Indian Culture : भारतीय संस्कृतीमध्ये सण, वार, उत्सवास हजारो वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे हे सर्व सण, वार, उत्सव आपल्या कृषी परंपरेस जोडलेले आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये प्रथम शेतीचा विकास झाला आणि यामधून इतर व्यवसाय निर्माण झाले. सण-वारांचे सुद्धा असेच आहे. काळ बदलला, इतर व्यवसायास सन्मान प्राप्त झाले, मात्र ज्या शेतकऱ्यांच्या कष्टामुळे त्यांना सन्मान मिळाला तो शेतकरी आणि त्याची शेती मात्र गौण ठरली.
सण, वार, उत्सवाचेही असेच झाले. निसर्ग श्रीमंतीवर आधारित आपले सर्व सण शेतकऱ्यांच्या हातून केव्हा निसटून गेले आणि श्रीमंतांचे कधी झाले कळालेच नाही. दिवाळीचा सणसुद्धा बळीराजाचाच! बलिपूजनानेच या उत्सवाची सुरुवात होते. लहानपणी आमचे आजोबा नरकचतुर्दशीला पहाटेच स्नान झाल्यावर बळीराजाची त्याच्या वचनाची आणि त्यागाची गोष्ट सांगत असत.
प्रत्येक सणावारामागे पूर्वी काही तरी उद्देश, परंपरा, संदेश असे. आज आपण ते साजरे करतो ते फक्त प्रदर्शनासाठीच! किती जणांना या सणांमागचा खरा उद्देश काय आहे हे माहीत आहे? आमचे सर्व ढोल, ताशा, प्रखर दिवे, गर्दी, गोंगाट आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आणि त्यातून दाखविल्या जाणाऱ्या श्रीमंतीमध्येच असते. कुठलीही मौज, मजा ही आनंदापुरती मर्यादितच असावयास हवी. मात्र असे कधीच होत नाही. प्रत्येक ठिकाणी हव्यासच दिसतो, भाव कुठेही नाही.
गरीब शेतकऱ्यांसाठी वर्षातून एकदाच गोडधोड खाण्याचा दिवस माझ्या आठवणीमधील खरी दिवाळी. कितीतरी वेळा आम्ही ऋण काढून सण साजरा केला आहे. माझ्या शालेय जीवनामध्ये दिवाळीच्या सुट्टीत मी आजोळी जात असे. बलिपूजनाच्या दिवशी आमचे आजोबा शेतामधील सर्व गड्यांना त्यांच्या पत्नी, मुलाबाळांसह घरी आमंत्रित करत, सर्वांना नवीन कपडे आणि फराळाचे भरपूर पदार्थ देत.
माझ्या आठवणीमधील मी पाहिलेले, मनात आजही वसलेले हे खरे बलिपूजन! आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी दिवाळी सणाचा पहिला दिवस येतो तो म्हणजे धनत्रयोदशी! धनत्रयोदशीला उत्तर भारतात धनतेरस म्हणतात. या धनत्रयोदशीचा खरा अर्थ म्हणजे धन्वंतरीची पूजा. धन्वंतरी ही समुद्र मंथनामधून वर आलेली देवता आहे. चार भुजा असलेल्या या देवतेच्या एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातामध्ये शंख, तिसऱ्या हातात आयुर्वेद ग्रंथ, तर चौथ्या हातात औषधी वनस्पती आहे. म्हणूनच या देवतेला देवांचे वैद्य म्हणतात.
धनत्रयोदशीला सायंकाळी धन्वंतरीची म्हणजे आयुर्वेदाची पूजा केली जाते. कुटुंबासाठी सुदृढ आरोग्याची प्रार्थना केली जाते. भारत सरकारने २०१६ पासून हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या दिवशी सायंकाळी कुंभाराकडून मातीचे दिवे आणून संपूर्ण घर या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकले जाते.
धन्वंतरी बरोबरच लक्ष्मीचे स्वागत करण्याची ही अशी परंपरा आहे. जेथे अंधार तेथे रोगराई म्हणूनच हे प्रकाश पूजन असते. ज्या घरांमध्ये धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाचा सन्मान केला जातो, तेथे लक्ष्मी कायम वास्तव्य करते, हा खरा या धनत्रयोदशीचा संदेश आहे. भारत वर्षात पाच हजार वर्षांपूर्वी आयुर्वेदाचा जन्म झाला. आज याच देशात या बहुमोल शास्त्रास दुय्यम स्थान देऊन आपण लाखो रुपये आरोग्यावर खर्च करत आहोत.
पूर्वी मोठ्या गावात वैद्य असत, तर लहान गावात, खेड्यात आजीबाईचा बटवाच वैद्याचे काम करत असे. धनत्रयोदशीच्या दिवशी घरामधील वृद्ध आजी, लेकी, सुनांना हा आजीबाईचा बटवा कसा करावयाचा आणि तो वापरण्याचे शिक्षण देत असत. या बटव्यामधील सर्व औषधी दिवाळी आधीच घरामधील मोठी माणसे, मुले जंगलामधून घेऊन येत. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी पाककृती याच दिवशी शिकवल्या जात. उत्तर भारतात धनत्रयोदशीच्या दिवशी मध आणि औषधी वनस्पतींची पूजा करतात. तेथे या दिवसास छोटी दिवाळी म्हणतात.
धन्वंतरीला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखविला जातो, कारण आयुर्वेदात यास उत्तम औषध समजले जाते. दक्षिणेत धनत्रयोदशीस धन्वंतरीचा प्रसाद म्हणून मारुंडी ही पाककृती औषध म्हणून खाल्ली जाते. उद्देश एवढाच, की वर्षभर घरामधील कुणीही आजारी पडू नये. धनत्रयोदशीस औषधी वनस्पतींचे महत्त्व फार आहे. या दिवशी रब्बी पिकाबरोबर अनेक औषधी वनस्पती शेतकरी त्यांच्या शेतात लावत. पूर्वी सर्वत्र सेंद्रिय शेती असल्यामुळे या औषधी वनस्पतींमध्ये औषधी तत्त्वसुद्धा भरपूर असत. या दिवशी हिमालय त्याचबरोबर इतर दऱ्याखोऱ्यांमधून आदिवासी लोक मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती गोळा करतात.
धनत्रयोदशीला धण्याची बाजारपेठ गजबजलेली असते. अनेक शेतकरी या दिवशी मोठ्या प्रमाणावर धण्याची लागवड करतात. मध्य प्रदेशामध्ये काही ठिकाणी या दिवशी धण्याचे पाणी व त्यात थोडा गूळ टाकून ते पेय प्रसाद म्हणून दिले जाते. कोथिंबीर लोह कमतरता दूर करते. दुर्गम आदिवासी भागात स्त्रिया आणि बालमृत्यूच्या विविध कारणांपैकी गरोदर काळात लोह कमतरता हे सुद्धा एक मुख्य कारण आहे.
माझ्या आदिवासी भागामधील कार्यक्षेत्रामध्ये मी स्त्रियांना त्यांच्या आहारामधील कोथिंबीर म्हणजे धण्याचे महत्त्व सांगून धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरीचा प्रसाद म्हणून दिलेले धणे त्यांच्या परसदारी लावून मिळालेल्या कोथिंबिरीचा दैनंदिन आहारात समाविष्ट करून लोह कमतरता कशी सहज दूर करता येते हे सप्रमाण दाखविले.
कोणताही सण आणि त्यामागचा उद्देश समजला, तर तो साजरा करण्याची मजा वेगळीच असते. धनत्रयोदशी हा असाच एक सुदृढ आरोग्य शैली जगण्याचा, अंगीकारण्याचा सण आहे. आपल्या अंगणात, बाल्कनीत दोन-चार औषधी वनस्पती लावेल, मी आयुर्वेद शैलीचा स्वीकार करेल, सात्त्विक पौष्टिक आहार घेईल, नित्यनियमाने शारीरिक व्यायाम करेल, नकारात्मकतेचा त्याग करून सकारात्मकता स्वीकारेन, शेताच्या बांधावर चार-दोन औषधी वनस्पती लावेन, सेंद्रिय शेती करेल असा संकल्प या पवित्र दिवशी आपण करायला हवा.
औषधी वनस्पतींचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेणारे अनेक शेतकरी या दिवशीच त्यांची जास्त लागवड करतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या छोट्या दिवाळीला आपल्या घराचे आरोग्य जपणाऱ्या तुळशीचा सर्वांत जास्त सन्मान केला जातो. पहिला दीप तुळशीपाशी ठेवून मगच धन्वंतरीची पूजा केली जाते. प्रत्येक सण, वार, उत्सव अर्थ समजून साजरा केला, तरच त्यापासून मिळणारा आनंद द्विगुणित असतो. धनत्रयोदशीचे सुद्धा असेच आहे.
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.