Soybean Variety : बदलत्या हवामानासाठी निवडा सोयाबीनचे योग्य वाण

Soybean Crop Farming : सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड ही जमिनीचा प्रकार, वातावरण बदल, परिपक्वतेचा कालावधी यानुसार करणे गरजेचे आहे. वाणांची निवड कशी करावी, याची माहिती या लेखातून घेऊ.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. अनंत इंगळे

Soybean Production : वातावरण बदलामुळे शेती आणि सोयाबीनसारख्या पिकांवर अनिष्ट परिणाम होत आहेत. वातावरण बदलाला प्रतिकारक व स्थानिक हवामानास अनुकूल असे वाण निवडावेत. सोबतच जमिनीच्या प्रकाराचाही विचार करावा.

अत्यंत हलक्या, उथळ किंवा मुरमाड जमिनीमध्ये सोयाबीन पीक घेणे टाळावे. जमिनीत सेंद्रिय कर्ब चांगले असावे. विद्यापीठ किंवा संशोधन संस्था आपल्या विभागासाठी शिफारस केलेले वाण निवडावेत.

जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड

हलकी-मध्यम-भारी अशा तीन प्रकारच्या जमिनीसाठी वेगवेगळ्या वाणांची निवड करणे गरजेचे असते.

हलकी जमिनीसाठी ८५ ते ९५ दिवसांत तयार होणारे आणि मध्यम जमीन असल्यास ९५ ते १०० दिवसांत तयार होणारे वाण निवडावेत. उदा. जे.एस.-९३०५, पी.के.व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस-१००३९), एम.ए.यु.एस.-७२५, एम.ए.सी.एस.-१४६० आर.व्ही.एस.एम.-१८, एम.ए.यु.एस-१५८, एम. ए.यु.एस.-६१२,जे.एस.-३३५ इ.

भारी जमीन असल्यास मध्यम ते उशिरा येणारे वाण निवडू शकतो. उदा. फुले किमया, फुले संगम, फुले दुर्वा, एम. ए.यु.एस-७१, एम. ए.यु.एस- ६१२, फुले कल्याणी, तसेच पी.के.व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस -१००३९) इ.

भारी जमीन व सिंचनाची व्यवस्था असल्यास तरच उशिरा येणारे वाण निवडावेत. पाणी देणे शक्य नसेल तर मध्यम कालावधीत येणारे वाण निवडावेत. आपल्या कडे भारी जमीन असेल तर उशिरा व मध्यम कालावधीत येणारे दोन - तीन वाण निवडू शकतो. एकाच वाणावर अवलंबून राहणे टाळावे.

Soybean
Soybean Seeds: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट

वातावरण बदलाच्या परिणामावर मात करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणाऱ्या वाणाची निवड करणे आवश्यक आहे उदा. आपल्याकडे. १० एकर जमीन असेल तर भारी जमीन : ४ एकर उशिरा येणारे (फुले संगम किंवा फुले किमया), मध्यम जमीन : ३ एकर : मध्यम कालावधीत येणारे (फुले दुर्वा, फुले किमया, एम.ए.यु.एस.-७२५, सुवर्ण सोया, जे.एस.-३३५, किंवा पी.के.व्ही.- अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस -१००३९), एम. ए.यु.एस-७१ असे), हलकी व मध्यम : ३ एकर लवकर येणारे वाण (जे.एस.९३०५, आर.व्ही.एस.एम-१८, पी.के.व्ही.- अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस -१००३९) अशाप्रकारे नियोजन करावे. पाऊस कमी किंवा जास्त झाला तरी नुकसानीचे प्रमाण किमान राहील. मागील दोन वर्षे १०० दिवसांत परिपक्व होणाऱ्या सोयाबीनच्या काढणीच्या काळात पाऊस झाला. परिणामी मोठे नुकसान झाले. मात्र या पावसातून उशिरा व लवकर येणारे वाण सुटले.

वाढीनुसार लागवडीचे नियोजन

फुले संगम व फुले किमया ही उंच व जास्त प्रमाणात वाढणारे वाण आहे. याची दाट पेरणी केल्यास उत्पादन मिळत नाही. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार फुले संगम या वाणाच्या पानाचा रंग थोडा पिवळसर असल्याने रस शोषक किडींसोबतच चक्री भुंगा, खोड अळीचा प्रादुर्भाव जास्त आढळळा.

एकच वाण निवडण्याऐवजी थोड्या थोड्या क्षेत्रावर विभागून फुले संगम, फुले किमया किंवा फुले दुर्वा वाणांचा निवड करावी. फुले संगम आणि फुले किमया व्यवस्थापनाला चांगला प्रतिसाद देणारे वाण आहेत.

पिकाची नियोजन वेळेत व काटेकोरपणे केल्यास चांगले उत्पादन मिळते. फारशी देखभाल न जमणाऱ्या शेतकऱ्यांनी हे वाण टाळावेत. भारी जमिनीसाठी फुले संगम, मध्यम जमिनीसाठी फुले किमया, फुले दुर्वा किंवा इतर मध्यम कालावधीत येणारे वाण निवड करावेत.

Soybean
Soybean Variety : ‘दफ्तरी अॅग्रो’चे ‘सोयाबीन ३५४’ वाण बाजारात

सोयाबीनचे वाण व त्यांची वैशिष्ट्ये

फुले संगम (के.डी.एस.-७२६) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे २०१७-१८ साली प्रसारित झालेले, १०५-११० दिवसांत परिपक्व होणारे, जाड दाणा, भारी जमीन व चांगले व्यवस्थापन असेल तर अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण. लागवडी साठी ४५ x ८-१० सेंमी असे अंतर ठेवावे. जाड व चमकदार दाणा. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २५-३० क्विंटल.

फुले किमया (के.डी.एस.-७५३) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे २०१९-२० साली प्रसारित झालेले, १००-१०५ दिवसांत परिपक्व होणारे वाण, जाड व चमकदार दाणा, अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण, ४५ x ७-१० सेंमी वर लागवड करावी, सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २७ ते ३२ क्विंटल.

फुले दुर्वा (के.डी.एस. ९९२) ः २०२१ मध्ये प्रसारित, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांसाठी शिफारसीत मध्यम कालावधीचे (९५ ते १०० दिवस.) वाण. उंची १.५-२ फूटापर्यंत असून, खोडाची जाडी जास्त असल्याने फांद्यांची संख्या जास्त असते. पाने थोडी त्रिकोणी, फिक्कट हिरवी, चार पानाचे प्रमाण मध्यम, ३ पाने संख्या जास्त प्रमाणात दिसून व पाने थोडी वरती वाढलेली दिसतात. खोडावर व शेंगेवर लव थोड्या प्रमाणात असते. एका ठिकाणी शेंगांची संख्या ५-६ म्हणजे इतर वाणांच्या तुलनेत जास्त दिसून येते. तांबेरा रोग, खोडमाशी किडीस प्रतिकारक्षम. योग्य व्यवस्थापनात हेक्टरी सरासरी २७-३५ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

एम.ए.यु.एस.७२५ : २०२२-२३ मध्ये प्रसारित, महाराष्ट्र व जवळच्या राज्यांसाठी शिफारसीत लवकर (९२ ते ९५ दिवस) येणारे वाण. उंची १.५ फूटापर्यंत, पाने लांब त्रिकोणी, गडद हिरवी, खोडावर व शेंगेवरही लव. शेंगांची संख्या जास्त, शेंगामध्ये चार दाणे असल्याने दाणे थोडे लहान आणि चकाकदार असतात. खोडमाशी, चक्री भुंगा किडीस प्रतिकारक्षम. भारी, मध्यम आणि हलक्या अशा तीनही जमिनीत योग्य व्यवस्थापनात अतिशय चांगले उत्पादन २२ ते २७ क्विंटल प्रती हेक्टर शक्य.

जे. एस.-९३०५ : २००२ साली प्रसारित, ८५-९० दिवसांत परिपक्व होणारे लवकर येणारे वाण, हलकी व मध्यम जमीन, तसेच ३०-३८ सेंमी x ६-८ सेंमी अशी लागवड करावी. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २०-२५ क्विंटल.

जे. एस.-३३५ : १९९४ मध्ये प्रसारित झालेले अतिशय लोकप्रिय असे वाण. ९५-१०० दिवसांत परिपक्वता, ३८ x १० सेंमी अंतरावर मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २५ -२८ क्विंटल.

जे. एस. -२०९८ : २०१७-१८ साली प्रसारित झालेले, उंच वाढणारे असून हार्वेस्टरने काढणीस योग्य वाण, ९५-९८ दिवसांत परिपक्वता, हेक्टरी सरासरी २५-२८ क्विंटल उत्पादन.

जे.एस.-९५६० : लवकर येणारे (८२-८८ दिवस ) चार दाण्याच्या शेंगा. दुष्काळसदृश्य परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे वाण.

एम.ए.यु.एस.-७१ (समृद्धी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथून २०१० साली प्रसारित. ९५-१०० दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण, मध्यम ते भारी जमीनीत लागवडी साठी योग्य. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २८-३० क्विंटल

एम.ए.यु.एस.-१५८ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथून२०१० साली प्रसारित झालेले, ९३-९८ दिवसांत परिपक्व होणारे, हलक्या व मध्यम जमीनीत लागवडीसाठी योग्य. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २६-३१ क्विंटल.

एम.ए.यु.एस.-६१२ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथून २०१६ साली प्रसारित. ९४-९८ दिवसांत परिपक्वता. उंच वाढ, वातावरण बदलामध्ये तग धरणारे वाण, सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी ३०-३२ क्विंटल. दुष्काळ सदृश्य परीस्थिती व आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वाण.

एम.ए.सी.एस -१४६० : ९५ दिवसांत परिपक्वता. होणारे वचांगले उत्पादन देणारे वाण,सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २५-३०क्विंटल. दुष्काळसदृश्य परिस्थितीमध्ये चांगले उत्पादन देण्याची क्षमता. कीड व रोगास कमी प्रमाणात बळी पडतो.

एम.ए.सी.एस-११८८ : १०० दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण, सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी २५-३०क्विंटल.

१४. एन.आर.सी.-३७ (अहिल्या-४) : २०१७ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांसाठी शिफारसीत, ९६-१०२ दिवसांत परिपक्व होणारे वाण. सरासरी उत्पादन ३५-४० क्विंटल प्रती हेक्टर.

एन.आर.सी.-१५७ : २०२१-२२ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित. उशिरा (२० जुलै पर्यंत) लागवडीसाठी शिफारसीत, ९४ दिवसांत परिपक्व होणारे वाण. सरासरी उत्पादन १६-२० क्विंटल प्रती हेक्टर.

एन.आर.सी.-१३८ (इंदोर सोया १३८) : २०२१ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित. तांबेरा आणि पिवळा मोझ्याक रोगास प्रतिकारक्षम, ९०-९४ दिवसांत परिपक्वता. सरासरी उत्पादन २५-३० क्विंटल प्रती हेक्टर देणारे वाण.

एन.आर.सी.-१४२ : ९८ दिवसांत परिपक्व होणारे, ३२ क्विंटल प्रती हेक्टर सरासरी उत्पादन देणारे वाण, दाणा जाड आणि चकाकदार.

एन.आर.सी.-१८८ : हिरव्या शेंगा खाणे व भाजीयोग्य नवीन सोयाबीन वाण. हिरव्या शेंगाचे उत्पादन ४०-४५ क्विंटल प्रती एकर.

आर.व्ही.एस.एम.-२०११-३५ : ९४-९६ दिवसांत परिपक्व होणारे, यलो मोझॅक, चारकोल रॉट या रोगास प्रतिकारक्षम. शेंगा फुटण्यास प्रतिकारक, तीन - चार दाण्याच्या शेंगा. दाणा जाड, चकाकदार. सरासरी उत्पादन : २५-२८ क्विंटल प्रती हेक्टर.

डॉ. मिलिंद देशमुख (सोयाबीन पैदासकार), ९४२२२१०४७६

डॉ. अनंत इंगळे (संशोधन सहयोगी),

८३२९६६९०७७ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com