Silk Farming : रेशीमशेती ठरली शाश्वत उत्पन्नाचा स्रोत

Silk Production : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोरख एकनाथ बढे यांची केकतजळगाव (ता. पैठण) येथे पाच एकर शेती आहे. श्री. बढे हे चार वर्षांपासून रेशीम उद्योग करत आहेत.
Silk Farming : रेशीमशेती ठरली शाश्वत उत्पन्नाचा स्रोत

...........
शेतकरी नियोजन ः रेशीमशेती

Silk industry ; शेतकरी ः गोरख एकनाथ बढे
गाव : केकतजळगाव ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
एकूण शेती ः ५ एकर
तुती लागवड ः दीड एकर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोरख एकनाथ बढे यांची केकतजळगाव (ता. पैठण) येथे पाच एकर शेती आहे. श्री. बढे हे चार वर्षांपासून रेशीम उद्योग करत आहेत. त्याआधी पारंपरिक कपाशी व इतर पिकांचे उत्पादन ते घेत होते. मात्र, त्यातून आर्थिकदृष्ट्या फारसे काही पदरात पडत नव्हते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या शाश्वत उत्पन्न मिळेल अशा स्रोताच्या ते शोधात होते. त्यावेळी त्यांना रेशीमशेतीबाबत माहिती मिळाली. रेशीमशेतीस सुरुवात म्हणून तुती लागवड व शेड उभारणी करतेवेळी यात यश आले नाही तर शेळीपालन करू असा त्यांचा विचार होता. परंतु रेशीमशेतीस सुरुवात केल्यानंतर अल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळू लागले.
रेशीमशेतीमध्ये गोरख यांच्या पत्नी सौ. नंदा यांची मोलाची भूमिका बजावतात. अलीकडील दोन वर्षांत त्यांनी अंडीपुंजासाठी लागणाऱ्या कोशाचे उत्पादन घेण्यात हातखंडा तयार केला आहे. मागील चार वर्षांत रेशीम उद्योगाच्या माध्यमातून बढे कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळाली आहे.

रेशीम उद्योगाची सुरुवात ः
रेशीम उद्योगाची सुरुवात करण्यासाठी २२ बाय ६० फूट आकाराचे शेड उभारले. तसेच दीड एकरांमध्ये चार बाय दीड फूट अंतरावर तुतीची लागवड केली. हळूहळू व्यवसायात चांगला जम बसून रेशीममधून चांगले उत्पन्न हाती येऊ लागले. त्यातून आत्मविश्वास वाढला. पुढे काही महिन्यामध्येच त्यांनी एक एकर क्षेत्रावरील मोसंबी बागेत आंतरपीक म्हणून तुतीची अर्धा एकरावर दुसरी लागवड केली. वर्षभरात साधारण ४ ते ५ बॅच घेतल्या जातात. एक बॅच सरासरी ३०० अंडीपुंजाची असते.

सिंचनाच्या सोयी ः

रेशीम उद्योगाने दिलेल्या आर्थिक आधारामुळे एक सामाईक व एक स्वतःची अशा दोन विहीर खोदून सिंचनाच्या पाण्याची सोय केली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे ओळखीच्या एका शेतकऱ्याकडून त्याच्याकडील शेततळ्यातील पाणी तुती बागेसाठी राखीव ठेवण्याची विनंती केली आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी संपूर्ण क्षेत्र त्यांनी ठिबक सिंचनाखाली आणले आहे.

Silk Farming : रेशीमशेती ठरली शाश्वत उत्पन्नाचा स्रोत
Silk Farming : शेतकरी नियोजन : रेशीमशेती


कोष उत्पादन ः
दरवर्षी रेशीम कोष उत्पादनाच्या एकूण पाच बॅच घेतल्या जातात. कोष उत्पादनास सुरुवात केल्यानंतर पहिल्या वर्षी १०० ते १५० अंडीपुंजांच्या (चॉकी) पाच बॅच, दुसऱ्या वर्षी १५० ते २०० चॉकीच्या पाच बॅच तर तिसऱ्या वर्षी ३०० चॉकीच्या पाच बॅच घेतल्या आहेत. यावर्षी पाऊस कमी झाल्याने नियोजनानुसार चौथी बॅच अधिक अंडीपुंजाची घेणे शक्य झाले नाही. पारंपारिक कोष उत्पादन करताना १०० अंडीपुंजांपासून ८० ते ८५ किलोपर्यंत कोश उत्पादन त्यांनी घेतले आहे. मागील दोन वर्षांत अंडीपुंजासाठी लागणारे कोश उत्पादन करताना ४० ते ७० किलोपर्यंत प्रति १०० अंडीपुंजाला कोश उत्पादन घेणे शक्य झाल्याचे श्री. बढे सांगतात.

Silk Farming : रेशीमशेती ठरली शाश्वत उत्पन्नाचा स्रोत
Silk Farming : रेशीम शेतीतून मिळवला आर्थिक स्रोत अन् बाजारपेठही

बॅच नियोजन ः
दरवर्षी साधारणतः २० मे च्या दरम्यान तुती बागेची छाटणी केली जाते. त्यानंतर बागेला पाणी देऊन खत मात्रा दिली जाते. त्यानंतर आंतरमशागतीची कामे करून पुन्हा पाणी सोडले जाते. साधारणतः एक जुलैच्या दरम्यान बॅचच्या नियोजनानुसार अंडीपुंजाची आगाऊ मागणी नोंदविली जाते. त्यानुसार साधारण १० जुलै दरम्यान अंडीपुंज शेडवर प्रत्यक्ष प्राप्त होऊन बॅच सुरू होते. साधारण विसाव्या दिवशी चंद्रिका टाकल्या जातात. प्रत्येक बॅचमध्ये रेशीम कीटकांना योग्य प्रमाणात दर्जेदार तुती पाला उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. चंद्रिका टाकल्यानंतर बागेकडे लक्ष केंद्रित करून आंतरमशागतीची कामे, खत, सिंचन व्यवस्थापनावर भर दिला जातो. एक बॅच पूर्ण झाल्यावर पुढील बॅचसाठी पाला उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जाते.

शेड निर्जंतुकीकरणावर भर ः
एक बॅच संपली की लगेच संपूर्ण शेड पूर्ण स्वच्छ करून घेतले जाते. बॅच घेतल्यानंतर रेशीम कीटकांना कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बॅच गेल्यानंतर प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केल्यानंतर साधारण ४८ तासांनी शेड उघडून त्यातील दमटपणा गेल्यानंतर पहिली बॅच सुरू केली जाते. शेड निर्जंतुकीकरणाच्या फवारणीसाठी ब्लिचिंग पावडर, चुना टाकला जातो. या द्रावणाने शेडमधील नेट, शेडचे छत व रॅकचे निर्जंतुकीकरण केले जाते.
चॉकी व्यवस्थापन ः
चॉकी शेडमध्ये आणल्यानंतर निर्जंतुकीकरण पावडर मारून नंतर कीटकांना खाण्यासाठी पाला टाकला जातो. सुरुवातीचे काही दिवस तिसरा मोल्ट पास होईपर्यंत सकाळ व संध्याकाळी सिंगल काडी तुती पाला टाकला जातो. तिसरा मोल्ट पास झाल्यानंतर डबल काडी पाला वापरला जातो. अशा पद्धतीने प्रत्येक मोल्टनंतर पाल्याचा वापर वाढविला जातो असे श्री. बढे सांगतात.

खत आणि पाणी व्यवस्थापन ः
- प्रत्येक बॅच सुरु करण्यापूर्वी तुती बागेची छाटणी करून रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. त्यानंतर आंतरमशागतीची कामे करून पहिले पाणी दांडाने मोकळे दिले जाते. त्यानंतर आठ दिवसांनी तुतीच्या दीड एकर क्षेत्रात दोन टप्पे पाडून प्रत्येक टप्प्याला आठ तास वापसा स्थितीनुसार पाणी दिले जातात.
- प्रत्येक बॅच घेताना रासायनिक खतांच्या मात्रा आलटून-पालटून देण्याचे त्यांचे नियोजन असते. त्यानुसार पहिल्या वेळी १०:२६:२६, बोरॉन आणि सल्फरच्या प्रत्येकी एक बॅग दिल्या जातात. दुसऱ्या वेळी युरिया २५ किलो, दाणेदार पोटॅश एक बॅग याप्रमाणे मात्रा दिल्या जातात. आलटून-पालटून खतमात्रा देण्याचे नियोजन केल्यामुळे दर्जेदार तुती पाला उपलब्ध होत असल्याचे श्री. बढे सांगतात. शिवाय दोन वर्षांतून एकदा उन्हाळ्यात चार ते पाच ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत तुती लागवडीस दिले जाते.

आगामी नियोजन ः
- सध्या शेडमध्ये कोष काढणीची कामे सुरु आहेत. ही बॅच फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीस घेण्यात आली होती. साधारण ३०० अंडीपुंजाची ही चौथी बॅच अंतिम टप्प्यात आहे.
- सध्या तुती बागेमध्ये छाटणी करून घेतली आहे. बाग फुटण्याच्या स्थितीत आहे.
- बागेत आंतरमशागतीची कामे करून रासायनिक खतमात्रा आणि सिंचन केले आहे.
- यावर्षी तुती लागवडीस सिंचनासाठी पाणी कमी असल्याने साधारणतः ३० मार्चनंतर आणखी एक बॅच घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

- गोरख बढे, ९६६५५९१०५९
९४२१३१४२५९
(शब्दांकन :संतोष मुंढे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com