Farmer Group Seed Production Success: सैनिकी परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चिंचणेर निंब (ता. जि. सातारा) गावातील विजय जाधव यांनी आले पिकात टप्प्याटप्प्याने उत्पन्न देऊ शकेल अशा विविध आंतरपिकांच्या लागवडीची अत्यंत हुशारीने रचना केली आहे. त्यातून मुख्य पिकाचा ५० टक्क्यांहून अधिक भांडवली खर्च मोकळा करण्याचे यशस्वी अर्थशास्त्र विकसित केले आहे. बहुतांश आंतरपिकांची थेट बाजारात हातविक्री करून त्यांनी नफ्याचे प्रमाण वाढविले आहे. शेतकरी गटाच्या माध्यमातून सोयाबीन व घेवडा यांच्या बीजोत्पादनातही त्यांचा हातखंडा तयार झाला आहे. .सातारा जिल्ह्यातील चिंचणेर निंब (ता. सातारा) हे सैनिकी परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेले तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील पदवीधर शेतकरी विजय मनोहर जाधव अभ्यासू तर आहेतच. शिवाय नव्या प्रयोगांत कायम पुढाकार करून ते प्रयोग यशस्वी करून दाखविण्यातही त्यांची ओळख आहे. त्यांची अवघी चार एकर बागायती शेती आहे. परंतु कमीत कमी क्षेत्रात अधिकाधिक आर्थिक नफा मिळविण्यासाठी आंतरपीक पद्धतीचे हुशारीचे तंत्र त्यांनी आत्मसात केले आहे. केवळ आर्थिक नफाच नव्हे तर फेरपालट, जमीन सुपीकता हे फायदेही त्यांनी या आंतरपीक पद्धतीतून साध्य केले आहेत. कालवा, विहीर हे पाण्याचे स्रोत आहेत..बीजोत्पादनातून व्यावसायिक वळणविजय यांनी बीएचे शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ टेलरिंगचा व्यवसाय केला. त्यानंतर वडिलोपार्जित शेतीची धुरा पूर्ण सांभाळण्यास सुरुवात केली. सुरवातीच्या काळात पारंपरिक शेती केली. गावातील तत्कालीन सहाय्यक कृषी अधिकारी धनाजी फडतरे यांच्या प्रेरणेतून त्यांनी शेतकरी गट चळवळीत पुढाकार घेतला. त्यातून श्री जोतिर्लिंग शेतकरी स्वयंसाहायता गटाची स्थापना झाली. आज या गटाचे विजय उपाध्यक्ष आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आणि कृषी विभागाच्या सहकार्याने हा गट सोयाबीन व घेवडा यांचे बीजोत्पादन करतो. यात सोयाबीनच्या फुले संगम, फुले दूर्वा, फुले किमया या वाणांचे तर घेवड्याच्या राजमा, विराज, वरुण या वाणांचा समावेश आहे. शेतकऱ्यांकडून या बियाण्यांना मोठी मागणी असते..Ginger Farming: आले पिकाच्या प्रक्रिया उद्योगाकडे वळावे.आले व आंतरपीक पद्धती व्यवस्थापनातील ठळक बाबीमुख्य पीक आले : नियोजनउन्हाळ्यात खोल नांगरट करून एकरी ८ ते १० ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत आणि मळीचे कंपोस्ट जमिनीत मिसळले जाते. व्यवस्थित कुजल्यानंतरच शेतात वापर.सेंद्रिय कर्ब वाढीसाठी हिरवळीचे तागआणि गावात राबविलेल्या पाचट व्यवस्थापन मोहिमेतून मिळालेल्या कुजलेल्या पाचटाचा वापर.साडेचार फुटी रुंद गादीवाफे तयार करून ठिबक सिंचनाचा वापर.दोन ओळींमध्ये ९ बाय ९ इंचांचे अंतर ठेवून मेअखेरीस लागवड. त्यानंतर चार- पाच दिवसांत आल्याच्या कुड्या उघड्या पडू नये यासाठी लागवडीनंतर चार ते पाच दिवसांत हलकी भर. बियाणे, मजुरी, खते असा मिळून सुमारे सव्वा लाख ते दीड लाख रुपयांचा प्राथमिक भांडवली खर्च..आंतरपीक पद्धतीदरवर्षी २० गुंठे ते ३० गुंठ्यांत आले असते. या पिकात भांडवली खर्च जास्त असून दरांत कायम टोकाची विषमता असते. बाजारातील दरांच्या चढ-उताराचा फटका बसू नये म्हणून विजय यांनी टप्प्याटप्प्याने हंगामी उत्पन्न देणारी आंतरपिकांची साखळी तयार केली आहे. त्याची पध्दत पुढीलप्रमाणे..आंतरपीक लागवड टप्पेपहिला टप्पालागवडीनंतर चार ते पाच दिवसांत वाफ्याच्या एका बाजूला कोथिंबीर. दुसऱ्या बाजूला घेवड्याची टोकण.अवघ्या ३५ ते ४० दिवसांत कोथिंबीर निघून जाते. तर ७० ते ७५ दिवसांत ओल्या घेवड्याच्या शेंगांची तोडणी सुरू होते. -घेवड्याला बाजारात प्रति किलो ५० ते ६० रुपये दर मिळतो..दुसरा टप्पाघेवडा संपत आल्यावर आल्याला ४५ दिवसांनी बेसल डोस देऊन दुसरी मोठी भर देण्यात येते. वाफ्यांवर प्रत्येकी पाच फुटांच्या अंतरावर झेंडू आणि मिरचीची लागवड होते. झेंडूमुळे जमिनीतील सूत्रकृमींचा बंदोबस्त होतो. झेंडूची फुले गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीत विक्रीस येऊन चांगला दर मिळवून देतात..Ginger Farming : विक्रमी आले उत्पादनातील अमोल.वीस गुंठ्यांतील आंतरपिकांचा ताळेबंदकोथिंबीर- कालावधी- ३५ ते ४० दिवस- उत्पादन दोन ते अडीच हजार पेंढ्या उत्पन्न चार ते पाच हजार रु.घेवडा (ओली शेंग) - कालावधी- ७० ते ७५ दिवस- उत्पादन- १८ ते २० क्विंटल- उत्पन्न १२ ते १५ हजार रु.झेंडू- गणपती ते दसरा, दिवाळी सणासुदीचा हंगाम. उत्पन्न ३० हजार ते ३२ हजार रु.मिरची- नियमित तोडणी- स्थानिक बाजारपेठ- उत्पन्न १५ ते २० हजार रु.आले पिकांतील एकूण आंतरपीक उत्पन्न सुमारे ७० ते ७२ हजार रुपये.काही आंतरपिकांसाठी सातारा ही मुख्य बाजारपेठ. बाजारात स्वतः बसून विजय हातविक्री करतात. घेवड्यासाठी पुण्याचीही बाजारपेठ आहे..आले उत्पादनवीस गुंठ्यांतून सरासरी १० ते १२ गाड्या (प्रति गाडी पाचशे किलो) उत्पादन व खोडवा ठेवल्यास आणखी ३ ते ४ गाड्या उत्पादनाची भर पडते. आल्यास २४ ते ३० हजार प्रति गाडी दर तर सर्वाधिक ४७ हजार रुपये दर मिळाला आहे..अन्य ठळक बाबीआले पिकात कंदकुजव्या, हुमणीचा धोका टाळण्यासाठी रासायनिक खतांचा अति वापर टाळून जैविक, सेंद्रिय घटकांवर भर.दर २० ते २५ दिवसांनी जिवामृत आळवणी. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जैविक खते, ट्रायकोडर्मा आणि स्युडोमोनास यांच्या दोन ते तीन मात्रांचा वापर.एकाच जमिनीत सलग आले न घेता आडसाली किंवा सुरू ऊस, त्यानंतर सोयाबीन किंवा ज्वारी अशी सातत्याने फेरपालट केली जाते. त्यामुळे जमिनीतील लाभदायक सूक्ष्मजीवांचे संतुलन व जमिनीची सुपीकता टिकून राहते..तीन- चार वर्षांच्या फेरपालटीमुळे कंदकुजव्या रोगालाही कायमचा अटकाव.आंतरपिकांच्या उत्पन्नामुळे आले पिकातील खर्च कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढते.दोन एकरांवर सुरू व आडसाली ऊस लागवडीचे नियोजन. सुरू उसाचे एकरी ६० टन तर आडसालीचे एकरी ७० ते ८० टनांपर्यंत उत्पादन नियमित साध्य केले जाते.दोन एकरांत सोयाबीन बीजोत्पादन. एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन. प्रति किलो १०० रुपये दराने विक्री.विजय रेशीम शेतीतही निपुण आहेत..कुटुंबाची भक्कम साथविजय यांच्या शेतीचे बलस्थान म्हणजे पत्नी विद्या. खुरपणी, कीडनाशकांची फवारणी व अन्य सर्व कामे त्या करतात. पुण्यात शिक्षण घेत असलेली शरयू आणि दहावीत असलेली अन्विका या कन्या सुट्टीच्या काळात शेतीत आवडीने हातभार लावतात. पुतण्या प्रवीण जाधव यांचीही मोठी मदत होते. सर्वांच्या बळावर व प्रेमातून कुटुंबाचा समृद्धीच्या वाटेवर प्रवास सुरू आहे. तत्कालीन सहायक कृषी अधिकारी धनाजी फडतरे, विद्यमान सहायक कृषी अधिकारी सुजित शिंदे, कृषी विभाग, बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॅा. महेश बाबर, भूषण यादगीरवार आदींची मदत व मार्गदर्शन होते.विजय जाधव ९०९६२९८२१४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.