
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनेत घोटाळा झाला आहे. या बाबत माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. आर्थिक हितसंबधासाठी जलजीवनसाठी ठरावीक अधिकाऱ्याला एखाद्या पदावर बसविण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप करत केंद्र सरकारकडे सर्व पुरावे दिलेले असून आएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची आपण मागणी केली असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले. योजनेच्या पूर्णतेबाबत अधिकारी दिशा समितीच्या बैठकीत दिशाभूल करत असल्याचे लंके म्हणाले,
जिल्ह्यात जलजीवन योजना केंद्र सरकार राबवत असून या योजनेच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार लंके यांनी सातत्याने केला आहे. दोन दिवसांपूर्वीही लंके यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला.
खासदार लंके म्हणाले, की जलजीवन मिशन योजनांच्या कामातील भ्रष्टाचारावर आपण आवाज उठविला आहे. त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन भ्रष्ट्राचाराचे पुरावे, व्हिडिओ सादर केले आहेत.
आएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची आपण मागणी केली आहे. हा नगर जिल्ह्यातील घोटाळा नसून राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. एखादी पाणी योजना झाल्यानंतर पुन्हा तीस वर्षे पाणी योजनेसाठी निधी मंजूर होत नाही.
कागदोपत्री किंवा निकृष्ट दर्जाच्या या योजना होणार असतील, अर्धा फुटांवर पाइप गाडले जाणार असतील, ज्या कंपनीचे पाइप घेण्यासाठी मान्यता नाही त्या कंपनीचे पाईप टाकले जाणार असतील, योजना पूर्णत्वास जाणार नसेल तर हे सर्व काही चुकीचे आहे.
दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडे किती गावांमधील जलजीवन मिशनची कामे पूर्णत्वास गेली आहेत, अशी विचारणा करण्यात आली असता त्यांनी २१० गावांमध्ये या योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली असता ५० गावांमध्येही या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. फक्त कागदोपत्री घोडे नाचविण्याचे काम केले जात आहे. २५ टक्के काम करून ७० टक्के कामाचे बिल काढण्यात येत आहे. जुन्या खड्ड्यावर रिंग टाकून विहिरीचे बिल काढण्यात येत आहेत.
‘चौकशीशिवाय स्वस्थ बसणार नाही’
अधिकारी व ठेकेदार मिळून जलजीवन मिशनचा घोटाळा करण्यात येत आहे. याच कारणामुळे एका अधिकाऱ्याचे निलंबनही झालेले आहे. तरीही या घोटाळ्याची चौकशी होत नाही. जलजीवनमधील घोटाळ्याची चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाईसाठी केंद्र सरकारकडे आपला पाठपुरावा सुरुच राहणार असून चौकशीशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे लंके म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.