
Mumbai News: शक्तिपीठ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा केवळ महामार्ग नसून विकासाचे इंजिन आहे. या महामार्गाला वर्ध्यापासून सांगलीपर्यंत कुठेही विरोध नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध मावळल्याचा दावाही विधानसभेत केला. सध्या आरेखन पूर्ण झाले असून जमीन अधिग्रहण लवकरच सुरू केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सभागृहातील काही सदस्यांनी समर्थन तर काहींनी विरोध केला होता. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी हा महामार्ग सुरू झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले तर धाराशीवचे आमदार कैलास पाटील यांनी या महामार्गस विरोध केला होता. तसेच विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
मात्र, पलूसचे आमदार विश्वजित कदम यांनी या महामार्गाला विरोध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या विरोधकांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले होते. राज्यपालांच्या अभिभाषणात शक्तिपीठ महामार्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
याबाबत मुख्यमंत्री पडणवीस म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते सिंधुदुर्ग असा असला तरी तो वर्ध्यातून समृद्धी महामार्गावरून सेवाग्राम येथून सुरू होतो. यवतमाळ, लातूर, वर्धा, हिंगोली, नांदेड, धाराशीव, परभणी, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. हा माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई, औढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, कारंजा लाड, गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी यांसारख्या महत्त्वाच्या देवस्थानांना जोडला जाणार आहे.
हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही तर यामुळे मराठवाड्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकास होणार आहे. मराठवाड्यातून जाणारा हा महामार्ग कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राशी जोडणारा आहे. समृद्धी, कोकण हायवे आणि शक्तिपीठ असा त्रिकोण तयार केला जाणार आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातून मालवाहतूक सोपी होईल. वाढवण बंदराला जोडणारा समृद्धीवरून नाशिकपासून १०० किलोमीटरचा रस्ता तयार केला जाईल. त्यामुळे समृद्धी आणि शक्तिपीठ महामार्गावरील सर्व जिल्हे जोडले जातील. हा महामार्ग विकासाचे इंजिन म्हणून आम्ही त्याकडे पाहत आहोत.
आरेखन पूर्ण, लवकरच अधिग्रहण
या महामार्गासाठी आरेखन झालेले आहे. १५/२ ची नोटीस काढली आहे. भूसंपासदानाच्या पातळीवर प्रक्रिया आली आहे. त्यानंतर लवकरच अधिग्रहण सुरू केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
चर्चेअंती निर्णय घेणार
कोल्हापूर जिल्ह्यातील विरोध मावळल्याचा दावा करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सांगलीपर्यंत कुणाचही याला विरोध नाही. कोल्हापूर जिल्ह्यात काही प्रमणात विरोध आहे हे आम्ही नाकारत नाही. पण कोल्हापूर दौऱ्यावर असताना पाच तालुक्यांतील २०० शेतकरी भेटले. त्यांनी बाधित एक हजार शेतकऱ्यांच्या सह्या दिल्या आहेत. त्यांनी शक्तिपीठ महामार्ग हवा आहे, असे सांगितले. त्यांनी महामार्गाला समर्थन दिले आहे. शेतकऱ्यांची परिषद घेऊन आम्ही पाठिंबा जाहीर करू, असेही सांगितले. यासंदर्भात चर्चेअंती आम्ही निर्णय घेऊ.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.