Rural Social Structure: गाव शिवारात विसवलेली माणसं 

बाई म्हणली, "लागायसाठीच मारलंय. कसा का असेना पण बाप हाय तोहा त्येव. अन् बापाला दुष्मन म्हणालायस व्हय! लाज कशी वाटत नाही." तसा सुन्या म्हणला, "बाई बापय म्हणूनच ऐकून घेतोय. दुसरा कुणी असता तर चांगलाच गप केला असता."
Rural Social Structure
Rural Social StructureAgrowon
Published on
Updated on

लेखक - धनंजय सानप

नदीच्या घोटाभर पाण्यात उभं राहून एक बाई कपडे धुत होती. तिच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाची साडी होती. साडीचा पुढचा भाग पाण्यात भिजू नये म्हणून, वर करून तो पोटाजवळ खोसलेला होता. एका मोठ्या पातेल्यात कपडे होते. पातेलं खडकावर ठेवलेलं. त्यातलं एक एक कापड घेऊन ती बाई नदीत बुडवून घेत होती. दोन्ही हातानं जोर लावून कापड पिळवून खडकावर ठेवत होती. ऊन कडक तापलेलं होतं. त्या बाईच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. अधूनमधून ती पदरानं घाम पुसत होती. नदीत बरेच उघडे खडक होते. धुतलेले कापडं त्या खडकावर वाळत घातले होते.

एका खडकावर हिरवी नाटी तर दुसऱ्यावर लालसर रंगाचा परकर आणि तिसऱ्या खडकावर मळकट पांढऱ्या रंगाची वाळत घातलेली. बाई बराच वेळचं कपडे धुत होती. तिनं आता पातेल्यातला पांढरा सदरा काढला आणि त्याला साबण लावून खडकावर घासायला सुरूवात केली. साबणाचा फेस नदीच्या प्रवाहात मिसळत होता. त्याचे पांढरे ढब्बे तयार होतं होते. ते पाण्यावर तरंगत होते. आता पाण्याला अचानक लालसर रंग चढायला लागला.

बाई धुणं धुण्यात गुंग होती. नदीला अचानक पूर आला. त्या बाईला मात्र त्याची भनक लागली नाही. मोठा लोंढा तिच्या दिशेनं वेगाने येत होता. त्यातलंही पाणी लालसर होतं. बाई अजूनही धुणं धुत होती. जोरात ओरडून सांगण्याचे प्रयत्न केले पण आवाज फुटत नव्हता. पाहता पाहता बाई नदीच्या त्या लाटेत वाहून गेली. तशी दरवाज्याच्या कडीचा खणखणाट झाला. अन् "बबलू! बबलू! बेटा दरवाजा उघड." त्या आवाजानं चाललेली गोष्ट थांबली.

अजून डोळे उघडले नव्हते. झोपेचा अंमल जरासा हलला होता. आवाज कुठून येतोय, याचा अंदाज अजून येत नव्हता. पण तो आवाज ओळखीचा होता. कुठल्यातरी स्त्रीचा! त्या आवाजाला कोमल असं विशेषण द्यावं, असं त्याच्या अर्धग्लानी मनाला वाटून गेलं. तेवढ्यात "बबल्या! आरं अय बबल्या! दरवाजा उघडेव." आणि सोबत कडीचा एकदमच खणखणाट झाला. कानाला नकोसा वाटणारा पुरुषी आवाज आणि खणखणाट ऐकून त्याची झोप पूर्णत मोडली. तो घाबरून उठून बेडवर बसला. च्यायला स्वप्न कसलं फडतूस होतं. तोवर अजून एक दोन कानाचे पडदे हदरवणारे आवाज आले. तसा बेडवरून ताडकन उठून मधली रूम ओलांडून डोळे चोळत 'आलो आलो!' म्हणत सुन्यानं दरवाजा उघडला. 

Rural Social Structure
Rural Social Structure : गावाच्या गोतावळ्यात मागे पडलेली माणसं

दरवाजा उघडताच दादानं शिवी हासडली, "हेंद्रया, येधोळा झोपायला काय राक्षसाच्या पोटाला जनमलायस का फोकणीच्या!" तेवढ्यात बाई म्हणली, "बबल्या झोपला होतास काय! आरं असं सांच्यापारी झोपायचं नसतंय. लक्ष्मी येण्याचा वखुत असतोय." तिनं हातातला डब्बा दरवाजाच्या समोरच्या रूमच्या खिडकीवर ठेवला. "दुपारी पडल्या पडल्या डोळा लागला व्हता." सुन्या बोलून गेला. दादानं बाथरूमकडे जात पॅन्ट दुमडली बाह्या मागे सारल्या आणि पायावर पाणी ओतत तेवढ्यात शब्द उचलला. "माणसं इथं दमून भागून येतेत अन् ह्येव भाडखाऊ झोपलाय मजेत. बेट्या बापाची पेंड आयती मिळतेय म्हणून बरंय. नाही तर भीक मागत फिरला असतास." ते ऐकून बाई बोलली, "बाई तुमचं एक येगळचंय. घरात पाऊल टाकलं नाही की, जिभीचा पट्टा सुरू झालाय." दादा बाईकड बघत म्हणाले, "तोह्या लाडामुळं वाया चाललाय ह्येव भाड्या." तशी बाई साडीचा पदर झटकून कमरेला खोवत जोर देऊन बोलली, " पोरगं आलंय सठीसहा महिन्याला घरी, तर नीट बोलावं. ते देलं सोडून अन् उठता बसता उगाच आपलं गुरगुरनं सुरुय." बाईचा आवाज वाढला तसा दादानं हातातला तांब्या बादलीत सोडला. "घाला माय जशी घालायची तशी" म्हणत खिळ्याला अडकवलेल्या रूमालाला हात पुसत दादा घरातून बाहेर पडले.

बाई म्हणली, "आत्ता कुठं निघालात. चहा ठेवतेय. चहा पिऊन जावा." दादा तोवर दरवाजापाशी गेले होते. "मला नगं चहा! पाज त्या तोह्या काळजाच्या तुकड्याला!" दादा घरातून बाहेर गेले. बाईनं हातापायावर पाणी ओतलं. खिडकीतल्या आरश्यात बघून पदरानं तोंड पुसलं. आणि चहाच्या तयारीला लागली. सुन्याला हे सगळं सवयीचं झालं होतं. त्याला माहित होतं, दादा रात्री घरीच येणारेत. त्यामुळं त्यानं गुपचूप चूळ भरली. आणि तोंडावर पाणी मारून तोंड पुसत बाईपाशी येऊन बसला. तो बापाला दादा आणि आईला बाई म्हणायचा. बाईनं फ्रीज उघडलं आणि दूध चहाच्या पातेल्यात ओतलं. आणि गॅस पेटवून गॅसवर चहा ठेवला.

घर सिंमेंटच्या स्लॅबचं होतं. समोर एक खोली. मधे स्वयंपाक घर आणि मागे दोन खोल्या. मुख्य दरवाज्याजवळ थोडी मोकळी जागा होती. त्याच मोकळ्या जागेत बाथरूम होतं. तिथं बाहेर एक पाण्याची छोटीशी टाकी होती. बाथरूमच्या विरुद्ध दिशेला पोती, सरपण आणि पाईपाचे तुकडे वगैरे पडलेले होते. बाथरूमच्या बाजूच्या भिंतीला कपडे वाळत घालायला बांधलेली दोर आणि चार पाच फूट अंतरावर गच्चीवर जाण्यासाठीची लाकडी शिडी ठेवलेली होती.

खोलीत टेबल आणि बाजूला एक देवघर. स्वयंपाक घरात ओटा होता. तोही अगदी छोटा. त्याला लागून भांड्याचं एक रँक आणि डब्बे वगैरे. आणि फ्रीज ठेवलेला. आतल्या एका खोलीत बेड होता. खोलीच्या मागच्या भिंतीला खिडकी होती. खिडकीला चिकटून कुलर होता. मुख्य दरवाज्याच्या बाहेर रस्त्याला लागून तुळशीचं झाड आणि एक पाण्याचा रांजण होता.

चहात साखर अन् चहापत्ती टाकत बाई म्हणाली, "त्यांचं बोलणं लई मनाला लावून घेत जाऊ नकुस. तुला त माहित्ये फटकळ स्वभावाय." बाई समजूत काढत होती. पण सुन्याला तिच्या बोलण्याचं झालेल्या प्रसंगाचं काहीच वाटत नव्हतं. बराच वेळ शांतपणे चहाच्या पातेल्याकड पाहत बसलेल्या सुन्यानं नुसतं हं केलं. आणि बोलायचा म्हणून बोलला, "आता काय केलं होतं का म्यां? तरीपण द्याल्या ना श्या! कधी कधी वाटतं, बाप नाय दुष्मनय मपला." तशी बाईनं हातातील सांडशी सुन्याच्या टोंगळ्या हाणली. सुन्यानं जागेवर टोंगळा चोळत "बायो, लागलं की!" त्यावर बाई म्हणली, "लागायसाठीच मारलंय. कसा का असेना पण बाप हाय तोहा त्येव. अन् बापाला दुष्मन म्हणालायस व्हय! लाज कशी वाटत नाही." तसा सुन्या म्हणला, "बाई बापय म्हणूनच ऐकून घेतोय. दुसरा कुणी असता तर चांगलाच गप केला असता."

Rural Social Structure
Rural Social Structure: गाव आणि शहराच्या मधोमध हरवलेली माणसं

बाई गॅसच्या शेगडी समोरून उठली. आणि रॅकचा कप काढत म्हणाली, "बरं, लई आला मोठा पैलवान. दाभड बसलीत थोबाड बघ आरश्यात." त्यावर सुन्या नुसताच हसला. बाईनं चहा कपात ओतला. सुन्यानं चहा घेतला. चहा घेऊन सुन्या उठून खोलीत गेला. बाई स्वयंपाकाची गडबडीला जुंपली गेली. सुन्यानं अंगातली नाईट पॅन्ट काढली. जीन्स घालून बाहेर आला. आरश्यात पाहून केसावरून हात फिरवला. तोवर मोबाईलची रिंगटोन वाजली. 

सुन्या गडबडीत पुन्हा खोलीत गेला. "बोल की, शऱ्या! आलास व्हय गावात तू. बरं बरं येतो." आणि कॉल कट केला. तेवढ्यात बाईनं हटकलं, "आता कुठं निघालास?" सुन्या म्हणला, "गया मावशीचा शऱ्या आलाय त्याला येतो भेटून." "लई येळ बसू नकु तिकडं. फिकं वरण आणि चकूल्या करायले" बाई म्हणाली. लगेच जाऊन येतो, म्हणत सुन्यानं पायात चप्पल घातली आणि बाहेर पडला. दिवस मावळला होता. तांबूस रंगांच्या छटा आकाशात दिसायला लागल्या होत्या. सुन्या घरापासून वीस पंचवीस पावलं चालत मोरे मास्तरच्या घरापासून डाव्या बाजूला वळला. पुढं थेट देवीच्या मंदिरातपर्यंत चालत गेल्यावर उजव्या बाजूचा वळला. डोक्यात दुपारचं स्वप्न सुरू होतं. ती बाई. नदी. नदीचं लालसर पाणी. आणि नदीला आलेला पूर. कशाची कशाला संगती लागत नव्हती. दहा मिनिटं चाल्यावर त्याला जरा दम भरला. त्याची चालण्याची गती थोडी मंदावली. देवीचं मंदिर मागे पडलं होतं. पुढे जरासा चढ लागला. स्वप्न आणि अधूनमधून दादाचं बोलणं, बाईची समजूत घालणं असा गोंधळ डोक्यात सुरू होता. शऱ्याचा आखाडा म्हणजे हक्काची जागा होती. आजवरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथं गेल्यावर सहज मिळायची. 

सुन्याचा गावातला हक्काचा मित्र म्हणजे शरद काळे. तो गावात बऱ्याच दिवसांनी गावात आला. येणार हे माहीत होतं. आजच येणार हेही सुन्याला माहीत होतं. पण संत्या सोबत गेल्यामुळे आणि दुपारी हॉटेलमध्ये बराच वेळ गण्याच्या गप्पात  घालवल्यामुळं तो विसरला होता. तोवर शऱ्याचा आखाडा जवळ आला होता. शऱ्याची दोन एकर शेत जमीन होती. तिथं त्याचा बाप दिवसभर पडलेला असायचा गांजा फुकत. त्याच्या बापानं तिथं पत्राचा शेड केला होता. बाजूच्या गुंठाभर मोकळ्या जागेत कुंपण घातलेलं होतं. त्यात कोंबड्या पाळलेल्या होत्या. आणि एक कुत्रीही. शऱ्याच्या बापाकडे एक मोटारसायकल होती बजाज कावासकी. जुनाट होती, पण चकचकीत ठेवलेली असायची. शऱ्या आखाड्यावर आला की, त्याचा बाप मोटारसायकल काढून गावात यायचा. एरव्ही मात्र तिथंच बसलेला असायचा. 

सुन्या आखाड्यावर पोहचला होता. दिवस मावळल्यानं आता अंधार गडद झाला होता. त्यानं शऱ्याला कॉल केला. त्याला मोबाईलची रिंगटोन ऐकायला आली. पण शऱ्या दिसत नव्हता. कुंपणाच्या मेखीवरचा बल्ब माचमीच करत होता. सुन्यानं आवाज दिला. "भाई, कुठं हाईस ?" तसा शऱ्या शेडच्या मागून मोबाईलची टॉर्च बंद करत पुढे आला म्हणला, "आरं आकडा टाकीत होतो. एक तार गेलीय. म्हणून आकडा बदललाय." "च्यायला, लाईटचा लईच बोऱ्या वाजलाय राव. सारखी ताण देती. दुपारी असंच सुरू होतं लाईटीचं." त्यावर शऱ्या बाजवर बसत म्हणला, "ते सोड बाकी काय चाललंय मग ?" त्यावर सुन्या म्हणला, "निवांतय बघ. गावात आल्यापासून जरा शांत वाटायला लागलंय. पण घरचा काहार काही थांबत नाही." "काय झालं ?" शऱ्यानं प्रश्नार्थक चेहऱ्यानं विचारलं, सुन्या बाजंवर बसत म्हणला, "तेच रे! बाप सारखा टोमणे हाणतोय आणि माय समजूत काढतेय. दुपारी ते संत्या आणि हॉटेलवालं गण्या भेटलं तेही असलंच याचं त्याचं गऱ्हाणं करत बसलेले. कटाळा आलाय नुसता. गावातलं वातावरण लईच निगेटिव्हय." सुन्या बोलत होता. शऱ्या त्यावर "चालायचंच. इथं कुणाच्याही जिंदगीचा त्रिकोण गोलचय. तू टेन्शन नकु घेऊ. मी त म्हणतो घरच्यांना स्पष्ट सांगूनच टाक. नाही जमत त नाही जमत. हे असं रोज तडफडून किती दिवस जगणारेस." शऱ्या म्हणला. शऱ्याच्या त्या वाक्यानं बोलणं पुढे करिअरच्या मोडवर स्विच झालं.

कोंबड्या जाळीच्या खुराड्यात घातलेल्या होत्या. कुत्री काही दिसत नव्हती. संध्याकाळ हळूहळू रात्रीकडे सरकत होती. अधूनमधून गरम भाप जमिनीतून वर येत होती. त्यात एखादी वाऱ्याची झुळूक मिसळून जात होती. वातावरणात भकासपणा होता. मात्र सुन्या आणि शऱ्याचं बोलणं आत्ता कुठं रंगायला लागलं होतं. त्यात माणसांच्या एकटेपणाच्या अवस्थेची उदासीन वर्णनं होती. कुठेतरी उरलेला आशावाद होता आणि न संपणारा गुंता अधूनमधून उचंबळून येत होता. काही संवाद वायफळ होते. तर काही जगण्याची मिथकं होती. लांब कुठंतरी हलकासा लाऊडस्पीकरचा आवाज येत होता. त्यात अभंग सुरू होता.

रंगी रंगे रे श्रीरंगे Iकाय भुललासी पतंगे IIशरीर जायाचे ठेवणे Iधारिसी अभिलाष झणे IIनव्हे तुझा हा परिवार Iद्रव्यदारा क्षणभंगूर IIअंतकाळीचा सोयरा Iतुका म्हणे विठो धरा II

क्रमशः

#गोतावळा_३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com