Rural School Transformation: कृतीयुक्त शिक्षणातून शाळेचा कायापालट

Digital Village Education: सांगलीच्या खरशिंग येथील जिल्हा परिषद शाळेला ‘मॉडेल शाळा’ बनवणाऱ्या शिक्षक तारीश अत्तार यांचा शिक्षण क्षेत्रातील दोन दशकांचा प्रवास प्रेरणादायक आहे. त्यांनी डिजिटल शिक्षण, लोकवर्गणी, आणि कृतीयुक्त अध्यापनाच्या माध्यमातून शाळेचा संपूर्ण कायापालट घडवून आणला.
Teacher Tarish Attar and their Students
Teacher Tarish Attar and their StudentsAgrowon
Published on
Updated on

डॉ. कैलास दौंड

Zilla Parishad Model School: सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ येथे कार्यरत असलेले शिक्षक तारीश अब्बास अत्तार यांच्या शैक्षणिक योगदानाची फलश्रुती विद्यार्थ्यांच्या विकासात सुरुवातीपासूनच पाहावयास मिळते.

तारीश अत्तार यांच्या नोकरीची सुरुवात २००१ मध्ये जि. प. प्रा. शाळा पाटीलवस्ती (बोरगाव) ता. कवठेमहांकाळ या डोंगरातील शाळेपासून झाली. तिथे जायचे म्हणजे पायी चालत जाणे हाच एक मार्ग होता. अत्तार यांनी केलेल्या कामामुळे या शाळेने दोनदा (२००७ व २०१२) जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळवला! या शाळेत त्यांनी ऑक्सिजन पार्क, परसबाग, डिजिटल वर्ग, ई-लर्निंग सुविधा, इंटरनेटद्वारे अभ्यासक्रम शिकवणे, संगणक शाळा म्हणून ओळख निर्माण करणे, लोकवर्गणीतून शाळेचा विकास, श्रमदानातून खेळाचे मैदान तयार करणे हे उपक्रम यशस्वीरीत्या राबवले. २५ बैलगाड्या व शंभरहून अधिक लोकांच्या श्रमदानातून या शाळेचे मैदान तयार झाले.

Teacher Tarish Attar and their Students
Role Model Educator: कल्पक शिक्षिका : श्वेता लांडे

टॅबलेट स्कूल

शाळेला गुणवत्ता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. शाळेचा पट २२ वरून ५३ पर्यंत वाढला. या शाळेत केलेल्या बारा वर्षांच्या सेवेत त्यांनी लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट केला. सलग दहा वर्षे ४थी शिष्यवृत्ती परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागून सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत देखील आले. सांगली जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिला संगणक घेण्याचा मान या शाळेला मिळाला होता. त्यामुळे पाटीलवस्ती बोरगाव शाळेचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर झाले. २०११ मध्ये तारीश अत्तार यांची प्रशासकीय बदली वांडरेवस्ती (देशिंग) येथे झाली.

याही शाळेला २०१४ मध्ये जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला. पुढच्याच वर्षी जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूल म्हणून ही शाळा ओळखली जाऊ लागली. ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांत समज वाढली. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये‌ शंभर टक्के निकाल लागू लागला व सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले. बाहेरील गावातील मुलेही शाळेत दाखल होऊ लागली. शाळा शंभर टक्के प्रगत झाली. दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षक या शाळेला भेट देण्यासाठी येत असत.

२०१८ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खरशिंग येथे अत्तार यांची बदली झाली तेव्हापासून ते इथे कार्यरत आहेत. ही शाळा मॉडेल स्कूल म्हणून प्रसिद्ध आहे. या शाळेमध्ये तारीश अत्तार यांनी राबवलेले उपक्रम असे - आदर्श परिपाठ, योगाभ्यास, संगणक मार्गदर्शन, कोडींग व रोबोटिक लॅब, विविध भाषा शिक्षण, जर्मन, जपानी, कन्नड, तेलगू, हिंदी या भाषांचा विद्यार्थ्यांकडून सराव घेणे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढली, स्वयंअध्ययनाला चालना मिळाली‌‌.

Teacher Tarish Attar and their Students
Mothertoungue Education: मातृभाषा : सहज शिक्षणाचे माध्यम

कोरोना कालावधीमध्ये ऑनलाइन शिक्षण देणारी खरशिंग ही राज्यातील पहिली शाळा ठरली. एनसीईआरटीच्या योग ऑलिम्पियाड मध्ये खरशिंग शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यात तारीश अत्तार यांची राज्य पथक प्रमुख म्हणून नियुक्ती होती. २०१८ ते २४ मधील प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत खरशिंग शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.‌ शाळेत दरवर्षी एक जून पासून वर्गाच्या जादा तासिका घेण्यात येतात. इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना संगणक वापराचे शिक्षण दिले जाते.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

दरवर्षी शाळेमध्ये दीपोत्सव साजरा करून फटाकेमुक्त दिवाळी केली जाते. सायंकाळी शाळेमध्ये पणत्या लावून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा प्रकाशमान केली जाते व प्रदुषणमुक्तीची शपथ घेतली जाते. तसेच खरशिंग शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला मिळालेल्या बक्षिसातून लाखो रुपये लोकवर्गणी जमा होते. जिल्ह्यातील सर्वांत मोठा महिला मेळावा या शाळेमध्ये भरतो. त्यामध्ये व्याख्यानाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना भेळ, पाणीपुरी, विविध खाद्यपदार्थ बनवण्याची व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात.

रोबोटिक लॅब हा आधुनिक उपक्रमही त्यांच्या शाळेत सुरू आहे. दिव्यांग व अभ्यासात पाठीमागे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष दिले जाते. जून २०२१ पासून राज्यभरातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत नवोदय प्रवेश व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने अत्तार सर करतात. यात दोनशेहून अधिक विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात. याचा परिणाम म्हणून ८५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत व २७ विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी पाच वर्षांत प्रवेश पात्र झालेले आहेत.

अत्तार सरांच्या या दोन तपाच्या प्रवासात लोकवर्गणीतून एक कोटी पेक्षा जास्त शैक्षणिक उठावाचे काम झाले. त्यांनी कोरोना कालावधीमध्ये राबवलेल्या ‘गल्लीमित्र’ उपक्रमाचा राज्य शासनाने परीक्षा परिपत्रकामध्ये उल्लेख केला होता. तारीश अत्तार यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी अनेक सन्मान मिळालेले असून त्यात सांगली जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासन ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार यांचा समावेश आहे.

तारीश अत्तार ९४०३००७३५५

(लेखक नामांकित साहित्यिक आणि शिक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com