
Sangola Kharif News : सध्या लग्नाचा धूमधडाका असल्याने एकीकडे लगीनसराई तर दुसरीकडे शेतीकामांची घाई, अशी बळिराजाची अवस्था झाली आहे. खरीप हंगामातील शेतीच्या आंतरमशागतीसाठी केवळ कहीच दिवस उरले आहेत.
सांगोला तालुक्यात खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. नांगरणी, कुळवणी, रोटरणी सुरू आहे. पूर्वी बैलांच्या साहाय्याने मशागतीची कामे केली जात होती. वरचेवर बैलांची संख्या कमी होऊ लागल्याने आता ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच मशागतीची कामे केली जात आहेत. मशागत वेगाने सुरू असली तरी बळिराजाचे डोळे मात्र आभाळाकडे लागले आहेत.
तालुक्याचे सरासरी २२ हजार ७१९ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ४० हजार ३२५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. यंदा १ जूनपासूनच जलधारा बरसणार असण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्ष पेरणीला काही दिवस उरल्याने बळिराजा सध्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यास व्यस्त आहे. ज्वारी, मका, भुईमूग आदी पीक- चाऱ्याची सुविधा, काडीकचरा पेटवणे, शेणखत टाकणी आदी मशागतीची कामे रखरखत्या उन्हात करताना बळिराजाच्या परिवाराची चांगलीच दमछाक होत आहे.
तर शेतकामाच्या लगीनघाईत नातेवाइकांच्या समारंभाला हजेरी लावावी लागत आहे. एकंदर लवकर पावसाळ्याच्या बातमीने बळिराजा सुखावला असला, तरी सध्या उन्हात काम करताना बळिराजाच्या अंगाची लाहीलाही होत आहे. यंदाचा मॉन्सून कसा असेल, याचा विचार न करता शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी लगबग सुरू केली आहे.
शेत नांगरणीच्या कामांना परिसरात मोठा वेग आला आहे. बैलजोडी नसलेले शेतकरी मात्र नाइलाजास्तव वाढीव दराचा फटका सहन करत ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती मशागतीची कामे करून घेत आहेत. गावगाड्यात सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला असून नांगरणी, कुळवणीची कामे सध्या तळपत्या उन्हातही सुरू आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.