Farming : ध्यान द्या, ज्ञान होईल!

‘ज्याच्या हाताला घट्टे, त्याला देव भेटे.’ देव कामात पाहिला, की आपल्या आयुष्याचे ज्ञान पक्के होते. आपल्या पूर्वजांचा आपण मागोवा घेतला, की आपल्या हे चांगले ध्यानात येते. पुन्हा पुन्हा मनाला बजावावे, ध्यान द्या, ज्ञान होईल!
 Farming
Farming Agrowon

शेतातली कामे करायला माणसे धजेनात असा आरडाओरडा सगळीकडे सुरू झालाय. शेतीतले कामदार सोडून ऑफिसातले, कृषी विद्यापीठातले (Agriculture University) विद्वान यावर तोडगे सांगत आहेत. संसदेतही दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी चर्चा झडलेली आहे. यांत्रिक शेतीचा (Agriculture) पर्याय समोर येत आहे. जमिनीची मशागत करताना निंदण, खुरपण, कोळपं, वखर पाळयाऐवजी तणनाशकांचा सर्रास वापर सर्वत्र होत आहे. कोणतेही पीक असू द्यात, त्यातील तणाचा बंदोबस्त रोजंदाराऐवजी रसायने फवारून होऊ लागलाय.

 Farming
Sanjay Gorde : ज्ञान आणि माहितीचे युग

त्यामुळे मुळातच शेतात राबणारे मालक व गडी यांचे कष्ट फार फार कमी झाले. पाऊस झाला, कामाकडे टंगळमंगळ केली, की तणकट वाढते. कामधंदा खोळंबतो. पिकांची वाढ व उतारा तुंबतो. अशावेळी धावाधाव करून कामासाठी बायामाणसं हुडकली जातात. मग मोजके माणसं बसर येत नाहीत. निगुतीने रानं स्वच्छ ठेवता येत नाहीत. लोक ‘राम राम सोडून काम काम’ करायला लागतात, पण कामे उरकत नाहीत. रानचा पसारा अवकाळचौकाळ वाढतो.

 Farming
अटल इनक्युबेशन सेंटर : ज्ञान, संशोधनाचे नवं क्षितिज

रानात काम करताना पूर्वी आणि आता बोटावर मोजण्याएवढे सोडले, तर मालक व कामदार एकत्रच कष्ट उपसतात. त्यामुळे सालदाराबरोबर मालकच राबू लागल्यावर कमी वेळात जास्त कामे होतात. आता हे चित्र तुरळक झालेय. राबणारे मालक आता तयार आहेत, पण त्यांचे राबणे सालदारांना खटकायले. आमच्या मनावर काम करू द्या, कामाचे गुत्ते द्या, यावर त्यांचा जास्त जोर आहे. ऑफिस टाइमसारखे त्यांना आता सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच काम करावे वाटते. रात्रंदिवस रानात, वस्तीवर राहणारे दुर्मीळ झालेत. रात्री वीज सुरू आणि दिवसा लपंडाव यामुळे शेतकरी हैराण होतात.

दिवसा वीज नसल्यामुळे कामदार बसून राहतो. रात्रीला पिकांना पाणी द्यायला तो सहसा आणि सहज तयार नाही. मालकाच्या माघारी रात्रीला काम त्याच्याच मनावर. पहाट किंवा दिवस उजाडल्यावर कामे किंवा भिजून किती झाले? हे पाहिल्यावर तोंडाला मिरच्या झोंबतात, पण मोहोळाचा मध न लावता तोंड बंद करून कामाकडे काणाडोळा करावा लागतो. कमी जास्त बोलले तर ‘तुमचे तुम्ही बघून घ्या’ एवढे बोलून कामदार मोकळा होतो. घरी जसे दुपारी वयस्कर आजोबा - आजी असतात, तसे आता रानात म्हाताऱ्याकोताऱ्या सालदार बाया माणसांचा भरणा झालाय.

 Farming
Cotton Production : या पध्दतीमुळे कापूस उत्पादनात होईल ३० ते ५० टक्के वाढ

सालदार म्हणून मला अन् बाजारहाट व्हावा म्हणून त्याच्या घरचीला कामाला लावा, असा अघोषित करार मालकांना निभवावा लागतो. मजुरी देता देता मालकाचा खिसा खुळखुळा झालाय. मालकाच्या डोक्यावरचे कर्ज येड्या बाभळीसारखे वाढतच आहे. मालकांचे पैसे बचत ठेवून इतरांना व्याजाने देणारे सालदार सावकारही छुप्यारूपात बरेच जण आहेत. माझ्या अनुभवाची एक गोष्ट सांगतो, एका जमीनदार असामीची सालदारानेच दोन एकर जमीन खरेदी केली. जमीनदाराची मुले अल्पभूधारक झाली. ती मुले इतरत्र मोलमजुरी करू लागली. सालदार मालक झाले. त्या सालदाराला मी नकळत हटकले, ‘काय म्हणते शेती?’ तो म्हणाला, ‘ध्यान द्या, ज्ञान होईल!’ मी मनोमन समजलो. २५ वर्षांपूर्वी माझे वडील अचानक गेल्यावर मी आणि आई आजही कर्करोगातून बरी होऊन ६५ वयोवर्षांतही शेतातल्या बाया माणसांबरोबर राबराब राबतो. राबण्यातच ‘ज्ञान’ बरे! कामदारही अधिकाराने कामे करू लागली. आपणही आपले वावर कसावे.

मुळातच असे आहे, की स्थित्यंतर (बदल) होत असतात. ते नैसर्गिकच आहेत. पूर्वी राबणाऱ्याला गरज होती, आज मालकाला राबणाऱ्यांची गरज आहे. इमानदारी हे शेतीचे सर्वांत मोठे अस्त्र आहे. कामात व मापात आता पाप म्हणजे लूटमार आल्यामुळे शेतकऱ्यांचा नफा उणे होत आहे. मालक आता रानात जागेवर थिरकला तरच रानचा धंदा चांगला होतो.

मालकीण बायांबरोबर पाथीला असेल तरच इतर बाया बरोबर राबतात. ‘रानाला येढा, मालकाला पेढा’ जुने म्हणणे लक्षात घेण्याजोगे आहे. कर्मसंस्कार सालदारापेक्षा आता नव्या पिढीच्या मालकांना करावेच लागतील. कंपनीचा - कारखान्याचा मालक स्वतः कंपनीत किंवा कारखान्यात राबतो. पूर्वीसारखे ‘राबणाऱ्याला’ दिवस येतील. शेवटी कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, ‘ज्याच्या हाताला घट्टे, त्याला देव भेटे.’ देव कामात पाहिला, की आपल्या आयुष्याचे ज्ञान पक्के होते. आपल्या पूर्वजांचा आपण मागोवा घेतला, की आपल्या हे चांगले ध्यानात येते. पुन्हा पुन्हा मनाला बजावावे, ध्यान द्या, ज्ञान होईल!

- अरुण चव्हाळ, परभणी : ७७७५८४१४२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com