
डॉ. श्रीकांत दे. कल्याणकर, डॉ. माधव पाटील
Dairy Business Education : बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) हा अभ्यासक्रम केवळ शैक्षणिक पदवीपुरता मर्यादित न राहता, दुग्ध प्रक्रिया उद्योगाशी थेट जोडलेला आणि संधीपूर्ण असा उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आहे. भारताच्या श्वेतक्रांतीला चालना देणाऱ्या या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आणि व्यवसाय उभारणीची क्षमता आहे. दुग्ध प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, उपकरणे आणि विपणन यासारख्या विविध घटकांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करणारा हा अभ्यासक्रम ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक आदर्श पर्याय ठरू शकतो.
नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, उदगीर (जि. लातूर) आणि कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, वरुड (पुसद) या महत्त्वाच्या शासकीय शैक्षणिक संस्थांमार्फत बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) हा पदवी अभ्यासक्रम राबविण्यात येतो. देशातील वाढत्या डेअरी उद्योगातील प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या तुलनेने स्पर्धात्मक राहील, अशा पद्धतीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०) नुसार विकसित असा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना लवचीकता, रोजगारक्षम कौशल्ये, आणि उद्योगाशी सुसंगत प्रशिक्षण देतो.
बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) हा चार वर्षांचा (एकूण ८ सेमिस्टर) चा पदवी अभ्यासक्रम असून त्यामध्ये विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांना प्रवेश आणि बहिर्गमन हा पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक बहिर्गमन टप्प्यावर १० आठवड्यांचे उद्योग प्रशिक्षण (इंटर्नशिप) अनिवार्य आहे.
या अभ्यासक्रमात केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव, आणि शास्त्रीय कौशल्यांचा समावेश असून, त्यामधील विषय पुढीलप्रमाणे आहेत.
डेअरी टेक्नॉलॉजी ः दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे प्रक्रिया तंत्रज्ञान.
डेअरी इंजिनिअरिंग ः उपकरणांची कार्यपद्धती, डिझाईन आणि देखभाल.
डेअरी मायक्रोबायोलॉजी ः दुधातील सूक्ष्मजीवशास्त्र व अन्न सुरक्षा.
डेअरी केमिस्ट्री ः दुधाचे रासायनिक गुणधर्म आणि विश्लेषण.
डेअरी बिझनेस मॅनेजमेंट ः विपणन, उद्योजकता व आर्थिक व्यवस्थापन.
अभ्यासक्रमासोबतच इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव देण्यावरही भर दिला जातो, जेणेकरून पदवीधर विद्यार्थी स्पर्धात्मक नोकरी तसेच उद्योजकीय संधींसाठी पूर्णतः तयार होतो.
प्रवेशासाठी पात्रता आणि निवडीचे निकष
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमासाठी पात्रता ही उमेदवाराने महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा समकक्ष मान्यताप्राप्त मंडळामार्फत १२ वी (१०+२) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी हे विषय असणे आवश्यक आहेत.
पात्र खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५० टक्के गुण व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ४० टक्के गुण आवश्यक आहेत. प्रवेशासाठी MHT-CET २०२५ (PCM Group) ची उपस्थिती अनिवार्य आहे. विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांची माहिती व प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची अधिकृत संकेतस्थळ www.mafsu.ac.in या ठिकाणी विद्यार्थी भेट देऊ शकतात.
व्यवसाय संधी
बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) ही पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी दुग्ध उद्योगाच्या विविध शाखांमध्ये भरपूर रोजगार व व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्याला केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम करत नाही तर विद्यार्थांच्या व्यावसायिक व
संशोधनात्मक क्षमताही विकसित करतो. बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) पदवी ही दुग्ध तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात व्यापक रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करणारी, उद्योगाशी सुसंगत अशी व्यावसायिक पदवी आहे. या क्षेत्रात केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही करिअर करण्याची संधी आहे.
- डॉ. श्रीकांत कल्याणकर,
९४२३४३५७५७
(सहयोगी प्राध्यापक , दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.