Tur crop : तूर पिकातील खोड करपा, मर रोगावरील उपाययोजना

Tur Crop Disease : तूर या कडधान्य पिकाचे मर व खोड करपा या रोगामुळे तूर पिकामध्ये मोठे नुकसान होते. म्हणून वेळीच पिकाच्या रोगाची लक्षणे जाणून त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Tur crop
Tur crop Agrowon
Published on
Updated on

Crop Management : तूर या कडधान्य पिकाचे मर व खोड करपा या रोगामुळे तूर पिकामध्ये मोठे नुकसान होते. सध्या बहुतांश तूर पीक हे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच फुले लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. दरवर्षी फेरपालट न करता एकच पीक घेणे, बदलते वातावरण यामुळे तूर पिकावरील जैविक व अजैविक ताण वाढत आहे. त्यातच या वर्षी काही ठिकाणी पेरणी झाल्यानंतर पीक रोपावस्थेत असताना आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस झाला. पुढे ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडून, पुढेही अनेक खूप जास्त पाऊस झाला. अशा विषम स्थितीमध्ये तुरीचे पीक वाळल्याचे आढळले. काही तपासणीअंती पिकावर खोडावरील करपा व मर या रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून आले. या रोगाची लक्षणे जाणून त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Tur crop
Tur Crop : योग्य नियोजनामुळे वाढवले तुरीचे उत्पन्न

(१) मर रोग :

हा रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या फ्युजारियम उडम या बुरशीमुळे होतो. जमिनीचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस व ओलावा २० ते २५ टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत होतो. शेंगा परिपक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. मागील वर्षीच्या पीक अवशेषांमध्ये बुरशी सुप्तावस्थेत राहून पुढील वर्षी तुरीमध्ये रोग उद्‍भवू शकतो. या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पिकास पाणी दिले तरी वर पानांपर्यंत पाण्याचे वहन होत नाही.

लक्षणे : पानाच्या शिरा पिवळ्या होतात. पाने पिवळी पडतात. झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमेजतात. झाड हिरव्या स्थितीत वाळते. जमिनीलगतचा खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो. मूळ उभे चिरून पाहिले असता मुळाचा मध्य भाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते. कधी कधी खोडावर पांढरी बुरशीसुद्धा आढळते. वाळलेल्या झाडाची पाने गळत नाही. तसेच रोगाची तीव्रता पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत जास्त असते. झाड मरते.

मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन :

- मध्यम व उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो.

- सलग तुरीचे पीक घेण्यापेक्षा ज्वारीचे आंतरपीक घेतल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो.

- पाणी साचणाऱ्या व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत तुरीचे पीक घेऊ नये.

- ज्या शेतामध्ये पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल, अशा शेतात तूर पीक पुढील किमान चार ते पाच वर्षे घेऊ नये. या क्षेत्रात तुरीऐवजी तृणधान्य पिके घ्यावीत.

- शेतामध्ये मर रोगाची रोगट झाडे दिसताच त्वरित उपटून टाकावी.

- मर रोगग्रस्त शेतात २ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या २०० किलो शेणखतात मिसळून पिकात द्यावा.

Tur crop
Tur Stock Limit : तुरीचे स्टॉक लिमिट आता डिसेंबरपर्यंत

(२) खोडावरील करपा :

(अ) कोलेटोट्रायकम करपा : हा रोग कोलेटोट्रायकम डिमँशियम या बुरशीमुळे होतो. खोडावर, फांद्यावर काळ्या करड्या रंगाचे चट्टे आढळतात. रोगाची तीव्रता अधिक असल्यास फांद्या व झाडे वाळतात.

ब) फायटोप्थोरा करपा : हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. सततचा रिमझिम पाऊस पडत राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. वातावरणातील आर्द्रता ८० ते ८५ टक्के व २२ ते २५ अंश तापमान ही परिस्थिती या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरते. पाण्यातून व हवेद्वारे या रोगाच्या बीजाणूंचा प्रसार होतो.

लक्षणे ः

या रोगामुळे पानावर ओलसर चट्टे, खोडावर जमिनीलगत जमिनीपासून काही इंच अंतरावर तपकिरी चट्टे आढळतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन खोडाभोवती खोलगट भाग तयार होतो. काही वेळा खोडावर गाठी तयार होतात. अनुकूल वातावरणात या चट्ट्यांवर पांढरट गुलाबी रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते. हे चट्टे वाढत जाऊन झाडाच्या मुख्य बुंध्याला वेढतात, त्यामुळे झाड कमकुवत होऊन त्या ठिकाणी चटकन तुटते. या खोडाच्या चट्ट्याचा उभा छेद घेतल्यास खोडाचा आतील भाग तपकिरी काळा पडल्याचे दिसते. बरेचदा खोडावर २ ते ३ मिलिमीटर खोल व २ ते ४ सेंटिमीटर लांब भेगा पडलेल्या दिसतात. या रोगामध्ये झाडे लवकर वाळतात.

करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन :

- पाणी साचणाऱ्या व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत तूरचे पीक घेऊ नये.

- पाऊस जास्त पडल्यास शेतात चर खोदून अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे.

- रोगग्रस्त शेतात ट्रायकोडर्मा ४ ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

- रोग दिसताच प्रामुख्याने खोडावर व फांद्यावर मेटॅलॅक्झील (४ टक्के) अधिक मॅन्कॉझेब (६४ टक्के डब्ल्यू. पी.)* (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. आवशकता भासल्यास ८ ते १० दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.

- एम. एन. इंगोले, ९४२१७५४८७८

(वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com