Prataprao Pawar : पिलानीतील मंतरलेले दिवस...!

Indian Agriculture : संध्याकाळी घरी गेलो की ही मुलं आईला सांगत : ‘‘आई, पवारकाकांना काल केलेले लाडू दे!’’ त्या माउलीची फार अडचणीची परिस्थिती निर्माण होत असे. मात्र, लवकरच मी आणि राठी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होऊन गेलो, अगदी बारामतीची आठवण येऊ नये इतपत.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

प्रतापराव पवार

Indian Agriculture Update : पिलानीतील माझ्या प्रवेशाला कारणीभूत होते खासदार बीडेश कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा अनिल. अनिलनंच मला पिलानीबद्दल योग्य माहिती दिली आणि त्यातून पुढचं सर्व घडलं.

पिलानीतील प्रचंड उन्हाळा...हिंदी भाषेचा गंध नाही...इंग्लिश नीट बोलता येत नव्हतं...जेवण अगदी अळणी आणि बेचव...सर्व शाकाहारी. चारशे मुलं एकाच वेळी, विशेषतः दुपारी, जेवायला असत. त्यामुळे चपात्या ढिगानं आधीच करून ठेवलेल्या असायच्या. त्यांना एक प्रकारचा वास येत असे. कालांतरानं आम्हाला सवय तर झालीच; परंतु त्या आवडायलाही लागल्या!

सुरुवातीला अगदीच एकटेपणा जाणवत असे. त्यातून रॅगिंग सुरू होतं. हा प्रकार मला अगदीच नवीन होता. यातून सुभाष सातपुतेची ओळख झाली. तो मनानं अत्यंत चांगला आणि मदतशील होता. आमची घट्ट मैत्री त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत टिकली.

मराठी विद्यार्थ्यांशी माझी ओळख करून द्यायला त्यानं सुरुवात केली आणि तिथल्या महाराष्ट्र मंडळांतही प्रवेश मिळवून दिला. वर्गात सुभाष राठी, जो जिवलग मित्र झाला, याचीही मैत्री त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत कायम होती. राठीलाही मित्रांची आणि सामाजिक कामाची आवड.

त्यामुळे आम्ही दोघं दुसऱ्या वर्षापासून महाराष्ट्र मंडळात सक्रिय सहभागी झालो. यातून तिथल्या मराठी कुटुंबीयांचा परिचय झाला व त्यांच्या घरी जाणं सुरू झालं. आमचं शिक्षण पार पडेपर्यंत ही मराठी मंडळी आणि आम्ही दोघं एकाच कुटुंबातील झालो. आमचे या लोकांशी कायमचे ऋणानुबंध जुळले.

Indian Agriculture
Pratap Pawar : केंद्रीय अर्थसंकल्प ही राजकीय तडजोड

आमच्या घरात दुसरी पिढी मी १२ वर्षांचा असतानाच यायला सुरुवात झाली होती. मला लहान मुलांशी खेळायला, त्यांचे लाड करायला आवडतं. त्यामुळे अशा मुलांशी मैत्री कशी जोडायची याचं जणू प्रशिक्षणच मिळालं. पिलानीमध्ये सर्व कुटुंबं ही चौकोनी (आई-वडील व दोन अपत्ये), वेगवेगळ्या बंगल्यांमध्ये राहणारी. त्यामुळे त्यांच्या मुलांना कुणी काका किंवा मामा नव्हता.

लवकरच डॉ. देशपांडे, डॉ. रांगोळे, डॉ. गोंधळेकर आदी कुटुंबीयांतील मुलांशी माझी मैत्री झाली. हे त्या मुलांच्या आई-वडिलांना साहजिकच आवडायला लागलं होतं.

वर्षभरातच एक-दोन मुलं तरी माझ्या वसतिगृहावर रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी येऊ लागली आणि ‘पवारकाका, आज आईनं पुरणपोळी केलीय, शिरा केलाय, तर तुम्ही घरी चला’ असा आग्रह करू लागली. माझी मोठी पंचाईत होत असे. असा अनाहूत पाहुणा म्हणून मी कुणाच्या घरी कसा जाऊ? मग त्यांची समजूत काढावी लागायची.

माझ्या मित्राचे आजोबा लोयलका (नानाजी) यांचं मोठं शेत होतं. ते माझ्या मित्रासाठी उत्तम दर्जाचं दूध पाठवत असत. कालांतरानं मलाही पाठवू लागले. पैसे देऊ केले तर त्यांना राग आला. नंतर मी या मराठी मुलांना घेऊन रविवारी त्यांच्‍या शेतावर जात असे.

तिथं ताजी मक्याची कणसं तोडून भाजणं आणि त्यांना मीठ-लिंबू लावून खाणं...ताज्या गाजराचा रस काढून प्रत्येकी एक ग्लासभर पिणं...नंतर ‘सरसो’चं तेल लावून विहिरीतील पाणी उपसत असताना पोहणं वगैरे गोष्टी आम्ही करत असू. मुलांना हे सगळं साहजिकच अतिशय आवडत असे. आता तुम्हाला, मराठी कुटुंबीयांना असे काका मिळाल्यावर काय वाटत असेल, हे सांगायला नको.

मी तिसऱ्या वर्षाला असताना एका मराठी कुटुंबातील वहिनींचं मोठं ऑपरेशन करायचं ठरलं. अर्थातच दोन-चार दिवस त्यांच्या पतीला दवाखान्यात राहावं लागणार होतं. मग मुलींबरोबर कोण, असा प्रश्न निर्माण झाला. कारण, मुलींची वये पाच आणि दोन वर्षं. मला आणि सुभाष सातपुतेला हक्कानं विनंती करण्यात आली. रात्री मुलींची काळजी घेण्याबद्दल. ती आम्ही आनंदानं स्वीकारली.

वहिनींनी सर्व सूचना दिल्या...‘धाकट्या मुलीची एक सवय होती. रात्री झोपताना पेल्यात दूध भरून ठेवायचं, त्यात दोन चमचे साखर घालायची. चमचा आत ठेवायचा; परंतु दूध ढवळायचं नाही. धाकटी रात्री तीन वाजता जागी होईल आणि दूध मागेल. तेव्हा फक्त पेला तिच्या हातात द्यायचा. मग ती ढवळून बघेल.

तेव्हा, पेल्यात साखर आहे हे तिला जाणवलं पाहिजे; नाही तर ती इतका गोंधळ घालेल की विचारता सोय नाही...’ हे सर्व तिचे पवारकाका व्यवस्थित करतील हा विश्वास त्या माउलीला होता. संकटकाळात या कुटुंबाला माझ्यासारख्याची आठवण होणं हे जवळिकीचं उदाहरण होतं.

माझ्याविषयी असा स्नेह, आपुलकी छोट्या-मोठ्या २० कुटुंबांत होती.

गणेशोत्सव धूमधडाक्यानं साजरा होत असे. मी आणि राठीचा पिट्टा पडत असे. गणेशपूजनाला सर्व पिलानीकर येत असत. त्यांना प्रसाद आणि कॉफी दिली जायची. काही वेळा अंदाज चुकायचा. मग संपवायची कुणी? मला आणि राठीला ती पिण्यासाठी आग्रह होत असे.

यातील नागपूरकडील लोकांचं आतिथ्य ध्यानात येत असे. मी सेक्रेटरी असताना ‘गुळाचा गणपती’ हा पु. ल. देशपांडे यांचा चित्रपट दाखवण्यात आला. पिलानीतील सर्वांनाच आमंत्रण होतं. गर्दी तर झालीच. बहुतांश अमराठी लोकांना तो चित्रपट फार आवडला.

मंडळात नाटकं बसवली जात. ज्यांच्या घरी तालीम होत असे, त्यांची जाण्या-येण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था मंडळ - म्हणजे मी आणि राठी - करत असू. मी एका हिंदी नाटकातही काम केलं. हिंदी नाटक सर्व पिलानीकरांनी पाहिलं. माझ्या छोट्या मित्रांना पवारकाकांचं फार कौतुक. ‘सर्वांत चांगलं काम पवारकाकांनी केलं’ असं ते म्हणत असत. अर्थात्, त्यांच्या आयांना खरं काय ते माहीत असे; परंतु यात त्यांचीही करमणूक होत असे.

आठ ते पंधरा दिवसांच्या सुट्टीत पुण्याला येणं परवडत नसे. मग मी दिल्लीला बीडेश कुलकर्णी यांच्या (तात्या) घरी ‘साऊथ ॲव्हेन्यू’ इथं राहत असे. तिथं तात्या आणि त्यांच्या पत्नी शांतामावशी असत. शांतामावशी अतिशय प्रेमळ, गप्पीष्ट आणि उत्साही होत्या. त्यांना सहा बहिणी. या सर्व केतकर भगिनींची मुलं शांतामावशींभोवती असत. यामुळे मी या मोठ्या कुटुंबाचा भाग झालो होतो.

दिल्लीत काही मराठी लोकांचा समारंभ असल्यास मला त्या घेऊन जात आणि ‘हा माझा धाकटा मुलगा प्रताप’ अशी ओळख करून देत. पिलानीला परत निघालो की बरोबर फराळाचे डबे देत. आईचं प्रेम यापेक्षा का वेगळं असतं? मी अतिशय सुदैवी होतो, एवढंच म्हणू शकतो.

Indian Agriculture
Prataprao Pawar : ...तोपर्यंत समाज आपल्याला मदत करेल

दिवाळीतील आमच्या या सर्व वहिन्या म्हणत : ‘अरेरे, मला धाकटी बहीण नाही किंवा आमच्या घरात लग्नाची मुलगी नाहीये, नाहीतर आम्ही प्रतापला सोडलं नसतं.’

डॉ. गोंधळेकर कुटुंबीयांचं नातं तर याही पुढं गेलं. शेवटचं वर्ष संपल्यानंतर मी परतण्याच्या दिवशी त्यांनी मला घरी जेवायला बोलावलं आणि ५० हजार रुपयांचा ड्राफ्ट माझ्या हाती दिला. ‘तुझ्या नवीन व्यावसायिक आयुष्याची सुरुवात करण्यासाठी ही रक्कम आहे. व्यवसायात अयशस्वी झालास तर पैसे गंगेला मिळाले असं समजून या विषयावर चर्चा करायची नाही,’ अशी स्पष्ट ताकीद मला देण्यात आली!

डॉ. गोंधळेकरांच्या मोठ्या भावानं आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी पत्करून आमच्या डॉ. गोंधळेकरांचं सर्व शिक्षण केलं. अशा या डॉक्टरांच्या दातृत्वाचं दर्शन मला नंतरही वेळोवेळी झालं, ते कोणत्या पुण्याईमुळे, हा प्रश्न मला आजही पडतो.

वर्गात चौदा प्रांतांतील मुलं होती आणि पिलानीमध्ये आमच्याबरोबर पहिल्यांदा सहा मुली शिकायला आल्या. या मुलींवर तीन हजार विद्यार्थ्यांचे डोळे रोखलेले असत हे वेगळं सांगायला नको! माझं मराठीपण पिलानीत कमी होऊन मी भारतीय झालो. इतर प्रांतांतील गुण-दोष, त्यांच्या परंपरा, अभिमान हे पाहायला आणि अनुभवायला मिळालं.

त्याचबरोबर ‘मराठी पाउल पडते पुढे’ याला मर्यादित अर्थ आहे हेही ध्यानात आलं. आपल्याकडील सावरकरांसारखे मोजकेच अंदमानात बंदिवान होते; परंतु अनेक पंजाबी, बंगालीही तिथं बंदिवासात होते, हे आपल्याला माहीत नसतं.

प्रत्येक प्रांतातील खाद्यपदार्थ, पेहराव, संस्कृती, वाङ्मय, परंपरा, कला यांची खूप श्रीमंती आहे असं माझ्या ध्यानात आलं. मी या सगळ्याचा आदर करायला शिकलो. मराठी माणसांच्या कमतरता लक्षात आल्या. आपण आपला इतिहास वगैरेबद्दल बोलतो ते बरोबरच आहे; परंतु परप्रांतीयांच्या नजरेतून आपल्याकडे कसं पाहिलं जातं, याचा कधी कुणी विचार करत नाही. मला ते दिसून आलं आणि अनुभवायलाही मिळालं.

नानाजींच्या रूपानं मला व्यावहारिक, सामाजिक, तसंच फुकटचा किंवा शोषणातून मिळालेला पैसा कसा वाईट असतो याचं शिक्षण मिळालं.

बीडेश कुलकर्णी यांचे साडू डॉ. माचवे या अंधांसाठी जीवन अर्पण करणाऱ्या व्यक्तीबरोबर पुण्यात पोहोचण्याआधीच, १९६८ मध्ये, अंधशाळेची जबाबदारी माझ्यावर येऊन काम करण्याची संधी मला मिळाली.

पिलानीतील शेवटच्या वर्षाचा अनुभव सांगावासा वाटतो. मला एका विषयाचं आकलन नीट होत नव्हतं. नापास तर होणार नाही ना, अशी भीती वाटत होती. प्रा. डॉ. जोशी या विषयाचे प्रमुख होते. त्यांनी तीन महिने शिकवणी घेऊन माझी तयारी करून घेतली. परिणामी, मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. परीक्षा संपल्यावर वेळ न गमावता माझ्या व्यवसायाला पूर्ण वेळ देऊ शकलो.

जी. डी. बिर्ला हे दरवर्षी गॅदरिंगच्या सुमारास आम्हाला त्यांचे विचार ऐकवत. ती एक मेजवानीच असे. अशा वाळवंटात एक उत्तम शैक्षणिक संस्था निर्माण करणं, ती सातत्यानं गुणवत्तेनं वाढवत नेणं या गोष्टी त्यांनी स्वतःच्या पैशातून केल्या.

मी गेली २० वर्षं ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे’मध्ये (सीओईपी) काम करत आहे.; परंतु त्यात कौतुक करण्यासारखं काय आहे? अनेक शिक्षणमहर्षींनी या क्षेत्रासाठी योगदान दिलं, याची जाणीव पिलानीमधील दिवस आठवल्यावर होत असते.

सद्यस्थितीचा विचार केल्यास, आमचं शिक्षण फारच कमी खर्चात झालं होतं. सहजच हिशेब केला तर, माझ्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च जेमतेम १२-१५ हजार रुपये झाला!

अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘एमआयटी’ या विद्यापीठाबरोबर अभ्यासप्रणाली केलेली आमची पहिलीच बॅच होती. तिथले प्राध्यापक आम्हाला शिकवत!

पिलानीनं माझ्यासारख्याला काय नाही दिलं? सुरुवातीचे पाच-सहा महिने सोडले तर उर्वरित काळ कसा गेला ते समजलं नाही. उत्तम शिक्षण, मराठी मंडळींचं कौटुंबिक प्रेम, जिव्हाळा, त्याचबरोबर नानाजींनी, ते मराठी माणसाकडे कसे पाहतात आणि त्याचा व्यवसायाला कसा उपयोग करून घेतात, हेही शिकवलं.

ही सर्व शिदोरी आजतागायत उपयोगी पडत आहे. हे सर्व ‘भाग्य म्हणजे काय?’ याचा नतमस्तक होऊन विचार करायला लावतं. समाजाचं ऋण फेडण्याला प्रवृत्त करतं. तुमच्याही आयुष्यात वेगळ्या प्रकारे असं घडो हीच प्रार्थना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com