
Pune News : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रति लिटर ३० रुपये दर आणि ५ रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत २ जुलै रोजी निवेदन केले होते. तसेच जुलैपासून देण्यात येणारे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने प्रतिलिटर ३५ रुपये दर मिळणार असल्याचेही विखे म्हणाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा विखे यांनी आपल्या निवेदनाचा कित्ता अहिल्यादेवी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.३१) पार पडलेल्या बैठकीत गिरवला. तसेच जे दूध प्रक्रिया केंद्र दर देणार नाहीत, त्यांच्यासह दूध भेसळ करण्यांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
याबैठकीला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संघ व खाजगी दुध प्रकल्पाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि विविध संघटना दुधाला ४० रूपये प्रति लिटर दर मिळावा अशी मागणी करत आहेत. तसेच दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कोतुळ येथे धरणे आंदोलनही केले जात आहे. या आंदोलनाचा आजचा २७ वा दिवस आहे. तर दुधाला ४० रूपये दर मिळावा यासाठी 'शेतकऱ्यांचे मेगाब्लॉक' आंदोलन करू असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला होता.
सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे दूध प्रक्रिया केंद्रांनी दुधाला दर द्यावा. सरकारचा आदेश दुध संघांवर बंधनकार असेल असाही दावा केला. तर निर्णया प्रमाणे दूध प्रक्रिया केंद्रांनी दर न दिल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश यावेळी विखे यांनी दिले आहेत.
राज्यात दूध भेसळीचा मुद्दा ही ऐरणीवर आला असून याबाबतही भक्कम कायदा करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांविरोधात एमपीडीए लावला जाईल. भेसळ करणाऱ्यांना जामीन मिळूच नये, अशी कठोर तरतूद सरकार कायद्यात करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे. प्रस्तावित कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागासोबत डेयरी विभाग आणि पोलीस दलातील अधिकारी एकत्र काम करतील. यासाठी तिन्ही विभागाचे पथक तयार केले जाईल असेही आत्राम म्हणाले.
तर राज्य सरकारने दुधाच्या दराबाबत निर्णय घेताना दुधाला प्रति लिटर ३० रूपये दर आणि अनुदान ५ रूपये निश्चित केले आहे. तर दुध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला ठरलेला दर द्यावा लागणार आहे. पण सरकारच्या या निर्णयाचे स्वागत दूध उत्पादक शेतकरी करतात की नाही याकडे आता पाहावे लागणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.