
Rupee vs Dollar Exchange Rate : २ मार्च , २०२५ रोजी रुपया डॉलर विनिमय दर ८७.४६ झाला होता तो ५ मे, २०२५ रोजी ८४.२० झाला आहे. आपल्या देशात डॉलर- रुपया विनिमय दर सार्वजनिक चर्चेत येऊ लागला आहे हे चांगले लक्षण आहे. पण बऱ्याचवेळा त्यातील खाचाखोचा माहीत करून न घेता, रुपया घसरला की राजकीय विरोधक सत्ताधाऱ्यांना दोषी धरतात आणि वधारला की सत्ताधाऱ्यांचे समर्थक श्रेय घेतात.
राज्यकर्त्यांची धोरणे देशाच्या चलनाच्या विनिमय दरावर नक्कीच प्रभाव पाडतात. पण तो अनेक घटकांपैकी एक घटक झाला. डॉलर- रुपया विनिमय दरावर अक्षरशः अनेक शक्ती प्रभाव टाकतात. त्या समजून घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम, डॉलर दराच्या चर्चा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांपासून सुट्या करताच येणार नाहीत. हे आकळण्यास थोडे कठीण जाईल. पण अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला डॉलर कमकुवत देखील व्हायला हवा आहे आणि त्याचवेळी त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरची सुप्रीमसी देखील कमी व्हायला नको आहे.
डॉलर कमकुवत झाला तर त्यामुळे अमेरिकेत होणारी आयात महाग होईल आणि अमेरिकेतून होणारी निर्यात अधिक आकर्षक होऊ शकेल. ते ट्रम्प प्रशासनाला हवे आहे. पण त्याचवेळी डॉलर कमकुवत झाला तर डॉलरची आंतरराष्ट्रीय परकीय चलन बाजारातील मागणी कमी होणार हे देखील नक्की आहे.
सध्या ट्रम्प प्रशासन या परस्परांना छेद देणाऱ्या गोंधळात सापडलेले आहे. भोगू दे ट्रम्प प्रशासनाला आपला अडाणीपणा. तो त्यांनी तयार केलेला प्रश्न आहे. डॉलर इंडेक्स हा निर्देशांक डॉलरचे इतर सहा चलनाचे तुलनात्मक सामर्थ्य मोजतो. हा निर्देशांक मागच्या जानेवारी पासून १० टक्क्यांनी घसरला आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या कर्माने येत्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि चलन बाजारात डॉलरचे एककल्ली सामर्थ्य कमी झाले तर हवे आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकी डॉलरशिवाय इतर चलनात देखील व्हायला लागल्या तर ते सर्वच राष्ट्रांच्या हिताचे होईल. ज्याला Concentration Risk म्हणतात ती कोणाच्याच हिताची नसते. याचा अमेरिका विरोधाशी काहीही संबंध नाही.
भारतापुरते बोलायचे झाल्यास, डॉलरच्या तुलनेत रुपया किती घसरला याच्या जोडीला भारताशी निर्यात बाजारात स्पर्धा करणाऱ्या आशियायी राष्ट्रांच्या चलनाच्या तुलनेत रुपया किती घसरला असा प्रश्न विचारणे सयुक्तिक होईल. भारताच्या रुपयाने इतर आशियायी राष्ट्रांच्या तुलनेत बरी कामगिरी केली आहे.
इतरही अनेक गोष्टी डॉलर- रुपया विनिमय दरावर प्रभाव टाकतात. उदाहरणादाखल खालील गोष्टींची जंत्री देता येईल ः
- देशातील महागाई आणि त्याला प्रतिसाद देत रिझर्व्ह बँकेने वाढविलेले किंवा कमी केलेले व्याजदर.
- परकीय गुंतवणूकदारांनी आणलेले किंवा काढून घेतलेले डॉलर्स.
- रिझर्व्ह बँकेने खरेदी केलेले किंवा विकलेले डॉलर्स.
- डॉलरचा पुरवठा आणि मागणी यातील तफावत
- डॉलर विनिमय दराबाबत आयातदार किंवा निर्यातदारांनी घेतलेले फॉरवर्ड कव्हर
अनेक गोष्टी काळ्या- पांढऱ्या नसतात, तर त्या गुंतागुंतीच्या असतात. त्या समजून घेतल्या तरच राजकीय शिक्षण करता येते. नाहीतर लोक देखील आपल्याला गंभीरपणे घेत नाहीत.
(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.