
Pune News: भीमा नदीवरील विठ्ठलवाडी- सांगवी सांडस (ता. शिरूर) कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अत्यंत धोकादायक स्थितीत असून, तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीने नव्याने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
या बंधाऱ्याचा उपयोग शिरूर, हवेली व दौंड तालुक्यातील नागरिकांसाठी होतो. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते. त्यामुळे बंधाऱ्याची क्षमता झपाट्याने कमी झाली आहे. दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, मजूर, कामगार यांचा या बंधाऱ्यावरून प्रवास होतो. बंधाऱ्याला दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे नसल्याने अपघातांची शक्यता अधिक आहे.
पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यावरून वाहतूक थांबवण्यासाठी वारंवार बॅरिकेट्स व सूचना फलक लावले. मात्र, रात्रीच्या वेळी वाहनचालक हे बॅरिकेट्स तोडून वाहतूक पुन्हा सुरू करतात, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. हा बंधारा कोंढापुरी पाटबंधारे शाखा, शिक्रापूर यांच्या अखत्यारीत असून, १९८७ मध्ये बांधण्यात आला आहे. एकूण ८० गाळ्यांपैकी बहुतांश गाळे कमकुवत झाले आहेत.
या बंधाऱ्यावरून वाहनांची सतत ये- जा सुरू असते. आजवर अनेक दुचाकी, ऊस वाहून नेणारी ट्रॅक्टर व लहान-मोठ्या वाहनांचे अपघात झाले असून, वित्त व जीवितहानी झाली आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यातर्फे या बंधाऱ्यावरून वाहतूक बंदीचे आदेश दिले असून, वाहनचालकांना बेल्हा- जेजुरी मार्गावरील पिंपरी सांडस पुलाचा पर्याय वापरण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामपंचायतींनी वारंवार बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. या मागणीची दखल घेत, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अॅड. अशोक पवार यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन पुलाच्या कामास मान्यता मिळाली होती. मात्र, सरकार बदलल्यानंतर हा विषय रेंगाळला आहे. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा मोठा अपघात झाल्यावरच जाग येणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.