Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यात सहा लाख ६० हजार खातेदार शेतकरी असून, त्यातील एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे पाच लाख चार हजार शेतकरी आहेत. परंतु विविध कारणांमुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या शेती क्षेत्रात झपाट्याने घट होत आहे. राज्यातील जमीन वापराच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दशकांमध्ये पिकांखालील क्षेत्रात ३० लाख हेक्टरने घट झाली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक जालिंदर पांगरे यांनी दिली आहे. पांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सहा लाख ६० हजार खातेदार शेतकरी असून, एक हेक्टरपेक्षा कमी अत्यल्प भूधारक पाच लाख चार हजार शेतकरी आहेत. एक ते दोन हेक्टरपर्यंत एक लाख पाच हजार शेतकरी असून दोन हेक्टरपासून वर बहुभूधारक ५१ हजार शेतकरी आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक लोक हे शेती, शेतीपूरक व्यवसायाशी जोडले आहेत. मागच्या काही वर्षांपासून वाढते औद्योगिकीकरण, नवे प्रकल्प, रस्ते, सिंचन प्रकल्प, तसेच मानवी वसाहतींसाठी बिगरशेतीकरणाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेती क्षेत्रामध्ये घट होत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत वडिलोपार्जित जमिनीमध्ये हिस्से पडून शेत जमिनीचे वाटप झाल्यानेही शेती विभागली आहे. जमिनीच्या छोट्या तुकड्यावर उदरनिर्वाह होत नसल्याने अनेक कुटुंबांनी गावाकडील पारंपरिक शेती व्यवसाय सोडून नोकरीसाठी शहरे गाठली आहेत. त्यामुळे शहरातील लोकसंख्या वाढली आहे.
शेतात मोबदला कमी मिळत असल्याने मजुरांची वानवा, वाढणारी महागाई, त्यात शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक अडचण, नव्या पिढीतील सदस्यांची शेती व्यवसायाबद्दल अनास्था, शेतीचा खर्च आणि त्यातून होणारे उत्पन्न याचा ताळमेळ जुळत नसल्याने जमिनी विकण्याकडे कल अशा अनेक कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकांचे क्षेत्र घटल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेती क्षेत्र घटत असल्याने उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली
२०१५-१६ च्या कृषी गणनेनुसार महाराष्ट्रातील खातेदार शेतकऱ्यांची संख्या एक कोटी ५२ लाख ८५४ इतकी आहे. यातील तब्बल एक कोटी २१ लाख ५५ हजार शेतकरी हे अत्यल्प आणि अल्पभूधारक आहेत. एक हेक्टरपेक्षा कमी म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण ५१.१३ टक्के, १ ते २ हेक्टरपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांचे २८.३८ टक्के, २ ते ४ हेक्टरपर्यंत अर्ध मध्यम भूधारक शेतकऱ्यांचे १५.२२ टक्के, ४ ते १० हेक्टरपर्यंत मध्यम भूधारकांचे ४.८० टक्के, तर १० हेक्टरपेक्षा शेतजमीन असलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण ०.४५ टक्के आहे. २०१५-१६ नंतर कृषी गणना जाहीर झाली नाही; पण राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (एनएसओ) तसेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
३० लाख हेक्टरने पीक क्षेत्र घटलं
२०२२-२३ च्या जमीन वापर आकडेवारीनुसार राज्यात भौगोलिक क्षेत्रापैकी पिकांखालील निव्वळ क्षेत्र १६४.९० लाख हेक्टर (५३.६ टक्के) आहे. २००४-०५ च्या आकडेवारीनुसार निव्वळ पेरणी क्षेत्र १७४.९ लाख हेक्टर (५६.८६ टक्के) होते. म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये पिकांखालील क्षेत्रात तब्बल ३० लाख हेक्टरने घट झाली आहे.
२००४-०५ मध्ये राज्यात नापीक व मशागतीस अयोग्य आणि मशागत योग्य पडीक क्षेत्र ८.५९ टक्के, इतर पडीक क्षेत्र ८.२० टक्के, गायराने, चराऊ कुरणे व किरकोळ झाडे-झुडपाखालील क्षेत्र ४.८८ टक्के, तर बिगर-शेती वापराखाली आणलेले क्षेत्र ४.५३ टक्के होते. २०२२-२३ च्या स्थितीनुसार लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन १२ टक्के, लागवड न केलेली इतर जमीन ८ टक्के, पडीक जमीन ९ टक्के इतकी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.