
Navi Mumbai News : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांकडून भूखंडाच्या वाढीव मूल्यांच्या कमाल ५० टक्के सुधार शुल्क (बेटरमेंट चार्जेस) आकारले जाणार होते, परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी आग्रही भूमिका घेत अत्यल्प सुधार शुल्क करण्याची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने सोमवारी (ता. ३) झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी दोन्ही आमदार महोदयांना आश्वासित केले आहे. ग्रामस्थांचे जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत नैना प्रकल्पाला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर व उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी घेतली असून, त्यानुसार सिडकोला पत्र देऊन तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती.
त्याप्रमाणे ६ जानेवारीला सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची सिडको कार्यालयात बैठक झाली होती. या वेळी बेटरमेंट चार्जेस अत्यल्प करणे, ४०-६० धोरणाऐवजी ५०-५० असे प्रमाण करावे, ४२ गावांतील ५०३८ घरे/बांधकामांवर तोडक कारवाईचा अपप्रचार, शेतकऱ्यांना त्यांच्याच जागेवर भूखंड द्यावेत यासह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नावर जोर देत आमदार ठाकूर व बालदी यांनी प्रथम शेतकऱ्यांना न्याय त्यानंतर पुढील कार्यवाहीची सूचना वजा मागणी बैठकीत केली.
पाठपुराव्याला यश
सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व नगररचना परियोजनामधील सुधार शुल्क कमी करून शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नावर सकारात्मक मार्ग निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी सिडको व सरकार दरबारी कायम पाठपुरावा केला आहे. सुधार शुल्काचा महत्त्वपूर्ण प्रश्न निकाली लागल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.