
Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार धरुन बँकेच्या तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांसह ३५ जणांवर २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपयांची जबाबदारी चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी निश्चित केली असून, विभागीय सहनिबंधकांकडे त्यांनी शुक्रवारी (ता. ८) यासंबंधीच अहवाल सादर केला.
या सर्वांकडून आता या पैशाची वसुली होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार जयवंत जगताप आदी दिग्गजांचा त्यात समावेश आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या अहवालाने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी २०११ मध्ये सहकार विभाग, रिझर्व्ह बँकेकडे ८ मुद्द्यांची तक्रार केली होती. त्यानंतर २०११ मध्ये सहकार विभागाने तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली होती. २०१३ मध्ये या तक्रारीत तथ्य असल्याचा अहवाल या समितीने शासनाला दिला. पण तरीही पुढे काहीच कारवाई होईना, त्यामुळे आमदार राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
त्यानंतर सहकार कायदा कलम ८३ अन्वये चौकशीचे आदेश दिले. तसेच २०१४ मध्ये चौकशी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांची नियुक्ती केली. २०१५ मध्ये त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला. त्यानंतर या चौकशीवर तत्कालीन सहकारमंत्र्यांकडे अपील झाले, पण ते त्यांनी फेटाळले, यावर न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यानंतर न्यायालयाने फेरचौकशीसाठी हे प्रकरण पुन्हा सहकारमंत्र्यांकडे पाठवले.
त्यावेळी पूर्वीची चौकशी रद्द करून पुन्हा कलम ८३ अन्वये चौकशी झाली आणि त्यावर चौकशी करून जबाबदारी निश्चितीसाठी निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी त्यांनी या सर्व संचालक, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून आणि योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी करून तसेच वेळोवेळी सुनावणी घेत ही चौकशी पूर्ण करून, आता अंतिम चौकशी अहवाल तयार केला आहे. त्यानुसार आता हा अहवाल विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
आजी-माजी आमदारांसह दिग्गांजाचा समावेश
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. त्याशिवाय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, माजी आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दीपक साळुंखे या दिग्गजांचाही त्यात समावेश आहे. तसेच हयात नसणाऱ्या काही संचालकांच्या वारसांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या सर्वांकडून १२ टक्के व्याजदराने या रकमा वसूल कऱण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.