्थी उपयुक्त ठरते आहे. तोडणीचे दर प्रतिटन १४.२५ रुपये असताना तोडणी दरवाढीसाठी पहिले आंदोलन १९८६ मध्ये झाले होते.

त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी मध्यस्थी केली व दरवाढ झाली. १९८९ मध्ये पुन्हा आंदोलन झाले असताना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी यशस्वी बोलणी केली व दरवाढीची समस्या सुटली. त्यानंतर सलग दहा वेळा श्री. पवार यांनीच या समस्येवर तोडगा काढून दिलेला आहे.

२५ पासून ‘तोडणी बंद’चा इशारा

दरम्यान, ऊस तोडणीच्या मजुरी दराबाबत तोडगा न निघाल्यास येत्या २५ डिसेंबरपासून राज्यभर ‘तोडणी बंद’ आंदोलन सुरू करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

ऊस तोडणी कामगारांबाबत आम्हाला आस्था आहे. परंतु, तोडणी दर वाढविणे साखर संघाच्या हातात नाही. त्यासाठी सर्व साखर कारखान्यांची संमती आवश्यक असते. कारण दरवाढ करताच थेट ‘एफआरपी’तून पैसे कापले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी हितासाठी अव्वाच्या सव्वा दरवाढ आम्हाला देता येणार नाही. तरीदेखील सन्मानपूर्वक तोडगा काढण्यासाठी आमचे सतत प्रयत्न सुरु आहेत.
- पी.आर.पाटील, अध्यक्ष, साखर संघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com