
Dhule News : जिल्ह्यात उन्हाचे चटके दिवसेंदिवस वाढत आहेत. मार्च संपायला आठवड्याचा अवधी आहे. वाढत्या उन्हासोबतच काही टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्यात सध्या दोन हजारांवर हातपंप कार्यान्वित आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हातपंप दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींना अधिकार दिले आहेत.
त्यासाठी लागणारा खर्च १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केला जाणार आहे. हातपंपाची गरज पडल्यास मंजुरीचे काम विभागाकडून करण्यात येत आहे. सध्या काही गावांतील विहिरी कोरड्या पडल्याने तेथील लोक केवळ हातपंपांच्या पाण्यावर विसंबून आहेत. धुळे पाटबंधारे विभागाच्या १७ मार्चच्या अहवालानुसार जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये एकूण ४५३.९३ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात सिंचन प्रकल्प, विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खोल जाते. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो. अनेक भागात तर पाणी असूनही केवळ नियोजनशून्य कारभारामुळे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत धुळे पाटबंधारे विभागाच्या उल्लेखीत अहवालानुसार एकूण ३२७.८४, तसेच सुमारे ४५ लघु प्रकल्पांमध्ये सुमारे १२६.०९ दलघमी असा एकूण ४५३.९३ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.
दुरुस्तीचे काम
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी ५६ लाख ५४ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. यात ८७ उपाययोजना प्रस्तावित आहेत. मंजूर आराखड्यात जिल्ह्यातील ५७ गावे आणि ३० वाड्यांसाठी विहीर अधिग्रहणाचे नियोजन आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात हातपंप बसविण्यासह दुरुस्तीची कामे यापूर्वी जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी (हातपंप) विभागातर्फे केली जात होती.
आता पंचायत समितीस्तरावर दुरुस्ती पथकांमार्फत हातपंप दुरुस्तीची कामे करण्यात येतात. त्यासाठी या विभागाकडून पंचायत समितीस्तरावर हातपंप देखभाल व दुरुस्ती पथके नियुक्त आहेत. ग्रामपंचायतीकडून हातपंप नादुरुस्तीची तक्रार प्राप्त झाल्यावर दुरुस्ती पथकांकडून हातपंप दुरुस्तीचे काम करण्यात येते. दुरुस्तीसाठी प्रतिहातपंप अडीच हजार रुपयांप्रमाणे वार्षिक शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना हे शुल्क भरावे लागते.
हातपंपांवर मदार
उन्हाळ्यात जिल्ह्याच्या विविध भागांत विहिरी कोरड्या पडून पाणीटंचाई निर्माण होते. ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, म्हणून गावागावांत हातपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत दोन हजार १५६ हातपंप आहेत. त्यात सर्वाधिक ९११ साक्री, त्यापाठोपाठ शिरपूर ५५२, धुळे ३५५ तर शिंदखेडा तालुक्यात ३३८ हातपंप सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी (हातपंप) विभागामार्फत तालुकास्तरावर पंचायत समितीअंतर्गत हातपंप यांत्रिकी कार्यरत आहे. ही यंत्रणा तालुक्यातील बंद हातपंप दुरुस्तीचे काम करते. याकामी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तालुक्यातील कोणत्याही गावातील हातपंप नादुरुस्त असल्यास त्या गावात पथक पाठवून त्याची दुरुस्ती करण्याचे काम हे पथक करते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.