Pune News : पीक विमा योजनेत घोटाळेबाजांचा सुळसुळाट चांगलाच वाढला. वेगवेगळ्या भन्नाट शक्कली लढवून पीक विम्यात घोटाळे केले जात आहेत. कृषी विभागानेच २०२३ मध्येच तब्बल ४ लाख हेक्टरवरचे बोगस विमा प्रकरणं बाहेर काढले. तर २ लाख ९० हजार विमा अर्ज बाद ठरवले. पण यंदाही घोटाळ्याची मालिका सुरु असल्याचं दिसतं.
यंदाचं पहिलं प्रकरण डोकं चक्रावणारं होतं. जीथं आपल्या शेतकऱ्यांना एक विमा अर्ज भरायला नाकीनऊ येतात तिथे आंध्र प्रदेशातील एक सीएससी केंद्र चालक राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये २७४ अर्ज भरून अडीच हजार हेक्टरवरचा विमा उतरवतो. कृषी विभागाने हे प्रकरण बाहेर काढून गुन्हाही दाखल केला. सामान्य शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या टोळीविरोधात कृषी विभागही आक्रमक झालेला दिसतो.
हे झालं उघड झालेल्या प्रकरणांच. उघड न झालेली अनेक प्रकरणं आहेत. बरे पीक विम्यातले हे घोटाळे कुणी सामान्य माणूस तर करू शकत नाही. या घोटाळ्यांमध्ये सीएसी केंद्र चालक, विमा प्रतिनिधी, स्थानिक अधिकारी आणि राजकारणीही सामील असल्याची चर्चा आहे. या सगळ्यांच्या संगनमताशिवाय हे घडूही शकत नाही. घोटाळेबाज बोगस विमा अर्ज भरण्यासाठी विशेषतः १० प्रकारचे फंडे वापरतात हे स्पष्ट झाले. मागच्या वर्षीही या १० मार्गांनी काही लाख विमा अर्ज भरण्यात आले होते.
गेल्यावर्षीचे घोटाळे
गेल्यावर्षी कृषी विभागाने जवळपास २ लाख ९० हजार विमा अर्ज बाद केले होते. बोगस अर्ज भरून ४ लाख हेक्टरवरचा विमा काढण्यात आला होता, तसेच शासनाला या बोगस अर्जांमुळे विमा हप्त्यांपोटी २८७ कोटी रुपयांचा चुना लगला असता, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसऱ्याच्या नावावर विमा
पीकविम्याचे बोगस अर्ज मुख्यतः १० प्रकारे भरण्यात आले. त्यात एका शेतकऱ्याच्या नावावर दुसऱ्यानेच विमा काढला. ज्याच्या नावावर विमा काढला त्याला त्याची माहीतीही नसते, असे ५९ हजार विमा अर्ज मागच्या खरिपात बाद करण्यात आले होते.
शासनाच्या जमिनीवर विमा
कळस तर तेव्हा झाला जेव्हा शासकीय जमिनीवरही मोठ्या प्रमाणात विमा काढण्यात आला. वनविभाग, सिंचन विभाग, वीज मंडळ, नगरपालिका, महानगरपालिकेच्या क्षेत्रावरही बोगस विमा अर्ज भरण्यात आले होते. अशा अर्जांची संख्या तब्बल २२ हजार होती. आता आपले सामान्य शेतकरी आपल्याच जमिनिवर वेळेत विमा काढू शकत नाहीत. तिथे हे बहाद्दर सरकारच्या जमिनिवर विमा काढतात. हे काम काही एकट्या दुकट्याचं असू शकत नाही. पण कृषी विभागाने हा घोटाळाही उघड केला.
धार्मिक स्थळांच्या जमिनीवर विमा
या महाशयांनी मंदीर, मस्जिद आणि इतर धार्मिक स्थळांनाही सोडले नाही. धार्मिक स्थाळांच्या जमिनीवर पीक दाखवून परस्पर विमा काढला. अशा जमिनींवर विमा काढल्याने १९०० अर्ज बाद करण्यात आले होते.
जास्त क्षेत्रावर विमा
काही जणांनी आपल्या नावावर असलेल्या जमिनिपेक्षा जास्त क्षेत्रावरचा विमा काढला होता. म्हणजेच सातबाऱ्यावर आपल्या नावावर नोंद असेल्या जमिनीपेक्षा जास्त जमिनीवर विमा काढला. त्यामुळे ६५०० हजार विमा अर्ज बाद करण्यात आले होते.
बोगस भाडेपट्टे दाखवून विमा
भाडेपट्ट्यावर जमिन घेऊन विमा काढलेले मात्र नोंदणी नसलेला भाडेकरार सादर करणे आणि बोगस भाडेकरार दाखवलेले ३२ हजार विमा अर्ज बाद करण्यात आले होते. यातही सामान्य शेतकऱ्यांचा समावेश नाही, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले. तसेच सामाईक क्षेत्रावर इतरांची संमती न घेता विमा काढलेले २३ हजार अर्जही अपात्र ठरविण्यात आले होते.
पीक न पेरताच विमा
आता काही ठिकाणी जे पीक पेरलेच नाही त्याचाही विमा काढण्यात आला होता. यात काही जणांनी चूकूनही पिकांची नोंद केली होती. तसेच आपल्या जिल्ह्यासाठी विम्यात समावेश नसलेले पीक घेतल्यानंतर विम्यासाठी इतर पिकांचा विमा उतरवल्याचे दिसून येते. प्रत्यक्ष वेगळे पीक असताना दुसऱ्या पिकाचा विमा काढल्याने ९२ हजार अर्ज बाद करण्यात आले. तर इतर कारणांमुळे ५१ हजार अर्ज मागच्या खरिपात बाद करण्यात आले.
यंदा कमी विमा अर्ज
कृषी विभागाच्या कारवाईमुळे यंदा पीकविमा अर्जांची संख्या जवळपास ५ लाखांनी कमी झाल्याचा दावा कृषी विभागाने केला. मागील खरिपात म्हणजेच २०२३ मध्ये एकूण पीकविमा अर्ज १ कोटी ७० लाख होते. पण यंदा १ कोटी ६५ लाख एवढेच अर्ज आले. यातही आपल्या शेतकऱ्यांचे अर्ज वगळले तर लाखांच्या घरात बोगस अर्जही असू शकतात, असा दावा कृषी विभागाने केला. कृषी विभाग शोध मोहीम घेत असून यंदा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.