Food Grain Production : अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे

Food Security : रुसलेल्या मॉन्सूनमुळे राज्याच्या खरिपावर आलेले संकट यंदाच्या अन्नधान्य उत्पादनात मोठी घट करणारे ठरू शकते, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे.
Food Grain Production
Food Grain ProductionAgrowon

Pune News : रुसलेल्या मॉन्सूनमुळे राज्याच्या खरिपावर आलेले संकट यंदाच्या अन्नधान्य उत्पादनात मोठी घट करणारे ठरू शकते, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. सद्यःस्थितीत भात, तूर, कपाशी वगळता इतर सर्व पिकांचे उत्पादकता घटणार असल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खरिपाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात गेल्या हंगामाच्या तुलनेत सध्या २० ते ३० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज कृषी खात्याचा आहे. मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मते काही जिल्ह्यांमध्ये पिकाचे नुकसान ३० ते ४० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. सोयाबीनची उत्पादकता गेल्या हंगामाच्या तुलनेत आताच १२ टक्क्यांपर्यंत घटल्याचा अंदाज आहे.

बाजरीच्या उत्पादकतेत ३१ टक्के, मका ३५ टक्के, तर ज्वारीच्या उत्पादकतेत प्रतिहेक्टरी सहा टक्के घट होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. अर्थात, ही स्थिती ऑगस्ट अखेरची आहे. सप्टेंबरच्या पंधरवड्यात पाऊस न झाल्यास घटीच्या टक्केवारीत अजून वाढ होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Food Grain Production
Food Grain Production : उत्पादन वाढतेय उत्पन्नवाढीचे काय?

राज्याच्या खरिपात सोयाबीन आघाडीचे नगदी पीक समजले जाते. परंतु औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, बीड, जालना जिल्ह्यांतील उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट आताच दिसत आहे. सोयाबीन उत्पादन २८ जिल्ह्यांमध्ये होते. यंदा अमरावती, यवतमाळ, थोड्याफार फरकाने नांदेड, लातूरमधील सोयाबीन उत्पादकता चांगली राहण्याचा अंदाज आहे. अर्थात, दुष्काळसदृश स्थितीचा विस्तार झाल्यास या जिल्ह्यांमधील सोयाबीनदेखील संकटात येऊ शकते.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, बुलडाण्यासह लातूर, वाशीम, परभणी, जालना, बीड, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमधील कपाशीला कमी पावसाचा फटका बसणार आहे. कापूस उत्पादक मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात दहा टक्के; तर लातूर विभागात चार टक्के उत्पादकता घटणार आहे. परतीचा पाऊस न झाल्यास मराठवाड्यातील यंदाची कपाशीची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटेल, असेही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वाटते.

कमी पावसामुळे कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना यंदा अधिक संकटात टाकले आहे. उडीद व मुगाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत काही जिल्ह्यांमध्ये यंदा निम्म्यापेक्षा कमीच होणार आहे. तुरीचे उत्पादन सध्या बऱ्यापैकी दिसत असले, तरी नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, अकोला, वाशीम, बुलडाणा या प्रमुख जिल्ह्यांतील तुरीच्या उत्पादकतेत मात्र घट होण्याचे संकेत मिळत आहेत.

Food Grain Production
Food Grain Production : अन्नधान्य, कडधान्य, सोयाबीन, कापसाच्या उत्पादनात वाढ

सोयाबीनप्रमाणेच कपाशी हक्काचे दुसरे नगदी पीक आहे. कपाशी उत्पादक प्रमुख १३ जिल्ह्यांपैकी धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, परभणी, नांदेड, वाशीम या जिल्ह्यांमधील उत्पादकता घटणार असल्याचा अंदाज आहे. उर्वरित जिल्ह्यात कपाशी चांगल्या स्थितीत असली, तरी पावसाचे खंड वाढल्यास तेथेही समस्या वाढू शकतात.

पावसाचे खंड सतात वाढत असल्यामुळे साऱ्या खरिपावर हळूहळू उत्पादन घटीचे मळभ पसरू लागले आहे. राज्यातील २५७९ महसूल मंडलांपैकी ६०० मंडलांमध्ये १४ ते २१ दिवस पाऊस झालेला नाही. तसेच ४५० मंडलांमध्ये २१ दिवसांपासून पाऊस नाही. खंड वाढल्यास सर्वच पिकांच्या उत्पादकतेला बाधा येऊ शकते, असा क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

पीक – सरासरी उत्पादकता- गेल्या हंगामातील उत्पादकता अंदाज- चालू हंगामातील उत्पादकता अंदाज- उत्पादकतेमधील घटीची टक्केवारी

भात -२०२८.०२ --२२२०.६६–२३०३.५३- ४ टक्के जादा

खरीप ज्वारी-९३९.७८–९५२.७१–८९७.६१- ६ टक्के कमी

बाजरी-८९१.७१–१०९०.७३–७५७.६२–३१ टक्के कमी

नागली- ११२४.११–१३२६.६३–११८१.४०–११ टक्के कमी

मका -२५९४.०३–३०७९.५४–१९९२.४३–२५ टक्के घट

तूर -९७१.३१–७८७.३१–९२६.०४–१८ टक्के जादा

मुग-४५१.८३–६३१.५१–४२२.५४–३३ टक्के घट

उडीद-४७२.२९–६२९.८७–४३५.६७–३१ टक्के घट

भुईमूग -११००.२९–११८८.५४–१०४५.३६–१२ टक्के घट

सोयाबीन-११७५.८४–१३४५.२९–११८४.८४–१२ टक्के घट

कापूस -३२०.१६–३३८.१९–३८१.९४–१३ टक्के जादा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com