Rural Story : बदलता गावगाडाः आमच्या गावचा वारिकवाडा

Rural Culture : आमचं मूळ गाव वसल्यानंतर हळूहळू काही मोजकेच बलुतेदार आमच्या गावात येऊन वसले असणार. त्यापैकी न्हावी ही अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट गावाने बोलावून घेतली असणार.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

इंद्रजित भालेराव

आमचं मूळ गाव वसल्यानंतर हळूहळू काही मोजकेच बलुतेदार आमच्या गावात येऊन वसले असणार. त्यापैकी न्हावी ही अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट गावाने बोलावून घेतली असणार. आमच्या गावचे न्हावी हे वाघमारे आहेत. ते मूळचे कुठले ? ते आता कोणी सांगू शकत नाही. पण मुळात एकच न्हावी पहिल्यांदा आला असणार.

तोही शंभरदीडशे वर्षापेक्षा जुना काळ नसावा. त्याला जी तीन मुलं झाली नामदेव, रामजी आणि माणिक, त्या तीन मुलांचा विस्तार म्हणजे आताचा दहा-बारा घरांचा वारिकवाडा. या वारिकवाड्यातल्या प्रत्येकांना थोड्याफार जमिनी होत्या. आमचं बलुतं ज्यांच्याकडे होतं ते नामदेवराव मी खूप लहान असताना आमच्या घरी यायचे.

नामा नावावरून आठवलं. आमच्या गावचं एक वैशिष्ट्य होतं. आमच्या गावात सर्व जातीत नामा होते. आणि ते गावात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध होते. पण त्यांच्या नावामागं जात लावूनच त्यांच्या नावाचा उच्चार केला जात असे. नामा सोनार, नामा चांभार, नामा वारीक, नामा मांग, नामा सुतार. असे हे सगळे नामा आपापल्या जात व्यवसायासाठी आमच्या गावात प्रसिद्ध होते.

फक्त मराठा जातीत कुणी नामा नव्हता. आणि नामा सुतार हे मुळात बौद्धच होते. खरं तर आमच्या इथले सगळे बौद्ध ढगे आडनावाचे होते, मातंग लोंढे आडनावाचे होते, चांभार दळवी आडनावाचे होते, सोनार अर्धापूरकर आडनावाचे होते, न्हावी वाघमारे आडनावाचे होते आणि मराठे सगळे भालेराव होते.

मराठ्यांमध्ये एक मुळ्यांचं घर होतं. माझ्या लहानपणी परभणी जवळच्या खानापूरहून शिंद्यांचे एक घर आलेलं होतं. त्या आधीच असोल्याहून आलेले जावळेमामा यांचं एक घर होतं आणि एक घर अंभोरे यांचं होतं. बौद्धांमध्ये खिल्लाऱ्यांचं एकच घर होतं आणि मातंगांमध्ये साळवे यांचं एकच घर होतं.

Agriculture
Indrjeet Bhalerao : प्राथमिक शाळेतील आठवणी!

तर हे नामदेवराव कुणाच्याच घरी जाऊन दाढी कटिंग करीत नसत. आम्ही सगळी मुलं त्यांच्या वाड्यात जाऊन बसायचो. गावातली आणखीही बरीच मुलं तिथं येऊन बसलेली असायची. नंबर प्रमाणे आमची कटिंग व्हायची. तो दिवस शक्यतो रविवारचा असायचा. पण पुढे चालून नामदेवराव वडिलांची दाढी, कटिंग करायला घरी येऊ लागले. तेव्हा असेल तर आमचीही कुणाची कटिंग करू लागले.

नामदेवराव थकल्यावर हळूहळू त्यांचे चिरंजीव माणिक आमच्या घरी येऊ लागले. माणिक यांना विद्युत विभागात नोकरी लागल्यामुळे त्यांना गाव सोडून जावं लागलं. ते नांदेड जिल्ह्यात नायगाव नर्शी इथं विद्युत विभागात नोकरीला लागले. दहा वर्षांपूर्वी निवृत्त होऊन ते परत गावी आले. आता शेती करतात. शेतातच घर बांधून राहतात.

नामदेवरावांचे दुसरे चिरंजीव कुंडलिकराव हे माझ्यापेक्षा थोडे वयाने मोठे. माणिक नोकरीवर गेल्यानंतर कायम तेच आमच्या घरी येऊ लागले. परवा गावाकडे गेलो तेव्हा कुंडलिकरावांनी घरी येण्याचा आग्रह केला. म्हणून मुद्दाम त्यांच्या घरी गेलो. तेव्हा बदललेला वारिकवाडा पाहायला मिळाला.

जुन्या काळात सगळ्यांची घरं साधी छोटी होती. शक्यतो पत्र्याचीच. महानुभाव मठाच्या आणि एकूण गावाच्याही पश्चिमेला असलेल्या वारिकवाड्यातली सगळी घरं महानुभाव मठाच्या पाठ भिंतीला पूर्वाभिमुख होती. आता बहुतेक सगळ्यांनी सिमेंट काँक्रिटच्या छताची घरं बांधलेली आहेत. घरांचे आकारही मोठे झाल्यामुळे पूर्वीसारखी प्रशस्त अंगणे राहिली नाहीत. दारात उभं राहिलं की समोर महानुभाव मठाची पाठभिंत उरावर आल्यासारखी वाटते.

वारिक वाड्याच्या शेवटी असलेले कुंडलिकराव यांचं घर तर अत्यंत प्रशस्त आहे. त्यांचं हे घर मला खूपच आवडलं. सुंदर बैठक, सुंदर स्वयंपाकघर, प्रशस्त अंगण, सगळीकडून भिंती बांधून घर सुरक्षित केलेल्या अंगणात दोन धिप्पाड बैल, असं सगळं पाहून मला ते एक आदर्श घर वाटलं. मी गेलो तेव्हा कुंडलिकराव गाढ झोपेत होते. पंखा लावून मस्त झोपलेले होते. मी गेल्यावर घाईघाई उठले आणि मग आम्ही गप्पा मारत बसलो. त्यातून समजलेले वारिकवाड्याचे वर्तमान पुढीलप्रमाणे आहे.

Agriculture
Indrajeet Bhalerao : कधीच न आटणारा सगळ्यात जुना 'आड'

आता गावात कोणाच्याही घरी कुणी दाढी कटिंग करण्यासाठी जात नाही. सगळ्यांनी बलुते पद्धती आता बंद केलेली आहे. गावात सलूनची तीन दुकानं निघालेली आहेत. तिथं जाऊन गावातले लोक दाढी-कटिंग करतात. दाढी तीस रुपये, कटिंग चाळीस रुपये, दोन्ही एकत्रित केल्या सत्तर रुपये असा सध्या गावातला भाव आहे.

नागनाथ, बालासाहेब आणि गजानन अशा तीन तरूणांनी गावात सलून टाकलेली आहेत. नागनाथ हे कुंडलिक यांचेच चिरंजीव. कुंडलिक यांचा आणखी एक मुलगा होता. तो परभणीला दुकान टाकून व्यवसाय करायचा. खूप चांगलं चाललेलं होतं त्याचं दुकान. पण अचानक अपघातात त्याचं निधन झालं आणि सगळाच खेळखंडोबा झाला. त्यामुळे मधले काही दिवस कुंडलिकराव सैरभैर झालेले होते. मुलाच्या आठवणीनं ते अजूनही अस्वस्थ होतात.

कुंडलिकरावांची मुलगी परभणी जवळच्या कुप्टा या गावात दिलेली आहे. तिथली मुलं आमचे विद्यार्थी असल्यामुळे नेहमीच त्यांच्याकडे हा विषय निघतो. राजू आणि पिंटू सवणे ही कुप्ट्याची मुलं एमए होईपर्यंत आमच्याच कॉलेजमध्ये शिकली. मग त्यांनी परभणीत पारंपारिक व्यवसाय सुरू केला. परभणीतलं त्यांचं दुकान खूप सुसंस्कृत दुकान म्हणून समजलं जातं. त्यांनाही त्यांच्या गावी जमिनी आहेत. पण तरीही ते पारंपारिक व्यवसाय करतात. आनंदाने आणि स्वाभिमानाने जगतात. गावाकडच्या जमिनी वडीलधारे पाहतात.

आमच्या लहानपणी वारिकवाड्यातील सगळ्यांनाच जमिनी असल्यामुळे फारसं कुणी इतरांच्या शेतावर मजुरीसाठी जात नसे. पण आता अलीकडे जमिनीचं विभाजन होत गेल्यामुळे काही जण इतरांच्या शेतावर रोजमजुरीला जातात. वारिकवाड्यातील काही मुलं नोकरीला लागलेली आहेत. बळीराम आणि श्रीराम हे दोघे भाऊ कृषी विद्यापीठात नोकरीला लागलेले आहेत. त्यांचे वडील देविदासराव आमच्यासोबत शाळेत होते.

Agriculture
Indrjeet Bhalerao: खालचा वाडा आणि सतीची गोष्ट

बळीरामला माझा खूप अभिमान वाटतो आणि मला बळीरामचं खूप कौतुक वाटतं. तो अधूनमधून घरी भेटायलाही येत असतो. एकदा बळीरामच्या आई देखील भेटायला आल्या. गयाचं आणि त्यांचं छान मैत्र जुळलं.

सुरेश उत्तम वाघमारे हे पदव्युत्तर शिक्षण घेऊन औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात तासिका तत्त्वावर प्राध्यापकी करतात. म्हणजे वारिकवाड्यातले पहिले नोकरदार माणिकराव हे आमच्या लहानपणीच नोकरीला लागलेले होते. त्यानंतर बळीराम आणि श्रीराम हे दोघ भाऊ कृषी विद्यापीठात लागले आणि आता हे तिसरे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.

कुंडलिकरावांना सध्या सहा एकर जमीन आणि एक मुलगा आहे. एक अपघातात गेला हे वर लिहिलेलेच आहे. पण सध्या धरणाच्या पाण्याने ही जमीन भिजते. सांडव्याच्या वरच्या बाजूला असल्यामुळे आधी या जमिनी भिजत नसत.

लोकांनी पाणी लिफ्ट करून घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून सांडव्यापलीकडच्या जमिनी भिजायला लागल्या. पूर्वी फारसं काही न पिकणाऱ्या आणि वर्षातून एखाददुसरंच पीक देणाऱ्या जमिनी वर्षातून तीन-तीन पिकं देऊ लागल्या. त्यामुळे सहा एकर जमिनीत कुंडलिकराव मजेत जगत आहेत.

माझ्या लहानपणी काही दिवस वारिकवाडा आणि गावाचं काहीतरी बिनसलं आणि वारीकवाड्याने पारंपारिक व्यवसाय बंद केला. त्या काळात माटेगावाहून आठवड्याला दोघेजण येऊन चावडीवर बसायचे. आणि सगळ्या गावाच्या हजामती करून जायचे. ते दोघं बापलेकच होते. बापाचं नाव गुणाजी होतं.

'गुणाजी वारीक' म्हणून ते गावात लोकप्रिय होते. गावातल्यांनी हजामती करणं सोडल्यावर काही दिवस घरोघरी जमेल तसं लोक हजामती करू लागले. आमच्या घरी दत्तूदादा सगळ्यांचे केस कापून द्यायचा. गुणाजीने यायला सुरुवात केल्यावर हा प्रश्न मिटला. गावाचा आणि वारिकवाड्याचा सुलानामा झाल्यावर गुणाजी यांचंही येणं बंद झालं.

गावातल्या सार्वजनिक पंक्तीला जेवायला बोलावण्याचे निमंत्रण पूर्वी न्हावी समाजातलाच कुणीतरी माणूस देत असे. आता हे निमंत्रण स्पीकर वरून दिलं जात असल्यामुळे कुणी घरोघर जाऊन निमंत्रण द्यायची गरज उरली नाही. देवाच्या पालखीच्या वेळी पालखी समोर मशाल धरण्याचं कामही न्हावी समाजाचाच माणूस करीत असे. ते काम मात्र कुंडलिकराव अजूनही आनंदाने करतात. असा हा आमच्या गावच्या वारिकवाड्याचा इतिवृत्तांत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com