Solapur News : एकरुख उपसा जलसिंचन योजनेचे पाणी लवकरात लवकर मिळावे, यासाठी ७२ गावांतून रथयात्रा काढणार असल्याचे कर्देहळी येथील शेतकरी कृष्णात पवार यांनी सांगितले.
दक्षिण सोलापूर तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस कमी पडल्याने सर्व तलाव, विहिरी अद्यापही कोरडे आहेत. कुंभारी, वळसंग यांसारख्या गावांत आजही टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. अशा परिस्थितीत उजनी धरण ओव्हरफ्लो होऊनही एकरुख उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना दिले जात नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
माजी सैनिक अशोक पौळ, अनिल ढोले, राम पाटील, दीपक पाटील, भरत माने, हरी पौळ, ज्ञानेश्वर पवार, कोंडिबा पौळ यांच्यासह कुंभारी, कर्देहळी, शिर्पनहळ्ळी, दर्गनहळ्ळी गावातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी भविष्यात दक्षिणमधील ७२ गावांतून रथयात्रा काढून या योजनेची जनजागृती करणार असल्याचे सांगितले.
यापुढील काळात आंदोलन केल्याशिवाय शेतीला पाणी मिळणारच नाही का? या योजनेतील ५५ कोटी रुपये शिल्लक असतानाही कामे पूर्ण का केली जात नाहीत, असाही सवाल कृष्णात पवार व इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
जलसंपदा विभागाकडून नेहमीच दिशाभूल
या योजनेच्या मार्गावरील सर्व तलाव व बंधारे पाण्याने भरून घ्यावेत, यासाठी येथील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला पत्र दिले होते. त्यावर कारवाई न झाल्याने स्वातंत्र्य दिनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
त्यानुसार शासनाच्या जलसंपदा विभागाने या योजनेतील ५५ कोटी रुपये शिल्लक असून जून २०२५ पर्यंत योजना पूर्ण करण्यात येत असल्याचे पत्र कृष्णात पवार यांना दिले आहे. शासनाकडून नेहमीच अशा प्रकारची चालढखल करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे आगामी काळात ७२ गावांतील शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी रथयात्रा काढणार असल्याचा निर्धार येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.