Prataprao Pawar : काही चालीरीती...!

Indian Agriculture : केनियाच्या, टांझानियाच्या सर्व प्रवासात हवा अत्यंत आल्हाददायक. कुठंही प्रदूषण नाही. आकाश अगदी निळेभोर दिसतं. असंही आकाश असतं याचा प्रत्यय येतो. खेड्यांमधून जाताना मुलं, माणसं ही जणू संगीताच्या तालावर नृत्य करत चालत आहेत असंच वाटतं. नृत्य, गाणं, वादनकला त्यांच्या रक्तातच आहे. ते एक वेगळंच जग आहे. पाहिल्याशिवाय समजणार नाही.
Indian Culture
Indian Culture Agrowon
Published on
Updated on

प्रतापराव पवार

Indian Culture Update : जगातील पाच खंडांमधल्या काही देशांमध्ये कधी एकदा, तर काही देशांमध्ये अनेकदा जाण्याची संधी व्यवसाय, प्रदर्शनं, जागतिक सामाजिक संस्थांशी निकटचे संबंध अशा वेगवेगळ्या कारणांंमुळे मिळाली. यात प्रवास हा कॉन्फरन्सच्या निमित्तानं, तर काही वेळा हौस म्हणूनही झाला.

प्रवासातील फावल्या वेळात इकडं-तिकडं भटकंती होते. काही नवीन, काही वेगळंच पाहायला, अनुभवायला मिळतं. त्यातीलच सांगण्यासारख्या वाटल्या त्या या काही आठवणी...

एकदा मलेशियामध्ये होतो. सुटीच्या दिवशी काय करायचं म्हणून मित्राबरोबर एक खेडं पाहायला गेलो. तिथं दूरवरून ताशाचा आणि पिपाणीचा आवाज आला. क्षणभर वाटलं की काटेवाडी तर नाही ना? उत्सुकतेपोटी आम्ही त्या आवाजाच्या दिशेनं गाडी वळवली.

पाहतो तर, एका लग्नाची वरात येत होती. पुढं ताशा आणि पिपाणी वाजवणारे होते. नवरी आणि नवरदेव गळ्यात हार घालून इतर नातेवाइकांबरोबर चालले होते. मी अर्थातच चौकशी केली. आम्हाला सांगण्यात आलं की, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. अर्थातच ही भारतातून आलेली परंपरा होती. मुस्लिम धर्म स्वीकारण्यात आला असला तरी अशा काही पंरपरा आजही तिथं सुरू आहेत.

आम्ही उभयता आठ-दहा वर्षांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये गेलो होतो. सिल्क रूट पाहणं, ताश्कंदला भेट देणं हा माझा प्रमुख उद्देश होता. याच निमित्तानं काही खेड्यांमध्ये उतरलो, तेव्हा काही ठळक गोष्टी ध्यानात आल्या. सर्व रस्ते अगदी स्वच्छ. त्यांच्या पद्धतीप्रमाणे कुटुंबं पहाटे उठून आपल्या घरासमोरील रस्ता, घराच्या दोन्ही बाजू, निदान २५-३० जण स्वच्छ करतात. त्यामुळे कुठंही अस्वच्छता राहत नाही.

आपल्याकडे आपल्या घरातील, दुकानांतील केर, कचरा रस्त्यावर टाकला, की आपली स्वच्छतेची जबाबदारी संपते! तिथं गावात चावडीवजा जागेवर सर्व महिला बाजेवर बसून गप्पा मारतात. आमच्या बरोबर असलेल्या महिलाही तिथंही बसल्या.

Indian Culture
Prataprao Pawar : ‘सकाळ’चा ‘निर्धार’ आणि ‘परिवारमंगल’ कार्य

गप्पांमध्ये ध्यानात आलं की, तिथल्या लग्नांमध्ये अग्नीसमोर सप्तपदी ही सर्वांत महत्त्वाची बाब असते. अनेकजणी मंगळसूत्रही वापरत. आम्हाला मोठं आश्‍चर्य वाटलं. विचारणा केल्यावर उत्तर मिळालं, ‘ आम्हाला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावण्यात आला;

पण आमच्या अनेक परंपरा आम्ही कायम ठेवल्या.’ भारताच्या संस्कृतीशी ही केवढी घट्ट नाळ आहे किंवा होती हे आजही पाहायला मिळतं. धार्मिक बाबतीत त्यांनी जागतिक स्तरांवरही काही मतं व्यक्त केली, जी शांततेचा, बंधुत्वाचा पुरस्कार करणारी होती. लोकही खूप प्रेमळ वाटले.

मलेशियांतून आम्ही ब्रह्मदेश, म्हणजेच आताच्या म्यानमारमधील, रंगून (यंगून) इथं गेलो. ‘मेरे पिया गये रंगून, किया है वहॉँ से टेलीफून...’ हे आमचं आवडतं गाणं. लोकमान्य टिळकांचा रंगूनमार्गे मंडाले इथला कारावास, पेशव्यांची ब्रिटिशांनी मंडाले इथं केलेली रवानगी अशा कितीतरी गोष्टींमुळे तिथं जाण्याची उत्सुकता होती.

सर्वत्र मिलिटरीराज असल्यानं भीतीविना शिस्त होती. व्यवसाय लहान असो वा मोठा, सर्व व्यवहार रोखीनं. बँक वगैरे फारशी भानगड नाही. नोटा पोत्यात भरलेले ट्रक्स असत. अक्षरश: पोत्यांत नोटा भरून ट्रक यायचे.

ती पोती ऑफिसमध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये भरून ठेवली जातात. माल उतरवताना एखादं पोतं किंवा नोट रस्त्यावर पडली तर तिला कुणीही हात लावणार नाही. रंगून शहर छान आहे. मंडालेला जायची इच्छा होती; परंतु वेळेअभावी जमलं नाही.

आमच्या ‘अजय मेटाकेम’चा झेकोस्लोव्हाकिया या देशातील एक कंपनीबरोबर काही उत्पादनासाठी तंत्रज्ञानाबाबत समझोता होता. अनेक कारणांमुळे त्या संस्थेचे मालक, त्यांची मुलं यांच्याशी आमचा व्यक्तिगत स्नेह निर्माण झाला. आम्ही उभयतांनी प्रागला भेट द्यावी असा त्यांचा सारखा आग्रह होता.

एका उन्हाळ्यात आम्ही जायचं ठरवलं. त्यांचा मुलगा बोरीस आम्हाला तिथल्या विमानतळावर घ्यायला आला. तिथून २५०-३०० मैलांवर त्यांचं गाव आणि कारखाना होता; परंतु त्यानं आम्हाला दोन-तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत त्यांच्या गावी नेलं. यामुळे एरवी न पाहता येणारा झेकेस्लोव्हाकियाचा प्रदेश, गावं आम्ही पाहू शकलो. मला हा देश स्वित्झर्लंडइतकाच सुंदर वाटला.

आम्ही एका हॉटेलमध्ये उतरलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची गाडी, ड्रायव्हर आणि इंग्लिश जाणणारी कर्मचारी असे आम्हाला न्यायला आले. हॉटेलपासून त्यांच्या कारखान्यात जाण्यासाठी तासाभराचा अवधी लागणार होता. साहजिकच गप्पा सुरू झाल्या. प्राथमिक चौकशी वगैरे झाल्यावर त्या बाईंनी आम्हाला विचारलं, ‘‘तुम्हाला साईबाबा माहीत आहेत का?’’

आम्ही आश्‍चर्यानं विचारलं, ‘‘कोणते?’’

तिनं आपले केस पिंजारले आणि म्हणाली ‘‘हे’’

म्हणजे पुट्टपुर्तीचे साईबाबा.

मी म्हणालो, ‘‘आमचा परिचय किंवा संबंध नाही; परंतु तुम्ही का विचारत आहात?’’

तिनं जे सांगायला सुरुवात केली ते विश्‍वास ठेवण्याच्या पलीकडचं होतं. तिचं दोन-तीन वर्षांचं बाळ खूप आजारी पडलं. सर्व प्रयत्न केले; परंतु ते अशा टप्प्यावर आलं की जगणं शक्यच नव्हतं.

ती म्हणाली : ‘‘मी सर्व याचना, प्रार्थना करत होते. या मुलाला मी जगवू शकत नाही, हे माझं मातृहृदय मानायलाच तयार नव्हतं. रात्रीच्या रात्री जागून काढल्या होत्या. एका रात्री स्वप्नात हे साईबाबा आले आणि म्हणाले : ‘तुझी व्यथा मला समजते. तुझं बाळ बरं होईल. खाली खिडकीजवळ एक पावडर सापडेल.

ती तू पुढचे दोन-तीन दिवस बाळाला पाण्यामध्ये या पद्धतीनं दे.’ ताड्कन जागी झाल्यावर मी खिडकीजवळ गेले, तर तिथं पावडर होती! तसंही मूल जगण्याच्या सर्व आशा मावळल्या होत्या, तेव्हा मी हा उपाय करून पाहायचं ठरवलं व स्वप्नातील ती आज्ञा पाळली. आठवड्याच्या आत बाळात सुधारणा दिसल्या आणि ते ठणठणीत झालं ते कायमचं.’’

Indian Culture
Prataprao Pawar : पिलानीतील मंतरलेले दिवस...!

साहजिकच आम्ही भारतातून गेलेलो असल्यानं, हे तिला आम्हाला सांगावंसं वाटलं. तिला परवडत नसलं तरी एकदा भारतात यायचं होतं.

दोन दिवसांनी बोरीसच्या घरी बारसं होतं. आम्ही त्यात सहभागी झालो. काक्या, माम्या, इकडचे तिकडचे सर्व नातेवाईक, मित्र यांनी घर भरलेलं होतं. आपल्यासारखाच भरपूर उत्साह, गाणी, नाच सुरू झाला. जवळच्या चर्चमध्ये जाऊन बाप्तिस्मा झाला. जेवण म्हणजे मेजवानी. सर्व प्रकारची दारू वाहत होती.

महत्त्वाचं म्हणजे, सर्व पुरुष स्वयंपाक करून सर्व बायकांना खायला घालत होते! आग्रह होताच बायका मजेत गप्पा मारत खाद्यपदार्थांवर ताव मारत होत्या. असं दृश्य मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं. आपल्याकडे बायकांचा पिट्टा पडतो आणि पुरुषमंडळी खाण्या-पिण्यात मग्न असतात.

आम्ही काही मित्रांनी आफ्रिकेत सफारीला जायचं ठरवलं. नैरोबी, मोम्बासा इथं जवळचे मित्र होते. त्यांनी आमची पुरेपूर काळजी घेतली. सफारीमध्ये सर्व प्राणी मुक्तपणे वावरत असतात. बहुतांश कळपानं. त्यांना पाहणं म्हणजे जंगलातील सौंदर्य काय असतं याची जाणीव होते.

फिरता फिरता आम्ही मसाईमारा या भागात गेलो. हे लोक लुकडे, उंच आणि अतिशय काटक, तसंच सर्व अंगावर लाल लोकरीचं उपरणं, हातात भाला असा त्यांचा वेश. ते शिकारीला एकत्र जायचे. एरवी गाई पाळणं, विकणं हा त्यांचा व्यवसाय.

त्यांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती आहेत. मुलगा दोन-तीन वर्षांचा झाला की वधूसंशोधन सुरू होतं. माहितीतील एखाद्या स्त्रीला मूल होणार असेल तर बोलणी सुरू होतात. मुलगी झाल्यास तिचं या मुलाशी लग्न होतं. न झाल्यास दुसरीकडे शोध सुरू होतो. साधारणपणे तीन-चार वर्षांच्या मुलाचं लग्न झालेलं असतं. हे त्याचं पहिलं लग्न.

तो मोठा झाला आणि त्यानं एकट्यानं सिंहाची शिकार केली तर त्याला आणखी एक बायको करता येते. ती विकत घेता येते किंवा पळवून नेऊन दोघांच्या संमतीनं विवाह होऊ शकतो.

या नव्या बायकोसाठी तो वेगळी झोपडी बांधतो. त्याच्या शारीरिक आणि आर्थिक कर्जबाजारीपणावर तो पाच-दहा बायका सहज करू शकतो. यामुळे पहिलीबरोबरच्या झोपडीभोवती नव्या झोपड्या बांधल्या जातात.

मसाईमारा स्वतःला ‘जंगलच्या राजा’बरोबरचे समजतात. त्यामुळे पुरुष केस कापत नाहीत; कारण सिंहाला आयाळ असते! सिंहिणीला केस किंवा आयाळ नसते, त्यामुळे बायका चकोट करतात. डोक्यावर केस ठेवत नाहीत. हे लोक आंघोळ करत नाहीत. पावसामुळे अंग स्वच्छ होतं तेवढंच! त्यामुळे त्यांच्या अंगाला अतिशय उग्र दर्प येतो. पन्नास फुटांवरूनच त्यांचा वास ओळखता येतो. प्राणी या वासाला भितात. हे लोक जवळपास असल्याचं अगदी सिंहालाही समजतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com