Indian Agriculture : शोध नदीकाठी हरवलेल्या दोन भावंडांचा

GI Rating : शहागडच्या टरबुजास एक वेगळीच चव होती आणि ती होती त्या वाहत्या गोदामाईमुळे आणि तिच्या किनाऱ्‍यावरील बारीक वाळू मुळे. आज गोदा वाहती असती तर शहागडच्या टरबुजास ‘जीआय’ मानांकन नक्कीच मिळाले असते.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

डॉ. नागेश टेकाळे

Dr. Nagesh Tekale : शहागडच्या टरबुजास एक वेगळीच चव होती आणि ती होती त्या वाहत्या गोदामाईमुळे आणि तिच्या किनाऱ्‍यावरील बारीक वाळू मुळे. आज गोदा वाहती असती तर शहागडच्या टरबुजास ‘जीआय’ मानांकन नक्कीच मिळाले असते.

भविष्यामधील धुरकट कृषी चित्रापेक्षा भूतकाळामधील मी अनुभवलेली, पाहिलेली शेती मला जास्त आनंद देते. अनेक अभ्यासक म्हणतात, भूतकाळामध्ये जगू नका, वर्तमानाकडे पाहा आणि भविष्याचे नियोजन करा. परंतु सध्याचे वातावरण बदलाच्या प्रभावाखालील शेतीचे विदारक चित्र पाहता मला माझ्या शालेय जीवनामधील कृषी आणि त्यास जोडलेला सुरेख सुंदर निसर्गातच जास्त रमावयास आवडते. आताही तसेच झाले सर्व जगच घड्याळ्याच्या काट्यानुसार थोडे मागे पुढे नवीन वर्षाच्या जल्लोषपूर्ण स्वागतामध्ये रमून गेले असताना मी मात्र भूतकाळातच हरवून गेलो होतो.

त्यास कारण होते ३१ डिसेंबरच्या ‘अॅग्रोवन’मधील ‘खानदेशात डांगरमळे उरले केवळ नावालाच’ ही बातमी! पारंपरिक पिके लयास गेली, भूगर्भातील पाणी खोल गेले, थंडी गायब झाली, उन्हाळा तीव्र झाला, पाऊस लांबला, नक्षत्र ऋतू हरवून गेले त्याच बरोबर संत सावतामाळी यांच्या ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’ या अभंगामधील भाज्याही हरवत चालल्या आहेत. म्हणूनच ‘डांगरमळे हरवले’ हे माझ्यासाठी धक्कादायक होते.

१९६८-७० च्या काळात उच्च शिक्षणानिमित्त छत्रपती संभाजीनगरला असताना मी नेहमीच आई-वडील, बहीण, भाऊ यांच्या आठवणीने व्याकूळ होऊन माझ्या लहानशा गावाला सहा-सात तास प्रवास करून बसने जात असे. माझ्या या प्रवासात जाता येता मला बीड, छत्रपती संभाजीनगर या दोन स्थानकामधील शहागड हे बसस्थानक लागत असे.

येथे बस अनेक वेळा १०-१५ मिनिटे थांबत असे. ती फक्त प्रवाशांना लाल भडक टरबुजाच्या गोड फोडीचा मनमुराद आस्वाद घेता यावा यासाठीच! चार-पाच बस थांबलेल्या, त्या भोवती २०-२५ टरबूज विक्रेते फिरत असलेले विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यावरील कपड्याखाली झाकलेल्या टरबुजाच्या लाल फोडी पटापट रिकाम्या होत. या गोड फोडींचा मी नेहमीच आस्वाद घेत असे. आई-वडिलांच्या पाया पडल्यावर आईने हातात घातलेले चार आणे माझ्या मुठीत बंद असत ते याच फोडींसाठी! आईची तशी आज्ञाच होती.

Indian Agriculture
Indian Agriculture : सूक्ष्मजीव ठेवतील आपली शेती जिवंत

बीडच्या घाटातून बस जाताना तिचा वेग ताशी पाच कि.मी. एवढा मंद असे, अनेक वेळा त्या १५-२० मिनिटांच्या प्रवासात भीतीने पोटात खड्डा पडत असे, आज याच घाटातून ७०-८० प्रति किलोमीटरच्या वेगाने गाड्या धावत आहेत, यासाठी कुणी त्याग केला? त्या निसर्गरम्य डोंगर आणि त्यावरील घनदाट वृक्षराजीनेच ना, पण आपण हे किती सहज विसरून गेलो. बीड, छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून गेवराई स्थानकाच्या पुढे शहागड आणि तेथे असणारे गोदावरीचे ते भव्य दिव्य पात्र पाहताना डोळे दिपून जात.

अनेक वेळा समुद्रच आपल्यासमोर उभा आहे असा भास होत असे. पूल आला की खिडकी उघडून मी त्या अथांग पाण्याकडे चार-पाच मिनिटे पाहत असे. एकेरी वाहतूक आणि हळूहळू चालणारी बस त्यामुळेच गोदामाईचा पोटभर आशीर्वाद मला प्रत्येक प्रवासात मिळे. उन्हाळा सुरू झाला की गोदेच्या दोन्हीही तीरांवरील वाळू उघडी पडे आणि तेथेच टरबुजांचे शेकडो मळे फुलत. नजर जिथपर्यंत जाईल तेथपर्यंत मध्ये वाहणारी गोदावरी आणि तिच्या दोन्ही तीरांवर डांगरमळा. हेच सर्व खरबूज, टरबूज तेथून बस स्थानकावर विक्रीस येत आणि उन्हाच्या काहिलीमध्ये त्या लालभडक गोड गरामधून

Indian Agriculture
Indian Agriculture : शेती फायदेशीर करणारी स्लरी!

जिभेवर अमृताचा पाटच वाहत असे. या वेलवर्गीय पिकांचे उत्पादन शेतकरीच घेत होते, व्यापारी जागेवरच खरेदी करून बस स्थानक तसेच आठवडी बाजारात त्यांची विक्री करत. शहागडच्या टरबुजास एक वेगळीच चव होती आणि ती होती त्या वाहत्या गोदामाईमुळे आणि तिच्या किनाऱ्‍यावरील बारीक वाळूमुळे!

आज गोदा वाहती असती तर शहागडच्या टरबुजास ‘जीआय’ मानांकन नक्कीच मिळाले असते. परंतु गोदा उगमापासूनच आटली, विकासकांनी तिची सोन्यासारखी वाळू लुटून नेली, वाळू म्हणजे नदीचा प्राण, नदी हरवली आणि तिच्या निसर्गरम्य काठावरील डांगरशेती सुद्धा! हा होता माझा आनंददायी भूतकाळ!

आज वर्तमानाकडे नजर टाकताना आढळते की नद्या आटून गेल्यामुळे आणि वाळू नष्ट झाल्याने नदी काठावरील खरबूज, टरबूज ही पिके जी उन्हाळ्यात वाहत्या नदीच्या प्रवाहा बरोबर जोडलेली होती ती लुप्त झाली आहेत. या वेलवर्गीय पिकास रेतीमिश्रित वाळू आवश्यक आहे. आजही हे उत्पादन घेतले जाते मात्र अनेक ठिकाणी त्यास भूगर्भातून पाणी उपसून दिले जाते. जिथे डोह असतो, थोडे पाणी असते तेथे हे उत्पादन मिळते. मोठमोठी धरणे बांधून मुक्त वाहणाऱ्या निसर्गाच्या सरितारुपी वाहिन्यांना बंदिस्त केले गेले.

एखाद्या डोहाजवळ कुण्या गरीब, गरजू शेतकऱ्याची डांगरबाग असेल आणि नदी काठच्या लोकांचा पाण्यासाठी आक्रोश, आंदोलन सुरू झाले की वरच्या धरणातून पाणी सोडले जाते आणि डांगरबाग अगदी सहज वाहून जाते. दोष कुणाचा? बारमाही वाहत्या नद्या कोरड्या पडल्या त्यांचा? की वाळू उपसा करणाऱ्‍यांचा? पूर्वी निसर्ग आणि शेतकरी दोघे मिळून शेती करत होते. आज शासन आणि शेतकरी दोघे मिळून शेती करत आहेत. आज शेतकऱ्‍यास शेतात मदत करणारे शेतमजूर शासनांच्या विविध योजनांमुळे राजे झाले आहेत, तर बळीराजा स्वत:चाच मजूर झाला आहे.

पूर्वी वाहती नदी ही निसर्गाच्या मालकीची होती जी त्याने शेतकऱ्‍यांना, लहान मोठ्या गावांना तिचे पावित्र्य राखून मुक्तपणे वापरण्यास दिली. नद्यांवर धरणे बांधली गेली. त्यामुळे निसर्गाचे पाणी शासनाच्या मालकीचे झाले आणि धरणाखालील शेतकरी पुन्हा परावलंबी झाला यावर उपाय काय? तर शेतकऱ्‍यांनी, युवकांनी गाव परिसरामधील कोरड्या पडलेल्या लहान नद्या, नाले, ओढे यांना पुन्हा जिवंत करून वाहते करावयास हवे, वाळू उपसा करण्यास गावानेच बंदी करावयास हवी, नदी उगमाच्या ठिकाणी घनदाट वृक्षराजी निर्माण करावी.

आकाशातील काळ्या ढगांना सरितेने एका ठिकाणी थांबलेले कधीच आवडत नाही म्हणूनच गाव पातळीवर नद्यांना वाहते करा. वाहती नदी वाळूला किनाऱ्‍यावर लोटते आणि येथेच पुन्हा डांगरमळा फुलतो. प्रत्येक गोष्ट शासन करेल असे म्हणून हाताची घडी घालून उरल्या सुरल्या निसर्गाकडे उदास मनाने पाहण्यात काय अर्थ आहे? सेंद्रिय शेती, गोठ्यामधील दुभती गाय, शेतातील पारंपरिक पिके, भाज्या, फळे आणि वाहती नदी हे सर्व निसर्गाचे म्हणजे शेतकऱ्‍यांचे स्वतःच्या मालकीचे आहे. खरबूज, टरबूज ही दोन भावंडे येथेच तर उन्हाळ्यात आपणास भेटतात. आज ती नदी बरोबरच हरवली आहेत. नदीला जिवंत करा, ती आपोआप त्यांच्या मधुर, गोड गरासह पुन्हा तुमच्या भेटीस येतील.
(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com