
Beed News: बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी (ता. ३०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या वेळी, तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचे वागू नका. दृष्ट प्रवृत्तीचे लोक आजूबाजूला राहता कामा नयेत. उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. वारंवार गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितांवर मकोका लावला जाईल, ज्या चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आल्या आहेत, त्याला आळा घातला गेलाच पाहिजे. बंदुका दाखवणारे, त्याचे रील्स बनवणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांच्या रडारवर असलेले मंत्री धनंजय मुंडेदेखील या वेळी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, की विकासकामे करताना कुणी खंडणी मागता कामा नये, अन्यथा मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. काम करताना पदाधिकाऱ्यांनी चारित्र्य स्वच्छ ठेवावे, अशी तंबी त्यांनी दिली. यापुढे पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप चालणार नाही.
माझे पांघरूण फाटून गेलेय
‘‘सत्ता आल्यानंतर अनेक हौशे-गवशे येऊन मला भेटतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला ते दुसऱ्याच पक्षात होते. मात्र आता येऊन सांगत आहेत की दादा, मी तुमच्यासमवेत आहे. हे असे चालणार नाही. मी काही दिवस तुमचे वागणे-बोलणे बघेन. सगळीकडे सरड्यासारखे रंग बदलणारी जमात असते, ती माझ्या पक्षातही आहे.
पण आता ते चालणार नाही. उद्या परत कोणी माझ्याकडे येतील, एवढ्यावेळेला पांघरूण घाला, असे म्हणतील. पण माझे पांघरुण फाटून गेलेय. त्यामुळे नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना द्याव्यात. तुम्ही चांगले वागलात तर मी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करेन. पण चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’’, असे अजित पवार यांनी सांगितले.
बंदुका दाखविणाऱ्यांवर कारवाई करणार
विकासाची कामे करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना आणि त्यांचा रस्ता अडविणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. तीन ते चारपेक्षा अधिक वेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितांवर मकोका लावला जाईल, काही अधिकारी इथे बरीच वर्षे राहिले आहेत.
त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी भेदभाव करत नाही. पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्याला कुठेतरी आळा घातला गेलाच पाहिजे. बंदुका दाखविणारे, त्याचे रील्स बनवणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.