Shahu Patole: ट्रक किन्नर: न संपणाऱ्या प्रवासाची गोष्ट!

ट्रक अनलोड करण्याची पण वेगळीच कला होती. गावातील लोक लगेच मदत करायचे. एका झाडाला सौन्दर बांधायचा ट्रक हळूहळू पुढे घ्यायचा, ट्रकच्या बावडीवर खांबाचे टोक आले, की लोक तिथे खांदे देत आणि ट्रक पुढे घेतला की पोल अलगद खाली ठेवीत. हे टेक्निक सांगायला मी लवकरच शिकलो.
Shahu Patole: ट्रक किन्नर: न संपणाऱ्या प्रवासाची गोष्ट!
Agrowon
Published on
Updated on

-शाहू पटोळे

लहानपणी माझं टरकचा डायवर आगर किन्नर व्हायचं स्वप्न होतं. परांड्यात तेंव्हा वडील सरकारी गोदामाचे गोडाऊन कीपर होते. आम्ही परांड्याला असताना आमच्याकडे खूप कोंबड्या होत्या. तेंव्हा शेतकऱ्यांकडून जमा झालेली लेव्हीची ज्वारी न्यायला पार कोल्हापूर-सांगली पासून टरका यायच्या. त्यांचे टरकात ज्वारी भरण्यासाठी नंबर उशिरा लागायचे. आसपास एकच चा आणि खाऱ्याचे हॉटेल.

आम्ही कुण्या टरकवाल्याच्या आग्रहावरून एकदा अंडी उकडून दिली होती आणि मग ते नेहमीचेच झाले. खानावळ गावात होती, मग ती दाखविण्यासाठी केबिनमध्ये बसवून कुणी मला न्यायचे. ट्रक आल्या की,गाडी मागे घेताना किन्नर ओरडायचे ,"सिदा आंदेव, डायवर साइट को मारो, किन्नर साइट को मारो, फुल्ल टन मारो."

मग मी पण तसा आवाज काढून किन्नरांचे काम थोडे हलके करीतसे. कोल्हापूर सांगलीकडच्या गाड्या आल्या, की मी ट्रकच्या बॉडीला चिकटलेला गूळ उलथण्याने खरवडून काढीत असे. मला लिल्यांड ट्रकची केबिन आवडायची. त्याशिवाय टाटा रॉकेट मरचिडिस, हिंदुस्थान, फारगो, Dodge अशा कंपनीच्या ट्रक असत. अशा ट्रकमध्ये ज्वारीची शंभर पोती भरली की दहा टन लोड होतो; असे म्हणत. ट्रकमध्ये पोती भरण्याचे तंत्र होते. असो, तिथे ट्रकांचा संबंध सुटला.

उस्मानाबादला माझ्या बारावी नापासाच्या वाऱ्या सुरू झालेल्या असताना पहिल्या वारीच्या काळात आमच्या शेजारी पुण्याहून एक जोडपं राहायला आलं. गावडे आण्णा कोकणातले पण मुंबईत वाढलेले होते, तर मावशी.....असो. मुरूडला सिमेंटच्या लाईटच्या पोलची फटकरी सुरू झाली होती. ते सिमेंट पोल खेड्यांमध्ये पोचविण्याचे काम पुण्याच्या भाटिया ट्रान्सपोर्ट कंपनीने घेतले होते.

त्या कंपनीने उस्मानाबादला ऑफिस केल्याने अण्णा MHQ 2711 हा ट्रक घेऊन आलेले होते. त्यांच्या ट्रकवर किन्नर नव्हता. मला म्हणले, "चल येतोच का ट्रकवर." माझ्या आज्जीला पण नातू रांकिला लागल म्हणून बरं वाटलं. काम सोपं होतं. ट्रकला मागे बॉडी नव्हती आडवे मजबूत रॉड बसविलेले होते. गाडी मुरुडच्या फॅक्ट्रीत लावायची, क्रेन ने सिमेंटचे पोल ट्रकवर ठेवले जायचे.

पोल लांब असले तरी इंजिनच्या अर्थात केबिनच्या खूप पुढे जात आणि मागे बॉडीच्या बाहेर. ट्रक लोड झाला की आम्ही पोलवर चढून खिडकीतून केबिनमध्ये उतरत असू; कारण पोलमुळे केबीनचे दरवाजे उघडत नसत. अण्णा अबोल होते, सिगरेटी अगर बिड्या ओढीत. कधी मुंबईच्या आठवणीने, कोकणातील शेतीच्या आठवणी काढून हळवे होत. मग ते सिगारेट मध्ये गांजा भरून ओढीत.

Shahu Patole: ट्रक किन्नर: न संपणाऱ्या प्रवासाची गोष्ट!
Rajrshri Shahu Maharaj Kolhapur: शेतकऱ्यांच्या नांगरासाठी तोफा वितळवणारा रयतेचा राजा!

गाडी चालवीत असताना गांजा भरून देण्याचे काम मी लवकरच शिकलो (पुढे खडा टाकून चिलीम कशी भरायची, नारळाच्या केसराची गुंडी कशी करायची आणि छापी लावून देण्यापर्यंतची मास्टरकी मी प्राप्त केली होती). ते सिगारेटी मधील तंबाकू कागदात जमा करायला सांगत. मी त्या दोनेक महिन्यांच्या काळात उजेड, तुरोरी पासून पात्रुड, अंभी, अनाळा, डोंजा, मुरूम, तावशीगड,शिरूर अनंतपाळ, माडज, उदगीर, निलंगा,अहमदपूर अशा लांबलांबच्या तालुक्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील गावे पाहिली. उमर्ग्याजवळच्या माडजची आजही एक आठवण आहे, तिथं कोणतीतरी जत्रा होती; देवळाच्या पायथ्याला मटनाचं कालवण देणारी दुकानं लागलेली होती. त्या कालवणाची चव लय भारी होती.

ट्रक अनलोड करण्याची पण वेगळीच कला होती. गावातील लोक लगेच मदत करायचे. एका झाडाला सौन्दर बांधायचा ट्रक हळूहळू पुढे घ्यायचा, ट्रकच्या बावडीवर खांबाचे टोक आले, की लोक तिथे खांदे देत आणि ट्रक पुढे घेतला की पोल अलगद खाली ठेवीत. हे टेक्निक सांगायला मी लवकरच शिकलो. गाडी किती पुढे आल्यावर हात करून थांबायला सांगणे वगैरे, सगळं.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिकाम्या ट्रकमध्ये कधी प्यासेंजर बसत, बॉडी नसल्याने त्यांची आबदा व्हायची म्हणून आम्ही कुणाला केबिनवर बसवायचो. केबिनवरुन सौन्दर मागच्या नंबर प्लेटपर्यंत घट्ट बांधायचा, त्याला धरून कांही प्यासेंजरं बसत.. प्यासेंजरांचे पैसे अण्णा घेत नसत.मी त्यातून त्यांना गांजाच्या पुड्या दिल्या,की अण्णांचा चेहरा खुलायचा. उस्मानाबादमध्ये भारत टॉकीजच्या बाजूच्या वस्तीत लिंबाच्या झाडाखाली एक अपंग व्यक्ती बसलेली असायची, त्याच्याकडून मी गांजा आणायचो. पावसात गाडीच्या काचाना आतून बाष्प लागलं, की जमा केलेली सिगारेटची तंबाकू हातावर चोळून काचेला फासायची आणि रेडीएटर लिक झाल्यावर त्यात हळद टाकायची ही युक्ती मी त्यांच्याकडून त्या काळात शिकलो.

पोल टाकून उस्मानाबादला आलं की, मग दोनेक दिवस अण्णा देशीच्या अड्ड्यावर जात.मावशींच्या.अर्थात त्यांच्या मालकीनीच्या विंनतीवरून मला त्यांच्या सोबत जावेच लागे. सकाळी गेलो तर आम्ही अगोदर सिंदीच्या अड्डयावर जात असू. दुपारनंतर गेलो, तर देशीच्या अड्ड्यावर. तिथले चणे, बॉईल अंडे मला खूप आवडायचे.बहुतेक दारुडे प्रेमळ असतात आणि घुमी माणसं त्यांच्या दुःखामुळे आणखी घुमी झालेली असतात. दारू पिल्यावर ती भडाभडा दुःख व्यक्त करू लागत,बोलू लागत. त्यांचं कुणी तरी ऐकून घ्यावं ही त्यांची मनोमन इच्छा असते; याची मला तेंव्हा जाणीव व्हायची.

ट्रकवर असताना अण्णा दारू पीत नसत. पिल्यावर ते गिरगावातील आपल्या हॉटेलमध्ये चिल्लरने छोटा बॅरल कसा भरलेला असे, या बद्धल सांगत. डॉनबॉस्को हे शाळेचं नाव असतं, हे मला त्यांच्याकडूनच कळलं. तसेच देशीचा गुत्ता उघडल्यावर पहिल्या ग्राहकाला 'नवटाक' विनामूल्य दिली जाते, हे ही तिथंच कळलं. खूप चढलेली असलेल्या अण्णाना घरी आणलं , की ते काहीही न खाता झोपी जात. मावशींच्या हाताला खूप चव होती. त्या मुसलमानी पद्धतीचे मटण, बिर्याणी अप्रतिम बनवीत. दोनेक महिण्यात मी नेहमीच्या प्रमाणे ट्रक सोडून ट्रॅक बदलला. किन्नरला इंग्रजीत क्लिनर म्हणतात आणि मराठीत स्वच्छक हे मला खूप उशिरा समजले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com